काल परवा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोककला अभ्यासक, उपासक आणि व्रतस्थ *श्री प्रकाश खांडगे* यांना *शिवनेरी भूषण* या पुरस्काराची घोषणा झाली. मनस्वी आनंद झाला. या घोडपदेवच्या भूमीत ज्यांनी आपले बालपण व्यतीत केले इथल्या मातीशी निगडीत राहिले असे श्री. प्रकाश खांडगे....! जेव्हा जेव्हा घोडपदेवशी ज्यांची नाळ जुळलेली आहे, त्यांना अत्युच्च शिखरावर विराजमान होताना पाहिले की, तमाम घोडपदेवच्या जनतेला अभिमान वाटतो. श्री. प्रकाश खांडगे यांनी देखील आपल्या लोककला या विषयावर संशोधन करीत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. लोककलावंताच्या कल्याणासाठी झटणारा, त्यांचा मार्गदर्शक, लोककलांचा अभ्यासक, लोककला यशस्वी संयोजक अशा अनेक भूमिका निभावत त्यांनी योगदान दिले आहे. कलावंताना पेन्शन मिळवून देण्यासाठी असो वा कर्जबाजारी विठाबाई नारायणगावकर यांना कर्जमुक्त करण्यासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. अशी माणसं आपल्या घोडपदेव मध्ये राहिली कर्मभूमी मानली, हा हेवा वाटतो.
डॉ. खांडगे यांचे मुळगाव पुणे, जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव. घरची वारकरी परंपरा होती. वडील ह.भ.प. सहदेवबाबा खांडगे कीर्तनकार.त्यामुळे त्यांना संत आणि लोकसाहित्याच्या अभ्यासाची गोडी लागली.
नृत्य, गायन, अभिनय अशा विविध माध्यमांमधून मराठी रंगभूमी बहरली. यामध्ये लोककलांचेही मोलाचे स्थान आहे. महाराष्ट्राने लावणी, भारुडांपासून डोंबाऱ्याच्या खेळापर्यंत अनेक लोककला जोपासल्या. मात्र यातील प्रत्येकाला नागरी जीवनाशी जोडून घेणाऱ्या लोककलेचे स्वरूप मिळाले नाही. या प्रयोगात्मक लोककलेची ओळख त्यांनी करून दिली. चाळ माझ्या पायात हे डॉ खांडगे यांच्या लेखणीतून उतरून वाचकांच्या मनात घर करून गेले.
डॉ.प्रकाश खांडगे सध्या ठाणे येथे वास्तव्य करतात. ते शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठाचे समन्वयक आहेत. त्यांनी पस्तीस वर्षे लोकसाहित्य, लोककला क्षेत्रात संशोधनाचे कार्य केले. प्रकाश खांडगे यांना 'खंडोबाचे जागरण' या ग्रंथासाठी महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ट ग्रंथ संशोधन पुरस्कार' (ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार) प्राप्त झाला आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोककलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 'कलादान पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. त्यांनी अमेरिका आणि चीन येथील आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य व लोककला परिषदांमध्ये शोधनिबंध वाचन करून भारताचे प्रतिनिधित्व केले. खांडगे यांनी मुंबई विद्यापीठात लोककला अकादमी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. ते मुंबई विद्यापीठात अकरा वर्षे सहयोगी प्राध्यापक होते. त्यांची 'चाळ माझ्या पायात', 'खंडोबाचे जागरण', 'भंडार बुका', 'नोहे एकल्याचा खेळ' अशी चार पुस्तके, तर 'गर्जा महाराष्ट्र माझा', 'लोक लेणी' व 'लोकमुद्रा' ही तीन संपादने प्रकाशित आहेत. प्रकाश खांडगे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता', 'लोकमत', 'सकाळ', 'पुण्यनगरी' आदी वृत्तपत्रांतून सदरलेखन केले आहे.
डॉ. खांडगे यांचे *घोडपदेव समूह* अभिनंदन करीत आहे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा..!
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment