Tuesday, September 11, 2018

SIR & MADAM, YOU CAN DO IT...!*



                   परवा एक थरथरत्या आधाराचे आणि भिरभिरत्या नजरेचे आजोबा आपल्या नातवाला घेऊन राणीबागेच्या संरक्षक कठड्याच्या आतून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गमंत दाखवीत होते. कडेवर बसलेल्या नातवाला त्या  गाड्यांची धमाल वाटत असावी. हसत खिदळत होते. इतक्यात तेथून एक घोडेस्वार टप टप करीत चालला होता. ते दृश्य पाहून नातू इतका चेकाळला की त्याने त्या वयस्कर आजोबांना हिसके देऊन उड्या मारू लागला. अधून मधून आजोबांच्या पिवळ्याधमक थोबाडावर त्याच्या गोऱ्या हातानी रंगकाम करीत होता. पण आजोबांना तो गोडवा वाटत होता, कारण हे सुख कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. हे त्यांना पटलेले होते. त्याच्या अकस्मात आचके विचके घेण्याने ते आजोबा स्वत:चा तोल सावरणे, गमावून बसले. पण कसे बसे सावरलं त्यांनी....! पण त्या छोट्याश्या बाळाने मला एक सुचविले की, त्याच्या डोळ्यातली गुज माझ्या मनात आली. मला येथे बसून मजा करायची आहे. येथील गंमत जंमत पाहायची आहे. पण मला येथे बसायला काहीच नाही.....! त्या गोंडस गोजिऱ्या बाळाचं मन सांगत होते. *सन्माननीय नगरसेविका सौ समिता संजय नाईक*  यांच्या प्रयत्नाने नव्याने वातानुकुलीत सुलभ शौचालयाची निर्मिती पूर्णत्वास आलेली दिसत आहे. लवकरच जुन्या शौचालयाचे स्थलांतर होईल. त्या बाजूला मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आसन व्यवस्था केली तर आजी-आजोबा नातू या तीन सेतू साधणाऱ्या घटकांना याचा लाभ नक्कीच होईल. त्याशिवाय या परिसरात पोलीस बांधव सदानकदा ताटकळत उभे असलेले दिसत असतात. त्यांनाही याचा लाभ होईल. दमणूक झालेल्या चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटविण्याचा म्हणा किंवा गावोगावंच्या मोर्चेकरी बांधवांना क्षणिक उसंत मिळावी या उद्देश्याने या ठिकाणी आसन व्यवस्था कितीतरी लाभदायक ठरेल हे एकदा मनात विचार करून पाहावा. भले करणाराने आपले नांव टाकावे पण आपण यांच्यासाठी काही तरी करू या ....!    पूर्वी अशा विषयांवर भांडायचो.... खूप बोलायचो .... आता हे सगळं जमत नाही. कारण माझं मन या गोष्टीत रमत नाही. म्हणूनच की काय ? समोर घडणाऱ्या घटना मी शब्दसुमनात प्रस्तावित करीत असतो.  नगरसेवकमंडळी आसनव्यवस्था वितरीत करीत असतात त्यांचं कौतुक तर आहेच पण वितरीत केलेली आसनव्यवस्था गृहोपयोगी म्हणजे घरात  वापरली जात असल्याचे चित्र एका ठिकाणी दिसून आले आहे. जेथे गरज आहे तेथेच वापर झाला तर नक्कीच आंनद वाटेल.
                   राणीबागेकडून घोडपदेव कडे जाणारा रस्ता  इ एस पाटणवाला मार्ग . या मार्गावर पूर्व भायखळा शाळा नुकतीच *नगरसेवक सन्माननीय श्री रमाकांत रहाटे* यांच्या प्रयत्नाने सुशोभित केलेली आहे. निसर्गाची कृपादृष्टी असलेला, सृष्टीसौंदर्याने नटलेला कारण  रस्त्यालगत भारी गर्द झाडी. सामसूम रस्ता आणि विशेषता वर्दळ नाही विशेष म्हणजे या ठिकाणी तापमान वेगळे दर्शविते. त्यामुळे  या रस्त्यावर प्रभातफेरी आणि शतपावलीसाठी नागरिक प्रथम पसंती दर्शवितात. याच रस्त्यावर फेरी मारताना फुलांची सुगंधी दरवळ वायुलहरीद्वारे रुणझुणत.. नाचत नाचत नाकपुडीवर साम्राज्य करीत असते. नैसर्गिक वातावरणातील प्रभात फेरी असो वा शतपावली. आरोग्याला अधिक हिताची, अन्न पचले जाते, मेंदूची प्रतिभाशक्ती वाढते. रक्ताभिसरण चांगले होते,आळस दूर होतो, ढेकर, पोटात साठलेला वायू साफ होतो, मान, गुडघे, कंबरदु:खी यांस आराम मिळतो. यासाठी अनेक विभागातील नागरिक या मार्गावर आपली सांज सकाळ व्यतीत करतात. आपण रात्रीचे कधी फिरावयास गेला तर त्या थकलेल्या माय माऊली रस्त्यालगतच्या फुटपाथवर बसलेल्या दिसतात. यांच्यासाठी देखील आसनव्यवस्था हवी आहे. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच मानाचं स्थान राहिले आहे. कारण ज्येष्ठ नागरिक हा प्रत्येक परिवाराचा अनमोल ठेवा आहे. खऱ्या अर्थाने आधारवड असतो. त्यांच्या छत्रछायेत लहानाचे मोठे झालेले आपण आहोत त्यांच्यासाठी आपण आसनव्यवस्था नक्कीच देऊ शकतो का ....? थंडीचा मोसम सुरु होत आहे. नागरिकांच्या प्रभात फेरी आणि शतपावलीला येणारांची संख्या काही पटीने वाढणार आहे. असे विधायक कार्य आपल्या हातून पार पाडावे ही आपल्या वरिष्ठांची इच्छा समजावी आणि माझ्या आत्मपरीक्षणाच्या लहरीतून उत्पन्न झालेल्या प्रस्तावाची दखल संबधितांनी घ्यावी. मला इतकेच म्हणायचं आहे की,
*SIR  &  MADAM,  YOU CAN DO IT...!*



अशोक भेके

No comments:

Post a Comment