आठवणीतील माणसं हे सदर लिहायला घेतलं की, अशोक कोंडीबा लाटे हे नांव डोळ्यासमोर उभं ठाकायचं अन काही केल्या नजरेआड होत नव्हतं. अशोक कोणी मोठा सामाजिक कार्यकर्ता नव्हता. केवळ नवरात्रीच्या कार्यक्रमात मनापसून भाग घेई. एका मर्यादेच्या चौकटीत राहत होता. आयुष्याच्या वाटेवर भेटलेला हा माझा मित्र.... मनमोकळेपणे हसणारा, मनातलं सांगणारा. वडिलांचे नांव कोंडीबा म्हणून त्याला आवडीने मी ‘कोलाटयाचं पोर’ असं म्हणायचो. लहानपणापासून एकत्र राहिलो, खेळलो, शिकलो. इतकेच नव्हे तर आम्ही एकाच बेंचवर बसायचो. मजा मस्ती मी करीत असे.पण त्याचं लक्ष नेहमी अभ्यासावरच. बोलणे कमी,अन कर्म अधिक करणारा हा माणूस. शाळा सोडल्यानंतर काम धंद्याला लागला. बऱ्यापैकी कमवीत होता.अहोरात्र क्षणाचीही उसंत न घेता कामाला झोकून देणारा कष्टकरी माझा मित्र माझ्या आयुष्यात आलेल्या चढउताराचा साक्षीदार.एकमेकांशी संवाद, विचारांची आणि भावनांची देवाण घेवाण त्यामुळे आमची मैत्री बहरत गेली. विशेष म्हणजे आपल्या गावी आठवड्यातून दोन दिवस कुटुंबियांसोबत राहत असे. सुखी परिवार होता. मुलेबाळे शिकत होती. अगदी आरामदायी चालले होते. पण एके दिवशी त्याला देवाशी घनिष्ठ मैत्री करायची आहे म्हणून आम्हाला सोडून देवाकडे गेला. मैत्री हा असा एक धागा आहे की, देव आणि भक्तांचे मित्रत्वांचे नाते. त्यात देवाला आवडलेला माझा मित्र म्हणजे सखा श्रीकृष्णाला मित्ररुपात भेटण्यासाठी गेलेला सुदामाच. अशा या मित्रांच्या आठवणी कथन करताना नेत्रकडा ओलावल्या आहेत अन शब्द ओठावरच अडखळत आहेत. अडखळलेल्या शब्दांमुळेच......
त्या कटू आठवणी मनात येता,
तरळते डोळ्यात पाणी....!
ती दु:खद घटना काही केल्या डोळ्यासमोरून जात नाही.
काही वर्षापूर्वी घोडपदेव विभागात लागोपाठ काही माणसे अनपेक्षितपणे आपल्यातून निघून गेली. एक दोन दिवसात कोणीतरी जायचं. स्मशान रस्ता सरावाचा झाला होता. अशाच एका प्रेत यात्रेत आम्ही चाललो होतो. मला वाटतं शशीकांत तांबोळीची प्रेत यात्रा असावी. रे रोडच्या पुलावर गेल्यावर एक टँकशी येऊन थांबली. त्यातून अशोक लाटे उतरला. आम्ही गप्पा मारीतच स्मशानात पोहचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या तितक्यात अचानक अशोकला काय झाले कळले नाही. तात्काळ आम्ही त्याला रुग्णालयात हलविले. काही दिवस मृत्युशी झुंज सुरु होती. डॉक्टर मंडळी देखील हैराण झाली होती.पन्नाशीचा उंबरठा पार न केलेल्या मित्राला कळून चुकले होते. आता आपले काही खरे नाही. त्याचाही आत्मविश्वास ढळला. कुटुंबीयांनी रुग्णालय बदलत उपचार अधिक करण्याबाबत धडपड केली पण देवाला असा मित्र हवा होता.नायर रुग्णालयात त्याला पाहिले तेव्हा त्याची स्थिती म्हणजे ओठांमध्ये अडली होती वेदनेची कहाणी. पापणीत दडले होते सुने सुने पाणी. अन दुसऱ्याच दिवशी आभाळही उन्मळून फाटले. निरोपाचे क्षण उभे ठाकले होते. अन विझली समई ......! नेले त्याला.खरंच खूप खूप वाईट वाटले . मन बेचैन झाले. घरातला कोणी तरी नातलग गेल्यासारखे वाटत होते. त्या रुग्णालयाच्या खाटेवर पांढऱ्या शुभ्र वस्त्रात ठेवले तेव्हा उचंबळून आले. आयुष्य अल्प लाभले. त्याच्या अकस्मात जाण्याने कुटुंबियांचे अतोनात नुकसान झाले. जन्माला आलेल्याला एकदा जाणे तर आहे,पण इतक्या लवकर जाणे हृदयद्रावकच. कधी कधी वाटतं.... लहानपणीचे सगळे सवंगडी परत एकत्र खेळायला यावेत. परत एकदा लहान व्हावे आणि ह्या दुपारच्या उन्हात बागडावे. पक्षांची किलबिलही नेहमीचीच., जमीन, वाळूंज चाळीचा जिना, व्हरांडाही तोच. पण...... आमचा अशोक यात दिसणार नाही. त्यामुळे मनाला वेदना होत आहेत.
एक आठवण सांगाविशी वाटते, तो नेहमी म्हणत असे. ‘काही तरी वेगळे करायचं...! चिखलातल्या कमळांना फुलवायचं, सुकलेल्या फुलांना जगवायचं, माती रुक्ष असली तरी मातीतल्या माणसांसाठी जगायचं.’ आपल्या आमदनीतून अनाथ, अंध मुलांसाठी काही अल्पसा वाटा सातत्याने देणाऱ्या या मित्राला गमावल्याचे दु:ख आजही काळजाला बोचत आहे.
पण अशोक ....
एक आठवण सांगाविशी वाटते, तो नेहमी म्हणत असे. ‘काही तरी वेगळे करायचं...! चिखलातल्या कमळांना फुलवायचं, सुकलेल्या फुलांना जगवायचं, माती रुक्ष असली तरी मातीतल्या माणसांसाठी जगायचं.’ आपल्या आमदनीतून अनाथ, अंध मुलांसाठी काही अल्पसा वाटा सातत्याने देणाऱ्या या मित्राला गमावल्याचे दु:ख आजही काळजाला बोचत आहे.
पण अशोक ....
तुझ्या आठवणीतला श्रीमंत मी,
पण तुझ्या सोबतीचा फकीर मी......!
असा आपला सर्वांचा मित्र अशोक लाटे .......!
अशोक भेके
No comments:
Post a Comment