![]() |
मागच्या आठवड्यात ‘दैनिक शिवनेर’ मध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते . मुंबईतील वरळी भागातील सेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी मुंबई सारख्या शहरी भागात आपल्या स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा करीत कॉलेज समंत करून घेतेले. यानंतर छानश्या प्रतिक्रिया उमटल्या. विशेष अभ्यासक्रम यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना विभागाबाहेर आधार घ्यावा लागत असे. प्रवेशप्रक्रियेसाठी आमदारांना धावणे आलेच. पण धडपड करून त्यांनी त्यांच्या विभागासाठी आणलेली कौतुकाची वेल समृध्द केल्याशिवाय राहणार नाही. लोकप्रतिनिधी असा असावा, हे मी तरी कौतुकाने म्हणेन. ग्रामीण आणि शहरातील शिक्षण सम्राटानी मांडलेल्या शैक्षणिक बाजाराला किंचितसा लगाम….!
सध्या सर्वच स्तरातून सोशल मिडीयावर गणपत ( आबा) देशमुखांच्या बाबत फार कौतुकास्पद लिहिले जात आहे. अलौकीक व्यक्तीमत्व .... लोकप्रतिनिधी कसा असावा यांचे उदाहरण. पैसा खर्च न करता निवडणुकीत दणदणीत मताधिक्याने भला माणूस १२ वेळा विधिमंडळात निवडून आला. सलग ९ वेळा म्हणजे एकूण ४५ वर्षे नगरसेवक पद भूषविलेल्या वरळीच्या मणिशंकर कवठे विषयी आजही समस्तांच्या मनात अभिमान जागृत होतो. डोंगराएवढं काम करून या माणसांनी मी केलं. कधी म्हटले नाही. पूर्वी लोकप्रतिनिधी ज्येष्ठ, अनुभवी, आणि साधारणत: नागरिकांच्या सुखदु:खाशी एकरूप आणि समरस होत असत. त्यांचेही समाजकारण आणि संस्थात्मक राजकारणात लक्ष असे. मंडळाचा अध्यक्ष सचिवही कोण असावा याचा बारीकसारीक विचार करीत असत. कारण संस्था कारभारात स्वच्छ व पारदर्शकता हवी आणि त्यासाठी त्या संस्थेवर आस्था असणारी माणसे असायला हवी. हे धोरण मनात असे. आपली नेमकी कर्त्यव्ये काय आणि नागरिकांना आपल्याकडून काय अपेक्षी आहे, याची जाण होती. गावपातळीवर अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत की, प्रचार न करता निवडून येतात. मतदार प्रचार करून तन मन धन अर्पून निवडून आणतात. त्यांच्या योगदानाची, त्यांच्या कार्याची पोचपावती मतदार स्वखुषीने बहाल करतात. बॅ. नाथ पै, मधु दंडवते, रामभाऊ म्हाळगी, बापूसाहेब काळदाते, मृणालताई, सुधीरभाऊ जोशी, हेमचंद्र, गुप्ते, प्रमोद नवलकर, बी. डी. झुटे,केशवराव धोंडगे, अहिल्याताई, यांच्यासारखे सज्जन, चारित्र्यवान, प्रामाणिक लोकप्रतिनिधी अव्वल दर्जाचे संसदपटू वर्तमानकाळात दिसत नाहीत.
आजचे लोकप्रतिनिधी असं का करीत नाहीत. ठळक दिसणारे काम त्यांच्याकडून का होत नाहीत. केवळ घरगल्ल्या दुरुस्ती, रस्ते डांबरीकरण, कुठेतरी रस्तोरस्ती शेड बांधायच्या अन वाचनालयाचे स्वरूप द्यायचे. ही कामे म्हणजे भविष्यात कोणी नांव काढणार नाही. आपल्या एका कामाने हीच पिढी काय भविष्यातील पिढीने देखील नांव काढले पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना काय हवं काय नको...! असे विषय विचारात घेणे अगत्याचे आहे. एक लोकप्रतिनिधी त्याच्या मतदारसंघात काय करू शकतो. त्याच्या मनाला हवं तसं चित्र बदलू शकतो. आपल्या विभागात शुभ मंगल कार्यालय याची गरज आहे का ...? मेरी मर्जीनुसार हवं तसं लुटणाऱ्या मंगलकार्यालयाविषयी काय प्रतिपादन करायचे. भटजीपासून आचारी आणि तत्सम विविध गरजा लक्षात ठेऊन चालविलेल्या एकाधिकारशाहीविषयी.... हॉल पाहिजे असतो सोबत ते सांगतील त्या दरानुसार आपण आपली गरज म्हणून बोकांडी बसून घेतो. माझ्या विभागात तीन जमाती नवीन आल्या. मंदिर, समाजमंदिर, हॉल निर्माण झाले. आम्ही मात्र कोरड्या पाषाणाप्रमाणे पाहत राहिलो. आज मुंबईत प्रत्येक विभागात कॉलेज दिले तरी कमीच आहे. आज मुंबईतील मुले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षण घेत आहेत.माजोर शिक्षण सम्राट मंडळीना दणका देण्यासाठी स्थानिक विभागवार कॉलेज निर्मिती केली तर किती खर्च वाचेल याचा अंदाज कोणी घेतला आहे का....? महापालिका शाळा ओस पडत चालल्या आहेत. शालेय वास्तूत हॉल निर्मिती करता येऊ शकते. पालिकेचा महसूल वाढू शकतो. विचार करायला काय हरकत आहे.
निवडणुकीच्या काळात आपल्या पाठीराख्यांसमवेत सातत्याने दिसणारे आणि निवडून आल्यानंतर वर्तमानपत्रातील बातम्या,कार्य अहवाल, दिनदर्शिका प्रकाशन, दिवाळीत उटणे वाटप, या सारख्या तत्सम कार्यक्रमापुरते राबणारे, धडपडणारे लोकप्रतिनिधी अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. एका विभागात एका लोकप्रतिनिधीने हेर मंडळ नेमले आहे. कोणी बांधकाम सुरु केले की, साहेबांच्या कानावर बित्त बातमी पोहचवायची. साहेब संबधितांना सांगून नोटीस काढीत. शेवटी नागरिक साहेबांकडे विभागीय कार्यकर्त्याला हाताशी धरून जात असे. मधल्यामध्येच खिचडी तयार होई अन बांधकाम तोंडी परवाना बहाल केला जात असे राजकीय उत्कर्ष आणि दबदबा निर्माण करण्यासाठी विभागवार असं केले जाणारच. यामागची कारणे म्हणजे आजची पिढी. त्यांना विभागाचा विकास नको असतो. त्यांना केवळ साहेबांकडून ‘डोनेशन’ हवं असतं. गोविंदा असो वा गणपती, नवरात्र असो वा दिवाळी साहेबांनी या वेळेस काही तरी चांगलं दिले पाहिजे. साहेबाना देखील हेच हवं असतं. लोकप्रतिनिधींचा तरुण वर्गाला
आकर्षित करण्याचा एकमेव धंदा,
कामं करण्याऐवजी वाटा चंदा...!
हे पण तात्पुरत्या काळापुरते मर्यादित असते. निवडणुकीत अधिक माया देणाऱ्या उमेदवाराची तळी उचलतात. तो निवडून येवो अगर न येवो. मतदारसंघाचा विकास येथेच खुंटतो. निवडणुकीत वारेमाप पैश्यांची झालेली उधळण भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आपली काही वर्षे खर्च घालतो अन तो पर्यंत मुदत संपलेली असते.
पण आताचे लोकप्रतिनिधी वेगळेच. काही लोकप्रतिनिधींचा बडेजाव, त्यांचं वैभव आठवलं. हा नेता म्हणजे हाताच्या किमान आठ बोटात अंगठ्या, मनगटावर जाडसर ब्रेसलेट,आणि गळ्यात दोरखंडासारखी चैन, डोळ्याला ली भारी दिसणारा गॉगल, दिमतीला सफारी किंवा स्कार्पियो हा त्याचा ट्रेडमार्कच . सोबत भाई आणि भाऊ म्हणजे सुरक्षिततेचे कवच घेऊण जनमनावर प्रभावी दर्शन घडविणाऱ्या लोकप्रतिनिधी यांचे आजचे रूप किंव करण्याजोगे आहे.
आजच्या लोकप्रतिनिधी कडून फार काही नाही पण त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख भविष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जावो. हे अगदी मनापासून वाटते , हे मलाच वाटत नाही तर समस्त लोकशाहीनुसार विश्वासाने आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारराजाला वाटत आहे.
अशोक भेके
No comments:
Post a Comment