Tuesday, September 11, 2018

आठवणीतील माणसं : हुतात्मा बाबू गेनू सैद



                 

                   दरवर्षी म्हाळुंगे पडवळ,ता. आंबेगांव, पुणे  येथून हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानची ती आबालवृध्द  मंडळी वाजत गाजत  ज्योत यात्रा घेऊन येत असतात.स्वागताला आम्ही असतोच.*श्री ज्ञानेश्वर गभाले, श्री पंडित आवटे, श्री दत्ता आवटे* ही मंडळी सर्व स्वागताची व्यवस्था पाहतात. हुतात्मा बाबू गेनू  वास्तव्य करीत असलेल्या चास्कर चाळीतील त्या खोलीत प्रतिमेचे पूजन करतात आणि परततात. आज ही वास्तू पुनर्विकासाच्या मार्गावर आहे. काही दिवसांनी या देशभक्ताची वास्तू  दिसणार नाही. त्या जागेवर टोलेजंग टॉवर दिसतील.ज्या अभिमानाने आपण हुतात्मा बाबू गेनुचा उल्लेख करीत होतो. सर्वश्रेष्ठ असा हुतात्मा बाबू गेनू होता. इतर देशभक्त आणि बाबू गेनूच्या बलिदान या फरक आहे. त्या वास्तुत त्याची स्मृती चिरंतन कायम तेवत  राहावी. येणाऱ्या  पिढीनेही त्यांचे गुणगान गांवे. कारण  मुंबई शहराला घोडपदेवचे नांव प्रकाशझोतात  कुणामुळे आले असेल ते हुतात्मा बाबु गेनू सैद यांच्यामुळे. अगदी अलीकडे शाहीर शंकरराव धामणीकरांचे लिहिलेले एक साहित्य हाताशी लागले. त्यामध्ये पोवाडा आणि त्या काळबादेवीच्या प्रसंगाचे वर्णन होते. बाबु गेनुचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे थोडे दुर्लक्ष करीत होतो. बाबु गेनू इतर क्रांतिकारकापेक्षाही श्रेष्ठ मानला पाहिजे. कारण क्षणात आपल्या देहाचा त्याग करणारा क्रांतिवीर होता.
          भीमाशंकर व शिवनेरीच्या पावन भूमीत जन्माला आलेली दोन नररत्ने. त्यापैकी एक निस्वार्थ देशप्रेमी अण्णासाहेब आवटे आणि हुतात्मा बाबु गेनू सैद. अण्णासाहेब आवटे आंबेगाव तालुक्याचा केलेला कायापालट कायम स्मरणात राहावा. असाच आहे. आम्ही लहान असताना मंचरला आठवडी बाजाराला गेलो की, पाणी ५ पैसे  ग्लास मिळत असे. तेथे आज सुजलाम सुफलाम झाले आहे. ते केवळ अण्णासाहेबांमुळे. जसं घोडपदेवचं नांव उंचावले गेले तसेच बाबु गेनू मुळे म्हाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव जिल्हा पुणे नांव इतिहासात नोंदविले गेले ते आपल्या हुतात्मा बाबु गेनू सैद मुळे. १९०८ साली वडील ग्यानबा आणि आई कोंडाबाई यांच्या पोटी जन्माला आलेले हे नररत्न.  देशसेवेला आपला प्राण समर्पित करणारा एक मोहरा स्वदेशी चळवळीतील घोडपदेव सारख्या कामगार वस्तीत आपल्या भीमा नावाच्या बंधू बरोबर चास्कर चाळीत राहत होता. गिरणीत कामाला होता. अभिमान वाटतो आज आम्हाला. घोडपदेवच्या कुशीत जन्माला आलेला देशभक्त त्यांच्या बलिदानाने भाग्यवंत ठरलेला माझा घोडपदेव. आम्ही त्यांना पाहिले नाही. घोडपदेवच्या मातीला वास आहे, सुगंध आहे शौर्याचा. पण त्यांना जवळून पाहणारी काही माणसं आजही घोडपदेव मध्ये वास्तव्यास आहेत. ती मंडळी  लहान असताना घडलेल्या या बलिदानानंतर घडलेल्या गोष्टींचे कथन करतात किंवा *लोकशाहीर शंकरराव धामणीकर*  वर्णन करीत  तेव्हा ऐकून डोळ्यांच्या किनार ओलावत असत. त्यात शाहिरांच्या पोवाड्यांनी शरीरात रक्त सळसळते.
                   वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात बाबू गेनू पकडला गेला. ती जुलमी राजवट  ब्रिटीशांची. सक्तमजुरीची सजा ठोठावली. सजा भोगून आल्यानंतर बाबु गेनुला महात्मा गांधीनी दिलेली स्वदेशी चळवळीची हाक ऐकू आली. २२ वर्षाचा खमीस धोतर घालणारा सडपातळ मराठा काळबादेवीला धावला. आपल्या देशातला कापूस नेऊन त्याचे कापड आपल्या देशात विकणाऱ्या गोऱ्यांच्या मालावर बहिष्कार टाकण्यासाठी संपूर्ण हिंदुस्थान खवळला. विदेशी मालाच्या गाड्या मुळजी जेठा, भुलेश्वर येथून रवाना होणार असल्याची कुणकुण कॉंग्रसला लागली होती. त्यामुळे स्वयंसेवकाचे जथ्ये भुलेश्वरला जमू लागले होते. जनसागरला लोटला होता. विदेशी मालाची पहिली गाडी आली. ‘ भारतमाता की जय’ घोषणा निनादली.काळबादेवी नाक्यावर गाडी अडविली गेली. तरीही ड्रायव्हर गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा आपल्या बाबू गेनुनी त्या रस्त्यावर लोळण घेतली. निजला भारतमातेच्या मांडीवर.  पोलीस खेचत होते पण बाबु गेनू तरणाबांड गडी त्यांना ऐकत नव्हता. ड्रायव्हरच्या बाजूला सायबा ओरडला, ‘गाडी चालवं ...अंगावर घाल’. तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, ही आमचीं माणसं... कशी घालवू अंगावर साहेब. तसे त्यांनी त्या ड्रायव्हरला ढुंगणावर लाथ मारली आणि ड्रायव्हर गाडी बाहेर जाऊन पडला. तो उद्दाम गोरा स्वत: गाडी चालवायला बसला. भारतमाता की जय घोषणा सुरु होती. बाबु गेनू रस्त्यावर पडून होता. सायबाचा राग अनावर झाला, रागाने लालबुंद झाला होता. आणि गाडी सुरु झाली. भरधाव वेगाने गाडी सुरु केली अन बाबु गेनूच्या अंगावरून तो महाकाय ट्रक रक्ताच्या चिळकांडया उडवीत गेला. देहाचे तुकडे तुकडे झाले होते. बाबु गेनू देशासाठी हुतात्मा झाला. हसत हसत मरणाला सामोरा गेला. भारतमातेसाठी बलिदान दिले होते. सारा देश हळहळ करीत होता.  तो दिवस १२ डिसेंबर १९३० होता. त्यादिवसानंतर खऱ्या अर्थाने इंग्रजांना *चले जाव* करणारा समुदाय संघटीत झाला आणि गोऱ्यांशी  असहकाराने वागू लागला.  प्रचंड मोठी प्रेतयात्रा. मुंबईत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. त्या दिवशी प्रेतयात्रेला आलेल्या समुदायाला पाणीही मिळेना. एकेक माणूस दांतओठ खात इंग्रंजाविरुध्द संताप व्यक्त करीत होता.  बाबू गेनूच्या तिरडीवर हारफुलांच्या राशी पडत होत्या.दु:खी अंत:करणाने बाबू गेनुला अखेरचा निरोप दिला.
          इतकेच मला सांगायचे आहे की,  हुतात्मा बाबु गेनू अमर रहे ......!

अशोक भेके

No comments:

Post a Comment