बरेच दिवस मी स्थानिक लोकसमस्येवर लिहायचे टाळत होतो. मतभेद
होत होते ते म्हणजे आधणातले रडायचे अन सुपातले हसायचे....! शेवटी मीच माझ्या मनाला
आवर घातला. पण आज राणीबाग या प्रश्नावर अनेक मंडळीनी माझे डोके भंडावून सोडल्यामुळे
आज या विषयावर लिहायला घेतले.
१.
महापालिका प्रशासनाने पर्यटकांवर प्रवेशमूल्य वाढविले आणि कमी केले.
२.
प्रभातफेरी साठी प्रवेश मूल्य पाचपटीने म्हणजे मासिक १५० रुपये वाढविले. (
पर्यटकांचे कमी केले पण प्रभातफेरी नागरिकांना दिलासा का नाही...! )
३.
प्रभातफेरीसाठी आठवड्यातून बुधवार या दिवशी राणीबाग बंद ठेवण्यात आला.(
बुधवारी बाग परिसरात वाहनाची येजा चालते का..! )
४.
शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा मार्ग रोखला गेला. ( भायखळा येथे
जाणारे येणारे शालेय विद्यार्थी यांचा मार्ग रोखून प्रशासनाने काय मिळविले)
असे अनेक विषय घडत गेले पण आम्ही मुग गिळून गप्प बसलो. मुळात घोडपदेव समूहाने राणीबाग
या विषयावर अनेकदा लिहिल्यानंतर त्यामध्ये सुधारणांचे पाऊल उमटले गेले. लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह बंदिस्त अवस्थेत उभारण्याचे काम सुरु आहे. आज
महापलिका प्रशासनाने उत्तरेकडील छोटासा दरवाजा आजपासून बंद करण्यात केला.
कुणी सांगितले....?
वरून ऑर्डर आहे ...! हे उत्तर मिळाले
असा कोण वर आहे...! तो आमच्या घोडपदेव नारळवाडी फेरबंदर
भागातील नागरिकांच्या मुळावर उठला आहे. प्रभातफेरी साठी अनेक मान्यवर या बागेत
उपस्थित असतात. अनेक वृध्द माय बाप मंडळी कसरत करीत असतात. विविध वनस्पती आहेत त्या मोकळ्या
वातावरणात शुध्द हवेचा लाभ घेतात. कसं
ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे या बागेत अर्धांगवायू आणि मधुमेहाचे आणि
vertigo याचे रुग्ण येतात. डॉक्टरांचा सल्ला त्यांनी मोकळ्या वातावरणात चालावे.
जितके चालाल तितके बरे वाटेल म्हणून वेड्यासारखी आशा सुटेना, अन देव भेटेना म्हणून
आपले आयुष्य वाढविण्यासाठी चालतात. चालताना धडपडतात,पडतात. आज त्यांना हा बंद
दरवाजा सांगतोय ‘तुमचे अच्छे दिन सुरु झाले आहेत...!’ पश्चिमेच्या मुख्य
प्रवेशद्वारातून फक्त प्रवेश मिळेल. कोण घडवून आणत आहे हे सारे....! आमच्या
नागरिकांना त्रास देऊन काय मिळत आहे, समजत नाही. कोण अधिकारी आहे....त्याने
खुंट्याची सोडून झाडाला बांधली आहे. वरून सोज्वळ असतील पण आतल्या सावळ्या गोंधळाची
कल्पना आम्हाला देखील आहे.
हा बंद दरवाजा
आमच्या विभागीय नागरिकांना कायम सुरु राहिलाच पाहिजे.... तसेच बंद बुधवार हा पर्यटकांसाठी ठीक आहे पण
प्रभातफेरी नागरिकांसाठी नको. हे लक्षात घ्यायला हवे अन्यथा......स्थानिक
नागरिकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका.
अशोक भेके
घोडपदेव समूह
No comments:
Post a Comment