Tuesday, September 11, 2018

घोडपदेव कामगार कल्याण केंद्र


            लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले त्या क्रित्येक प्रसंगाची, व्यक्तीची, व्यंगाची, चालीरीतींची  असो वा वास्तूची...अनेक प्रतिबिंब मनात कोरली गेलीत. मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेल्या गोष्टी मनात फेर धरू लागल्या की, कागदावर झरझर उतरत जातात. असंच आमचं घोडपदेव कामगार कल्याण केंद्र....! मला या केंद्राविषयी आपुलकी आहे. घोडपदेवच्या कामगार वस्तीत या केंद्राचे मोलाचे योगदान. जनमनात हे केवळ कामगारांसाठी असल्याची भावना आहे. त्यामुळे अन्य वर्ग त्याकडे आकर्षित झाला नाही किंवा तसा प्रचार झाला नाही. घरात वर्तमानपत्र येत नव्हते तेव्हा या कामगार कल्याण केंद्राचा आधार होता. घरात दूरदर्शन संच नव्हता तेव्हा याच केंद्राने आधार दिला होता. रेडीओ ऐकण्यासाठी देखील केंद्राच्या अवती भवती गर्दी असायची. तेव्हा परिस्थिती तशी होती. आज नाही त्यामुळे नवीन पिढी त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे आज ना उद्या या केंद्राचा गाशा गुंडाळला जाईल, अन डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ येईल. ही खंत बाभळीच्या काट्याप्रमाणे बोचत आहे.      
            युतीच्या राजवटीत मी एका वर्तमानपत्रातून घोडपदेवच्या कामगार कल्याण केंद्राची दुरावस्था या विषयावर लिहिले तेव्हा तात्कालीन संचालक स्व. सदा कामतेकर यांनी दोन लाख मंजूर करून केंद्राचे नुतनीकरण करून घेतले. तत्परतेने कार्यवाही करीत माझ्या मनातल्या भावनेला स्पर्शून जाणारा दुवा हे कामतेकर ठरले.  बरं वाटलं, नाहीतर कितीही खर्डेघासी केली तरी कोणी विचारत नाहीत तर दखलही घेत नाहीत. अशा या कल्याण केंद्रात त्या दिवशी सहज जाणे झाले. आढावा घेतला. कसे चालले आहे आपले कल्याण केंद्र....! तेथे श्री चिंतामण खेडेकर नावाचे संचालक आहेत. सतत नावाप्रमाणे चिंता, कष्ट आणि बुद्धीचा सुरेख संगम साधून  सुयोग्य पद्धतीने कल्याण केंद्र चालविणारा मराठा गडी. मुखातली भाषा साधी सोपी. रसाळ आणि प्रासादिक. अविश्रांत सेवा करणारा आणि अनेक योजना घोडपदेव सारख्या प्रभागात राबविणारा....! विविध उपक्रमाची गंगा आणून त्याने आपल्या श्रमजीवी नागरिकांची सेवा केल्याबद्दल आम्हाला त्यांच्याविषयी अभिमान आहे. सहसा सरकारी नोकर वर्गाविषयी जनमनात सहानुभूती नसते. पण या माणसाविषयी लोकमनात आदराची भावना दिसून आली. या माणसाने या गिरणगावात आपल्या केंद्राला चौथ्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे.अनेक स्पर्धांमध्ये घोडपदेव विभागाचे प्रतिनिधित्व घडवून आणले आहे. एकदा प्रकाश पवार लिखित *वलय* नाटक प्रसंगी नाट्य अभिनेत्री अचानक आजारी पडलेली असताना एका रात्रीत दुसरी अभिनेत्रीला तयार करून आपल्या विभागाचे नांव राखले होते. विशेषत: सदर अभिनेत्रीला काहीही सराव नसताना तयार करणे साधी सोपी गोष्ट नाही. असा हा साधा माणूस....  स्वत:च्या खिश्याला कात्री देत त्याने सभासद करून घेतले आहे. माणूस फार श्रीमंत नाही पण त्यांची कामगिरी गौरवास्पद आहे. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र दरवर्षी गुणवंत कामगार पुरस्काराच्या खिरापती वाटत असते पण आपल्यातल्या माणसाना ते कधी पुरस्कार घेत नाहीत.विभागात अनेक मान्यवरांचे सत्कार सोहळे आपण पाहतो पण जे खरोखर आपल्या घोडपदेवच्या नावासाठी अविरत कष्ट घेतात त्या सामन्यांचा यापुढे आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल. त्यांना पैसा नको असतो.केवळ शाबासकीची थाप हवी असते. श्री. चिंतामण खेडेकरयांचा  आमच्या  समूहाला सार्थ अभिमान आहे.
                                    घोडपदेव कामगार कल्याण केंद्र सरस्वतीचा वास असलेले मंदिर.या मंदिरातील वाणीची देवता. तिच्या योगे विद्या प्राप्त होते. त्या विद्यादायिनीच्या कृपाप्रसादामुळे अनेक संसार कसे फुलले आहेत, याचं वर्णन कसे करू...?  समजत नाही. छोटी छोटी इवलीशी मुलं तेथे प्रारंभीच बालवाडी शिक्षण घेतात ते खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षणाचा पाया रोवतात. येथूनच त्यांना मार्ग दिसतो त्या उंच उंच शिडीवर चढण्याचा..!  तेथे महिलांसाठी शिवण वर्ग सुरु आहेत. वार्षिक वर्गणी रुपये ३५०/ फक्त आकारली जाते. आज घरातली स्त्री चूल-मुल सांभाळून घरातल्या घरात शिवणकाम करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्या व्यतिरिक्त महिलांनी आपल्या पायावर उभे राहावे म्हणून उशा बनविणे,बँगा बनविण्या सारखे गृहोद्योग शिकविले जातात. महिलांसाठी नवीन उपक्रम म्हणजे वाहन चालक प्रशिक्षण सुरु केले आहे. काय हवं अजून. भविष्याची काळजी घ्यायला शिकविते कामगार कल्याण केंद्र. विभागात कंपनी आणि आस्थापनेत काम करणारे हजारो नागरिक या परिसरात राहत असतील. आपल्या पगारातून जून आणि डिसेंबर च्या पगारातून १२ रुपये कापून जात असतील. त्यांनी या केंद्रात येऊन काय सुविधा उपलब्ध आहेत याची शहानिशा करून घ्यायला काय हरकत आहे . मुलांना पाठ्यपुस्तक दिली जातात. शिष्यवृत्ती दिली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गौरविले जाते. कामगारांच्या सहलीचे प्रयोजन केले जाते. विविध उपक्रम आहेत. लिहायला पाने अपुरी पडतील, इतके उपक्रम आयोजित केले जातात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आला आहात. काही मुले खेळण्याचा आंनद लुटू शकतात. मुले बुद्धिबळ,कॅरम सारखे बैठे खेळ खेळताना दिसत असतील. काही जन कामगार नसतील धंदेवाईक असतील त्यांनाही या कामगार केंद्रात सभासद होता येते. केवळ २५ रुपये वार्षिक वर्गणी भरावी लागेल  म्हणजे महिन्याला आपले दोन रुपये या कामगार कल्याण केंद्रासाठी खर्च होतील.
                        माझी आपणां सर्वांना विनम्र विनंती आहे की, कृपया आपण एकदा या कल्याण केंद्रात जाऊन तेथे सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती घ्या...! पटले तरच तेथे सभासद व्हा. हानिकारक नक्कीच नाही. कारण जितके सभासद जास्त, तितक्या सुविधा अधिक मिळतील. उलट आपल्याला त्याचा लाभ आवर्जून घेता येईल. असे कामगार कल्याण केंद्र आहे.                                                                                   

                                                                                                         

               अशोक भेके 

टिप्पण्या


No comments:

Post a Comment