Sunday, September 16, 2018

कार्यकर्ता येणार का आपल्या घरी.....?


मी नेहमी अनेक विषयावर लिहितो, तेव्हा कायम टीकात्मक लिहितो असा काहींचा आक्षेप आहे. कोणी म्हणतं मला नकारात्मक दिसतं. पण माझे प्रांजळ मत सांगतो,लिहिताना मी कुणा एकाला लक्ष्य करत नाही. सुचलं की लिहितो. सोशल मिडियावर म्हणजे फेसबुक अथवा व्हाटसअप वर काही दिवसापूर्वी घरघंटी आणि शिलाई मशीन स्वयंरोजगारासाठी महिलांसाठी शासकीय अथवा पालिकेच्या विविध योजनांच्या जाहिराती पोस्ट केल्या, अन आपल्या जबाबदारीचा गाशा गुंडाळला. आपल्या विभागात किती लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतात याचा कोणी ठाव घेत नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी केवळ एक गरजू महिलेला या योजनांचे लाभार्थी बनविले तर किती संसार फुलतील. किती आशिर्वाद, शुभार्शिवाद तुमच्या पाठीशी मिळतील याची मोजदाद करता येणार नाही. त्यांनी अर्ज आणायचे त्यांनीच भरायचे त्यांनीच सारे काही करायचे. दिखावा आपण का करायचा ...! न्यायालयाने फटकारले अन फ्लेक्स जवळ जवळ बंद झाले आणि ते खर्चिक ही होते. त्यामुळे कार्यकर्ता सोशल मिडिया सारख्या प्रभावशाली प्रसारमाध्यमांचा आसरा घेऊ लागला. मला याबाबत इतकेच म्हणायचे आहे की, आपल्या पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहचायला हव्यात. ज्यांना खरोखर गरज आहे त्या गरजवंत मोबाईल वापरत असतील का....! जर वापरत असतील तर सोशल मिडिया सारखं साधन त्यांच्याकडे उपलब्ध असेल का ....! यासाठी कार्यकर्ता हा गोरगरीबांच्या घरी गेला पाहिजे किंवा वस्ती, विभागामध्ये एखादे टेबल टाकून ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले तर या योजना घरादारापर्यंत पोहचतील.त्यामुळे कार्यकर्ता घरोघरी जाईल लोकांशी सुसंवाद वाढेल.
विभागपातळीवर किती निराधार मंडळी आहेत. त्यातले संजय गांधी निराधार योजना मध्ये किती लाभार्थी आहेत. कुणाला दोष देणे गैर आहे, पण माणसं आपल्याकडे येत नाहीत तर आपण माणसाकडे जावे अन त्यांना प्रोत्साहित करावे.समाजाची सेवा करताना अहंमपणा सोडायला हवा. हल्ली किती तरी आपल्या माय भगिनी पोळी भाजीचा व्यवसायात मन रमवू लागल्यात.कोणी कारखान्यातून घरी कामे आणतात आणि उदरनिर्वाह करतात. भाजीचा धंदा करतात. काल एका घरात जाने झाले. त्या छोट्याश्या घरात बरीचशी मंडळी राहत होती पुरुष एकच पण महिला अधिक, त्या घरात एक वृध्दा अंथरुणाला खिळून आहे.आजाराने कृश झालेली पाहिली जेमतेम तिचे वजन केले तर दहा किलोही भरणार नाही.किलकिल्या डोळ्यांनी पांघरूनातून पाहत होती. मनाला वेदना झाल्या. त्यांना गरज आहे आपल्या मदतीची.
मध्यंतरीच्या काळात कोणत्या तरी निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीसाठी काही कार्यकर्ते घरोघर फिरत असताना दिसले. बरं वाटले मनाला. कार्यकर्ते पक्षासाठी काम करणारे पाहतो पण तेच जर गरजवंताना हवा असलेला कार्यकर्ता अपेक्षित आहे. ‘ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के’ असं म्हणताना समाजाची दशा आणि दिशा ठरविताना सर्व सामान्यांना अपेक्षित असलेला कार्यकर्ता हवा आहे. आपण एखादी योजना सांगायची अन ती लोकांपर्यंत पोहचत नसेल तर त्याला काय अर्थ आहे का...! घरादारात ज्याला कार्यकर्ता म्हटले जाईल तो कार्यकर्ता. हल्ली व्यावसायिक आणि दिखावा करणारा कार्यकर्ता अधिक प्रमाणात दिसून येतो. सतरंज्या अंथरल्यानंतर आणि व्यासपीठावर माईक खुर्च्या ठेवल्यानंतर ऐटीत स्थानापन्न होणारे, फर्डा भाषण देणारे, भाषण करताना फोटोग्राफर कडे हळूच तिरकस नजरेने पाहणारे अन काय भारी पोझ देत टाळ्या मागणारे कार्यकर्ते दिसतात. अशा या कार्यकर्त्यांच्या वृती अन गुणांना सलामच नव्हे तर साष्टांग दंड्वंत घालायला हवा. कार्यकर्त्याचे कार्य अंधारात प्रकाश तेवत ठेवणाऱ्या पणती प्रमाणे हवे. निराश मनोवृत्तीचा कार्यकर्ता नको. जनमानसाने कार्यकर्ता कसा असावा कोणी विचारले तर अमुक अमुक माणसासारखा असावा किंवा या पक्षातील कार्यकर्त्यासारखा असावा. असं म्हटले गेले तर आपण अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाहीत. 


अशोक भेके

No comments:

Post a Comment