देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावलेला गिरणी कामगार म्हणजे या शहराचे वैभव. नारायण सुर्वे यांनी कामगारांना ‘तळपती तलवार’ म्हटले होते. ज्याला मुंबईत गिरणगाव म्हटले जायचे त्या गिरणगावात दोन अडीच लाख गिरणी कामगारांचा आवाज होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगार आणि शेतकरी सामील झाला नसता हा लढा किती परिणामकारक झाला असता, हा प्रश्नच आहे. हा लढा जागविण्याचे, गर्जत ठेवण्याचे काम या दोहोंकडून झाले म्हणून त्यांच्या गौरवार्थ हुतात्मा चौकात शेतकरी आणि कामगार हातात हात घालून उभे करावे लागले. तोच गिरणी कामगार १९८२ च्या संपात देशोधडीला लागला . गिरण्या बंद. कष्टकरीना उध्वस्त करणारे आपलेच नेते. केवळ डॉ. दत्ता सामंतांना संपविण्यासाठी गिरणी कामगार संपविला. हतबल कामगार आणि त्यांचे कुटुंब रेल्वे स्थानकाच्या बाजूला कुठे बोरं विक, भुईमुगाच्या शेंगा विक, कुठे केळी विक.. काही विचारू नका. आम्ही उघड्या डोळ्यांनी त्यांची वाताहत पाहिली. काय स्वप्न उराशी बाळगली होती. मुलगा- मुलगी शिकून डॉक्टर,वकील, इंजिनिअर,शिक्षक होतील. पण घरंदाज गिरणी कामगारांची मुले गुंड बनली. ज्या गिरणी कामगारांनी मुंबईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वाला दिशा दिली त्याच कामगारानी मुलांच्या भवितव्य अबाधित राहावे याखातर गाव गाठले.त्या उंचच उंच चिमण्या जमीनदोस्त झालेल्या आपण पहिल्याच आहेत. बारा महिने कामाला तेरा महिन्याचा पगार या गिरणी कामगारांमुळे बोनस रुपात मिळू लागला. एकीचे बळ निर्माण करून मुंबईच्या स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पेटविणारा कामगाराची या मुंबईतच सुरकुतलेल्या चेहऱ्यासह अखेर कशी झाली हे सुज्ञास सांगणे न लगे...!
गिरणी कामगारांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने मुंबईत त्यांचं हक्काचं घर असावे याखातर शासनाने त्यांना सन २०१२ ला ६९२३ घरे तर दोन महिन्यापूर्वी २६३४ घरे सोडत रूपाने वितरीत झाली. म्हाडाकडे १४८८६७ गिरणी कामगारांची नोंद आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की, खरोखर या नोंदीत तथ्य आहे का...? उध्वस्त गिरणी कामगार निवडताना कोणते निकष लावले गेले. सदनिका वितरीत करताना एका कामगाराला दोन दोन घरे वितरीत झाली हे असत्य आहे का...? सदनिका निकष लावण्याची किंवा कामगार पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाची होती.कोणत्या गिरणी कामगारांना घरे मिळायला हवी होती....! ज्या संपामुळे ज्या कामगारांच्या संसाराची राखरांगोळी झाली त्यांची की, जे आरामात सेवानिवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्त झाले त्यांना हक्काचं घर द्यायचा मनसुबा आखणारे धनी कोण....! असे अनेक प्रश्न आहेत. सर्वाना घरे द्यायला हवीत,या मताचा मी देखील आहे. पण उध्वस्त झालेल्यांना प्रथम तर उर्वरीताना दुय्यम स्थान द्यायला हवे होते.
माझगावच्या मफतलालचे अरविंदशेठ मफतलाल म्हणजे समस्तांचे गिरणी कामगारांचे दैवत. संप असो वा मुंबई बंद. ही गिरणी कामगारांनी सतत सुरु ठेवली. त्या मफतलालच्या नवीन मालकांनी म्हणजे वंशजांनी कामगारविरोधी पाउले उचलीत मिल बंद पाडली. किती तरी घोडपदेव, नारळवाडी आणि फेरबंदर भागातील कामगारांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम या मफतलालच्या लेकासुनांनी केले. चुली पेटेना, मुलंबाळ उपाशी... काही सुचेना...काय करायचं. निवेदन दिली मोर्चे झाले तरीही हातात दमडी मिळेना....आणि कुठे चाकरी मिळेना. गावी जावं तर आपले काहीच नाही.
कॉटन ग्रीन स्थानकात उतरत असताना प्लँटफॉर्म वर एक प्रेत आणून ठेवले होते.आत्महत्या केली म्हणून बोलले जात होते. घरी आलो तेव्हा समजले मफतलाल मिलच्या अनंत काळसेकर यांनी आत्महत्या केली.धक्का बसला. रात्रीचे ९ वाजले होते तेव्हा मी या घटनेचा वृत्तांत दैनिक सामना आणि दैनिक लोकमत मध्ये फोन करून कळविला. त्यांनी शहानिशा केली. त्यांनी मला फोन करून प्रेस मध्ये फोटो घेऊन यायला संगितले रात्रीचे ११ वाजता मयतघरी रडारड सुरु असताना त्यांचा फोटो कसाबसा मिळवून सोबत मफतलालचे श्री नंदेश नाईक यांना घेऊन सामना कार्यालयात पोहचलो. एका फोटोसाठी सर्व यंत्रणा थांबली होती. आम्ही गेलो फोटो दिला अन यंत्रणा कामाला लागली. दुसरीकडे दैनिक लोकमत मध्ये सुनील घुमे यांच्याकडे कामगार वृत्तांत सदर होते त्यांनी देखील रात्रीच्या बारानंतर विचारणा केली. सकाळी सामनात मुख्य बातमी आली. लोकमतने देखील या वृत्तांताची दखल घेतली विलासराव देशमुख सरकार हलले. मिल मजदूर संघाला जाग आली. शरद पवारसाहेबांना गहिवरून आले. आमदार बाळा नांदगावकरांनी विधानसभेत ठणाणा केला. कामगार आत्महत्येने मात्र वेग आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि शरद पवारसाहेबांनी मध्यस्थी केली अन १३ एकर जागेची विक्री मालकांनी मागितली त्यावर सदरहू जागेचे दोन हिस्से साडे सहा एकर करून अर्धा महापालिकेला आणि अर्धा मफतलाल समूहाला 50% TDR देण्याचे ठरले. पण त्यावेळेस त्यातील १/३ जागा म्हाडा आणि कामगारांना सरकारी धोरणानुसार सोडणे अत्यावश्यक होते. पण तसे काही झाले नाही अन कामगार घरापसुन वंचित राहिला. मफतलाल मिलचा कामगार गांजलेला आहे. मालकांनी त्याला तसे बनविले आहे. स्वत:मात्र त्या जागेत मोठे इमले बांधत आहे. तोच कामगार त्या वास्तूकडे ‘आ’ वासून पाहत आहे. मफतलाल कामगारांच्या जिवावर मोफत लालीलाल झाले अन तळपत्या तलवारीना म्यान करून टाकले आहे.
मफतलाल कामगारांना न्याय देणारा... त्यांची उरलीसुरली देणी देण्यासाठी... त्यांना घरं देण्यासाठी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न करणारा आज कोणी उरला नाही. या कामगारांचा उपयोग काही नेते अधिवेशनाच्या वेळी मोर्चे ... रस्तारोको करण्यासाठी चपखलपणे करतात. यांचं पुनर्वसन कोण करील जो या मिलच्या जागेवर सुरु असलेले काम कायदेशीर रीत्या बंद करील. कामगारही करू शकतो पण त्याचा आवाका इतका नाही. मालकाला ५० % TDR दिलेला कामगारांना द्या आणि या मुंबईत मफतलाल गिरणी कामगारांना तळपत ठेवा.
अशोक भेके
No comments:
Post a Comment