Tuesday, September 11, 2018

मुहम्मद तुघलक आणि मोदी

  


                  मुहम्मद तुघलक १३ व्या शतकातील दिल्लीचा सुलतान.त्याचं खरं नांव उलुवू खान. एक लहरी आणि महत्वाकांक्षी माणूस. शेतकऱ्यांच्या साऱ्यात वाढ करून शेतकऱ्यांना छळले. तरीही कराच्या वसुलापासून पुरेसे उत्पन येईना तेव्हा त्याने तांब्याची नाणी सोन्याच्या किमतीने चलन म्हणून वापरली. सरकारी खजिन्यात त्याच दरात स्वीकारली जातील असे जाहीर केले. त्यामुळे गोंधळ माजला. अखेर तुघलकाने निर्णय मागे घेतला. मुहम्मद तुघलकाच्या अयशस्वी प्रयोगाने साम्राज्यात बेबंदशाही आणि अराजकता माजली. त्यातच त्याचा अंत झाला पण त्याच्याविषयी दरबारातील जियाउद्दिन बरनी या इतिहासकाराने मुहम्मद धर्मशील व विद्याव्यासंगी होता असे लिहिले आहे तर इब्ण बतुता या प्रवाशाने त्याच्याविषयी लिहिले आहे की, विदयेने सुसंस्कृत असूनही हा प्रसंगी क्रूर वागे. त्याच्या योजनात कल्पकता असूनही त्या त्या परिस्थितीला व्यवहार्य नव्हत्या, म्हणून त्या फलदायी ठरल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुहम्मद तुघलक यांच्यामध्ये काय फरक आहे. दोघेही कट्टरपंथी. परंतु ते जे निर्णय घेतात त्यात त्यांचा आततायीपणा असतो. एखाद्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत भर पडणार हे निश्चित पण प्रजेला होणारा त्रासाचा  विचार न करता अंमलबजावणी करणे चुकीचेच. गेल्या ८ नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधानांनी रुपये ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या. निर्णय अतिशय चांगला आहे. पण त्याचे नियोजन न करता घेतलेला निर्णय देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे . काळा पैसा बाहेर काढण्यासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे, पण  त्या अगोदर बँक अथवा ATM सेंटर मध्ये पुरेसा निधी उपलब्ध हवा होता. नोटा रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बँका बंद ठेवण्यात आल्या, त्यामुळे देशवासियांमध्ये हाहाकार माजला. जेजुरीला गेलेले एक जोडपे भुकेने व्याकुळ झाले होते. अखेर त्या हॉटेल मालकाला ५०० ची नोट घे पण आम्हाला जेवायला दे, काकुळतीने म्हणाले. मालकाने आनंदाने जेवण दिले. सोन्याच्या नाण्याला तांब्याच्या भावात द्यावे लागलेले तुघलकी शास्त्र मोदीमुळे अनुभवले गेले. दुसऱ्यादिवशी कोठेच नोटा स्वीकारल्या गेल्या नाहीत. प्रवासात हैराण झालेल्यानी पंतप्रधान मोदींच्या सात पिढ्यांचा उध्दार केला. कितीही चांगला निर्णय म्हटला गेला तरी आयत्या वेळेला पैसा खिश्यात असूनही पर्यटक राजापासून रंकापर्यंत सर्वच भिकारी झाले होते.
          पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय अत्यंत चांगला आहे. त्या दुमत काही नाही. पण सध्यास्थितीत व्यवहार्य नव्हता. कारण तजवीज करून निर्णय लादला असता तर मोदी हिरो झाले असते. परवा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग संसदेत बोलले. ते शक्यतो बोलत नाही. पण ते बोलले लाखमोलाचे बोलले. या निर्णयाने दूरगामी परिणाम अनुभवयास मिळतील. पण तो पर्यंत आपण मृत असू. पण दूरगामी सोडा, नुकत्याच झालेल्या नगरपालिका,नगरपंचायती मध्ये भाजपला घवघवीत यश प्राप्त झाले. असं वाटले होते की, नोटाबंदीचा राग मतपेटीत दिसेल. शेवटी लोकांना कितीही त्रास झाला तरी चांगल्या निर्णयाचे स्वागत करणारी मराठमोळी जनता आहे. सत्य तेच लिहित आहे. यदाकदाचित कुणाला पटेल ना पटेलही. मी अनेकांची दु:ख जवळून न्याहाळली आहेत. घरात लग्न आणि कावराबावरा झालेला वरबाप पाहिलेला आहे.
          नोटाबंदीनंतर देशात काय घडले...? सेन्सेक्स २६२२८ वर आला. एका दिवसात अब्जावधी रुपयांचा तोटा व्यापाऱ्यांना सहन करावा लागला.सोन्याचे भाव गगनाला भिडले. काळाबाजारी पैश्याचे रुपांतर सोने खरेदीत झाले. सुप्रसिध्द मंदिराच्या पेट्या भरभरून वाहू लागल्या. जमीन आणि घर विक्री  व्यवहार थंडावल्याने १२ हजार कोटी उत्पादान मुद्रांक शुल्कात 1 रुपायाची भर पडली नाही. महाराष्ट्र राज्यात महसुलावर परिणाम झाला आहे. दारूबंदी राज्यमंत्री म्हणतात, १५ हजार कोटी वार्षिक उत्पनातला महसुलात २५% घट झाल्याचे दिसत आहे. शेतीमालामुळे वर्षाला ६००० कोटीचे उत्पादन शुल्क मिळते पण गेल्या तीन हप्त्यात एक रुपयाही जमा नाही.शेतीमालाचे भाव गडगडले अन शेतकऱ्याच्या मालाला कोणी पुसेनासे झाले. टोमँटो, कांदे सडले गेले. गत वर्ष दुष्काळामुळे गेले. हे वर्ष मोदींच्या नोटांमुळे शेतकऱ्यांचे नुकसानीत गेले. लघु आणि मध्यम उद्योगाने आगाऊ पगार अदा करून कारखाने बंद करण्याच्या नोटीसा देऊ केल्या. रेल्वेची तिकीट जुन्या नोटा भरून बुक केली अन रद्द करून नव्या नोटा हातात घेतल्या. डॉक्टर नव्या नोटाच हव्यातम्हणून अडून बसले. मेडिकल, पेट्रोल पंपवाल्यांनी नोटेची पूर्ण खरेदी केली तरच माल देऊ केला. रांगेत ६० ते ६५ जणांचे बळी गेले.
                   मुहम्मद तुघलकानी चीनवर खुसरो मलिकच्या नेतृत्वाखाली स्वारी केली होती. त्यात हिमालयाच्या खिंडीतच सारे सैन्य गडप झाले होते. निर्णय कितीही चांगला असला तरी कधी राबवायचा याचा देखील अभ्यास करणे,गरजेचे आहे. १५६ लाख करोड चलन असलेल्या देशात बँकामध्ये ३१ लाख २० हजार करोड जमा आहेत.( सध्या हा आकडा वाढलेला आहे.)  १२४ लाख ४८ हजार करोड चलनाऐवजी देशात १३३ लाख ८४ हजार चलनात आहेत. या ६% म्हणजे ९ लाख ३६ह्जार करोड बनावट नोटा बाजारात आहेत.त्यात एकूण ५०० आणि 1000 च्या एकूण २२.७७ लाख करोड चलनात  आहेत  देशात १०४  कोटी जनता आजही रोकडा व्यवहार करत आहे तर केवळ २६ कोटी जनतेचे व्यवहार बँकेवर आधारीत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात नोव्हेंबर १८ पर्यंत ५.४४ लाख करोड बँकेत जमा झाले तर  १ .०३ लाख करोड पुन्हा खात्यातून काढण्यात आले. देशात सरासरी 1 लाखाच्या लोकसंखेच्या अंतर्गत ७ विविध बँक शाखा कार्यरत आहेत. त्या बँकाचे देशात एकूण २ लाख ATM सेंटर आहेत.त्यापैकी सध्यास्थितीत ६० हजार ATM कार्यरत आहेत. देशात एकूण ७.३८ कोटी डेबिट आणि क्रेडीट कार्ड दिली गेली आहेत. ही एकूण देशातील परिस्थिती मुळे जनता हवालदिल झाली आहे. जाये तो जाये कहाँ....? मोदींना याची कल्पना नसेल. मोदींनी देशाबाहेर असलेला काळा पैसा भारतात आणणार ही घोषणा वल्गना ठरली. त्या पेक्षा त्यांनी देशांतर्गत असलेला काळा पैसा बाहेर काढायचे ठरविले आहे.
          आपल्या देशात ९०% जनता असंघटीत क्षेत्रातील असून ५५% शेतकरी आहेत. या लोकांचे हाल पाहवत नाहीत. ऊसतोड कामगार एखाद्याच्या शेतातला  ऊस तोडतो तेव्हा त्याला पैसे मिळतात पण जिल्हा बँकानाच नोटा स्वीकारण्याची बंदी घातली, पतसंस्था बंद झाल्या. अन त्या शेतकऱ्याने ऊसतोड लांबविली. आज ऊसतोड कामगार कसा जगत आहे....! हातावर पोट धरून आपल्या कुटुंबियांसोबत बारा गाव फिरणारा हा धटटा कट्टा गडी हिरमुसलेला आहे. पोरंबाळं उपाशी पोटी निजलेली त्यांना बघवत असेल का....? हे एक उदाहरण आहे. अशी अनेक क्षेत्र असतील त्यांच्या वाट्याला असे दु:ख आले असेल. सरकार चांगले करतेय असं म्हणत असले तरी भाजप नेते आतल्या आत हिरमुसले आहेत. लोकही चांगले म्हणत नाहीत. रांगेतले लोक,व्यापारी, छोटे- मोठे दुकानदार शिव्या घालताहेत. अनेक लग्न या निर्णयामुळे मोडीत निघाली, त्या घरादारांचे शिव्याशाप मोदींच्या खात्यात जमा होत आहेत. म्हणून मोदींनी स्वत: खूप चांगले काम केले आहे ही उगाच फुशारकी मारु नये.  मुहम्मद तुघलक कान – डोळे बंद ठेऊन राज्य करायचा. मनात येईल तसे वागत असे. मोदींची तीच अवस्था आहे. सर्व सामान्यांचे दु:ख दिसत नाही. त्यामुळे तुघलक आणि मोदी मध्ये काय फरक आहे....!
अशोक भेके  

No comments:

Post a Comment