Tuesday, September 11, 2018

सोनारांचे कान टोचण्याची गरज.....!




कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. खरं आहे. सोने हे आपले सर्वांचे आकर्षण. एक चांगली गुंतवणूक म्हणून पाहताना आपण अन्य गोष्टींपैकी सोन्याला विशेष प्राधान्य देत आलो आहोत. दीर्घकाळात सोन्याचा परतावा योग्य येऊ शकतो या कारणास्तव सोने  म्हणजे भविष्यातले आपले तारणहार पण हिला निर्जीव गुंतवणूक म्हणू या ...! कारण या पासून आपल्याला व्याज असे काही मिळत नाही. विवाह कार्यात लेकी, सुना, नातवंडाना सोन्याचे दागिने देण्याच्या असलेल्या पद्धतीमुळे आपला ओढा सोन्याकडे अधिक असतो, हे तर सांगणे न लगे. परिस्थितीनुसार काही जन आपली हौस चांदीचे दागिने परिधान करून भागवतात. अडीअडचणीला स्वत:चे दागदागिने विकून घराला आíथक संकटातून खेचून बाहेर काढणाऱ्या स्त्रिया बघितल्या की सोन्याची ताकद काय ती समजते. सोने हे सौंदर्यवृद्धीसाठी आहेच शिवाय शरीरस्वास्थाची काळजी घेते व काही रोग बरे करण्यासाठी मदत करतात, अये आयुर्वेद सांगत आहे. परिधान केलेले सोन्याचे दागिने शरीरातील काही नलिका बिंदूवर दबाव टाकून मन व शरीर प्रसन्न  ठेवते. 
                     कान टोचावयास सोनारांची समस्त हिंदुना गरज सोनारांची पडते त्या सोनारांचे कान कोण टोचणार ....? हा प्रश्न नेहमीच आम्हांला पडतो. असे अनेक व्यावसायिक असतील त्यांच्या बाबतीत हेच घडत असेल. सोनार म्हणजे अर्थात ज्वेलर्स,  जे सोन्याचांदीची खरेदी विक्री करतात त्यांच्याविषयी माझ्याच नव्हे तर जनमनातले विचार प्रतिपादन करायचे आहेत. गल्लीबोळात असणारे विशेषत: घोडपदेव फेरबंदर विभागात नव्हे तर अन्य विभागात  व्यापाऱ्यांनी काय उच्छाद मांडला आहे तो केवळ गरीब आणि गरजवंत यालाच ठाऊक आहे. पण अडचणीचा फायदा घेऊन त्याची पिळवणूक करणारे हे सोनार. त्यांच्याकडून लुबाडणूक होत असूनही त्याच्याच कडे जाणारे खरेदीदार म्हणजे सर्वसामान्य अर्थात आपण मंडळी. 
मी एकदा आपल्या एका ज्वेलर्सकडून बारश्याला लहान मुलाला भेट देण्यासाठी लहान मुलाची २३ कॅरेटची अंगठी रोकड देऊन खरेदी केली. काही अवधीनंतर झवेरी बाजार मध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात कामासाठी बसलो होतो. तेथे सरसकट २२ कॅरेटचा व्यवहार चालतो. तेथे बसलेलो असताना मी घेतलेल्या अंगठीशी  तंतोतंत दिसणाऱ्या अंगठ्या काउंटर वर आल्या.  हजार दोन हजार अंगठ्याचा जुडगा मुंबईतल्या वेगवेगळ्या दुकानामध्ये वितरीत होणार होता. मी सहज त्याला बोललो ‘अरे यार मी अशी २३ कॅरेटची अंगठी कालच खरेदी केली.’ त्याने सांगितले शक्य नाही, या मालामध्ये २३ कॅरेट नसते. अरे मी तर २३ कॅरेटचे पैसे देऊन खरेदी केले. त्यावर हसत मला त्यांनी सांगितले, ‘तुला त्याने उल्लू बनविले.’ अरेच्या असं कसं होईल या मारवाड्यांना आपण आपले मानले आहे. ते आपल्याला कसे फसवू शकतील. म्हणून त्या प्रकारची अंगठी खरेदी करण्याच्या उद्देशाने अनेक दुकानात फिरलो आणि २३ कॅरेटच्या अंगठीची विचारणा केली पण कोठे ही आढळून आली नाही. मग मात्र माझं डोकं सैरभैर  झाले. पन्नास रुपये जादा गेल्याचे दु:ख नव्हते. फसविल्याची कळ सोसवत नव्हती. इकडे आमच्यासारख्यांना लुटायचं आणि सामाजिक, विधायक कार्यांना मदत केल्याचे चित्र निर्माण करण्यात यांचा हातखंडा. देणार तर हजार दोन हजार पण अशा थाटात देणार की, त्याने फार मोठे पुण्याचं काम केले आहे. 
गल्लीबोळात धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांविषयी माझे स्पष्ट मत आहे. त्यात काही चांगलेही असतील आणि काही चांगलेही नसतील. काही प्रामाणिक असतील तर काही लुटेरेही असतील. हे आपल्या सर्व सामान्य वर्गाला का लुटतात...?  तरीही लुट होत असूनही आपला माणूस त्यांच्या दुकानाची पायरी का चढतो....? या प्रश्नाच्या मुळाशी गेलात तर हे व्यापारी काही महिन्यासाठी उधार देतात, तगादा लावत नाहीत. घडणावळ बाहेरच्या व्यापाऱ्यापेक्षा कमी असते. व्यापाऱ्याकडून ग्राहकाला मिळणारे अवास्तव महत्व आणि त्याला हुरळून जाणारा ग्राहक. आणि उद्या गहाण अथवा मोडण्याची वेळ आली तर दूर जायला नको. अशी आपण स्वत:हून ओढवून घेतलेली  कारणे. एका विशिष्ट प्रांतातल्या लोकांनी आपल्या जीवावर कसे इमले बांधलेत, याचं तर वर्णन करावयास नको. 
सोने खरेदी करताना तुम्हाला सोन्याची शुद्धतेची हसत हसत शाश्वती देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या बोलण्यात दुट्टपीवृत्ती भरलेली असते. यांच्याकडून घेतलेले सोनं काही दिवसात काजळी चढल्याप्रमाणे का दिसते. २३ कॅरेटच आहे मग त्याप्रमाणे ते देतात का...! किती मिलावट असते,याचा विचार कोणीही करीत नाही. मग तुम्ही मोडावयास गेल्यानंतर कपाळावर हात मारून घेता की नाही. एकूण एका तोळ्याच्या मागे १  ग्राम घट धरली जाते ती  काय म्हणून...! काही  मारवाडी १ ग्राम घट धरूनही एकूण चालू भावाच्या १०% कमी दर त्या व्यक्तीच्या गळी उतरवितो. वाहन घसारा किंवा इलेक्ट्रोनिक्स वस्तूवर घसारा मान्य आहे. या सोन्यातल्या घट विषयी व्यापाऱ्यांची उद्दामगिरी आपण खपवून घ्यायची.  आपले लोक काही पैसे वाचविण्यासाठी बिल घेत नाहीत. मग त्यांना आयती संधी चालून येते. ज्या दुकानात सोने घेतले त्यांनी त्या दिवसाचा पूर्ण भाव आहे तो द्यायलाच हवा. ही त्याची जबाबदारी आहे . त्याने जबाबदारी असून दूर पळता कामा नये. 
आपली माणसं देवभोळी आहेत. हल्ली दुकानात सोन्या चांदीच्या देवादिकांच्या नाणी, मुर्त्या आहेत. त्यामध्ये मिलावट असूनही व्यापारी सांगेल त्या भावाला खरेदी करतो. देव्हाऱ्यात ठेवा काही दिवसात काळ्याभोर पडतात. तरीही उजेडात सरळ फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा उदोउदो आपणच करतो.  या व्यापाऱ्यांच्या उद्यमशीलता वाढीसाठी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ सतत असतो पण दिसत नाही. प्रचंड संयम व कौशल्य आणि दुधात साखर म्हणुन त्यांस लागणारा अपार गोडवा जो मुळातच केवळ आतच नाही तर जिभेतुन पाझरत असतो. 
काही ग्राहक क्रेडीट कार्डाचा वापर करून सोने घेतात तेव्हा काही मारवाडी त्यावर काही टक्के अधिक रक्कम  उकळतात. सोन्याचांदीची किती मोठमोठी दुकाने आहेत . त्यांच्या दुकानात असं घडत नाही मग हे गल्लीबोळातले महाभाग आपल्या  भोळ्याभाबड्या माणसांना का फसवितात...? त्यांच्या अनैतिक  व्यवहाराला कसा लगाम घालता येईल, हे  ग्राहकच ठरवू शकतो. 
                                                                                           

अशोक भेके

No comments:

Post a Comment