घर होतं चिमणा –चिमणीचं...
लय भारी... देखणा चिमणा आणि देखणी चिमणी
आणि त्यांची सुंदरशी चिल्लीपिली.
अगदी अत्युत्तम चाललं होते. घर भक्तीने बांधलेले..
सुंदरसं घर. जीवनात सुखी चिवचिवाट..
चिमण्याचे चिमणीवर इतके प्रेम की,
चोचीने भरवी दाणापाणी..
काय वर्णन करू तयांचे.
पंखाशी पंख हे जुळताना
चोचीत चोच मिळताना
हसते नाचते घर सारे
हसते छप्पर
भिंती आणि दारे
चिमणी होती स्वच्छंदी.. स्वत:च्या जीवनात अती आनंदी.
चिमणा सकाळी लवकर उठे आणि कामावर पळे
अन घरी उशिरा परतायचा.चिमणा सुशिक्षित.
वैद्यशास्त्रात निपुण त्याच्या हाताला भारी गुण.
स्पर्शाने ताप पळे दूर. कामाला जाई तेथे रहात होती
त्याची आई. भोळी भाबडी.
आयुष्य व्यतीत केले येथे तिने.
चिमणा बोलला
‘ आई चल माझ्या घरी’ पण आई म्हणाली, 'मी येथेच बाबा बरी’
केवळ आईच्या प्रेमापोटी धावत पळत येई, अन सांज सकाळी तिच्या पायाला स्पर्श करून घरी जाई.
चिमणी पापण्याचं तोरण बांधून चिमण्याची वाट पहायची.कधी कधी डायनिंग टेबलवर झोपी जायची.
असे हसत खेळत दिवस चालले होते. दु:खाच्या रात्री झोप कुणाला लागत नाही....
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. चिमणीला त्या दिवशी झोप लागली नाही.तळमळत होती..
अपशकूनाची चाहूल तिला लागली होती. ती भयभीत झाली.
सारखे दरवाज्याकडे पाहत होती.
अन चिमणा घरी आला पण घामाघूम त्याचे अंग. कंप फुटला होता.
चिमणीला काय करावे सुचेना. तातडीने तिने दादाला साद घातली.
दादा आला आणि पण चिमणा चिमणीकडे पाहत पाहत जन्माच्या स्टेशनवर मृत्युचं तिकीट काढून आयुष्याची अखेर करीत प्रवासाला गेला. देह थरारला सारा...अन अभागी चिमणीने हंबरडा फोडला. आणि सळसळनाऱ्या पानांवरील रातकिड्यांनी देखील मौनता धारण केली. ‘पारावर हिरमुसल्या डहाळ्या’ चिमणीच्या डोळ्यातले अश्रू पाहवत नव्हते. डोळ्यातून ओघळणारे खळखळत ओठावर भिडले.निजला भालावरचा चंद्र तो.... चकाकणारे मंगळसूत्र तुटून घरंगळत जमिनीवर विखुरले गेले. अंत:करण भरून आले होते.भक्तीने रुजविलेल्या ... प्रेमाने सावरलेल्या... या घराचा खांब ढासळला होता. वाईट वाटत होते. तात्पर्य सांगायचं म्हणजे हि कथा आपल्या डॉक्टर चंद्रकांत तळेकर यांच्याशी निगडीत आहे. हे जेव्हा डॉक्टरांच्या मृत्यूची वार्ता कानावर आदळली तेव्हा आमच्या मुखातून शब्दहि फुटत नव्हते.इतकी वाईट अवस्था आमची झाली होती.
डॉक्टर चंद्रकांत तळेकर म्हणजे भला माणूस.
नेहमी चांगल्या गोष्टीचा पाठलाग करण्याची प्रेरणा देणारे आणि
प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहण्याची आदिम शक्ती लाभलेले व्यक्तिमत्व.
आदरयुक्त भाव,मितभाषी.
शालेय जीवनात फार हुशार नाही पण जिद्द
आणि चिकाटीच्या जोरावर ध्येय हासील करणे,
अशक्य नाही.हे दाखवून दिले. घोडपदेव विभागातील पहिला डॉक्टर.
अभिमान वाटायचा. समस्त घोडपदेव वासियांपुढे जीवनादर्श उभा केला.
श्रमिकांचा लायक प्रतिनिधी म्हणजे डॉक्टर...
त्यांच्या दु:खावर उपचार करून बरे करीत असत.
आपण डॉक्टरांना देव मानतो. या आपल्या माणसाला देखील समस्त रुग्णांनी आपला देव मानले होते
कोंडाजीबाबा आणी गजराआजी यांच्या संस्काराची वेल म्हणजे डॉक्टर चंद्रकांत तळेकर.
आठवण आहे डॉक्टरांची.. सांगावीशी वाटते, कारण डॉक्टरांनी मी आजारी असताना सांगितलेली होती. ‘ईश्वराने लिहिलेले... आपले आयुष्य किती दिवसाचं असते...? आज आहे तर उद्या नाही. मग चिंता कशाला... जगावे हसून खेळून, कारण उद्या या जगात काय होईल ते कोणालाच माहिती नाही’. आजही आठवतात हे शब्द.
संगती जयाच्या राहिलो आम्ही,
हाकेस आता तो ओ देत नाही
असा आपला माणूस डॉक्टर चंद्रकांत तळेकर
अशोक भेके
No comments:
Post a Comment