Saturday, September 8, 2018

देव माझा: श्रीकापरेश्वर बाबा



मंबई शहरात गाववस्ती कितीतरी गाव होती. आजही आहेत वरळी गांव असो वा परळगांव. आज ही दिमाखाने परंपरा पाळताहेत. याच प्रमाणे माझगांव मधील घोडपदेव नावाचं एक गांव. त्यात धाकु प्रभुजी वाडी सारखे गावठाण . सर्व प्रांतातली मंडळी मराठा –घाटी, कोकणी आहेतच याशिवाय चर्मकार, महारवाडे, मुस्लीमवस्ती, ब्रुड (डवरी)समाज, ख्रिश्चन, पारशी आदि अनेक जनजाती समूहाने राहताहेत. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी. या भागात अनेक मंदिरे आहेत त्या पैकी घोडपदेवचे ग्रामदैवत म्हणून श्री कापरेश्वर महाराजांना प्रमुख मान आहे. लोकवर्गणीतून निर्माण झालेले अन काळानुसार चेहरा मोहरा बदलत गेलेले श्रीकापरीबाबांचे मंदिर. बाबाविषयी प्रचंड ख्याती आहे की, दु:खितांचे दु:ख दूर करणारा, भक्तांना शक्ती आणि युक्ती प्रदान करून आलेल्या संकटात बळ देणारे श्रीकापरीबाबा. श्रीकापरेश्वर महाराज मंदिर एका प्रशस्त जागेत असून आयताकृती गाभारा असलेल्या या मंदिरात शेंदूररुपी आणि मोठे डोळे असलेली, झुपकेदार मिशी असलेली बाबांच्या मूर्तीचे देखणेपण लक्षवेधी आहे . मन आकर्षित करणारे बाबांची किमया आहेच. याशिवाय मंदिरात शिवलिंग,श्रीदत्त, श्रीगणेश, बजरंगबली आणि खास आकर्षण विठठल- रुक्मिणी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती म्हणजे साक्षात माझा पांडुरंग अवतरल्याचे दिसत आहे . सेवा करणारे गोमाजीपंत, प्रकाशभट्ट सारखी विप्रमहोदय दररोज सांज सकाळ आरतीची जबाबदारी पेलताहेत. महिलांचा हरिपाठ अव्याहतपणे सुरु असलेली एकादशीची प्रवचन कीर्तन सेवा. धार्मिक वातावरणाने हा परिसर भारलेला आहे
एकनाथषष्ठीचे औचित्य साधून घोडपदेवचे ग्राम दैवत श्री कापरेश्वर महाराज यात्रोत्सावास सनईच्या सुमधुर सुराने प्रारंभ होतो. हा यात्रौत्सव एकूण १० दिवस भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो. यात्रौत्स्व अगदी गावपातळीवर होतो त्याप्रमाणे येथे साजरा केला जातो .देवाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पसंद आहे यावरून देव हा गरीबांचा आहे, हे कळून येते. एकनाथषष्ठी परंपरेनुसार यथासांग पूजा करून विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होतो. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील आदरणीय, वंदनिय हरिभक्त कीर्तनकार आपली सेवा या ठिकाणी घडवून आणतात. ही कीर्तनकार मंडळी म्हणजे ज्ञानाची महासागरे. ही मान्यवर मंडळी आपल्या समाजप्रबोधन ज्ञानदानाने श्रीकापरेश्वर भक्तांची झोळी भरत असतात. आता या मोफत सद्विचारांच्या बाजारात हवं तेवढे घ्यायचे हे भक्तांना ठाऊक आहे. अखंड हरिनाम सप्ताहात टाळकरी, माळकरी, वारकरी, फडकरी, मृदंगाचार्य याशिवाय अफाट श्रोते गर्दी करतात. दुरदूरचीची मंडळी कीर्तन श्रवणासाठी येतात. मंदिरात सतत वीणा, हरिपाठ, प्रवचनसेवा सुरु असते त्यामुळे हा परिसरात धार्मिक स्वरूपाचे वातावरण पहायला मिळते. यात्रौत्सावाचा कालावधी म्हणजे गर्दीने भरलेले रस्ते, खेळणीची दुकाने, लहान मोठे पाळणे, रेवड्या शिंगुळ्याच्या गाड्या, महिलांसाठी आवश्यक वस्तूंची दुकाने तहान मांडून असतात. खाण्याच्या पदार्थांच्या गाड्या अन त्यावर ताव मारणारी आबालवृध्द मंडळी. गर्दीच गर्दी...
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला देवाची आरती झाल्यानंतर टाळ गजरात पालखी सोहळ्यास प्रारंभ होतो . अगदी वाजत गाजत लेझिम. हलगी,ढोल ताशे, सुंदर रंगीबेरंगी पोशाखातील बँड वादक, टाळ,पखवाज, उत्साही तरुणांचे नववाद्य डीजेच्या तालावर पालखीस प्रारंभ होतो. धाकु प्रभूजी वाडीतून घोडपदेव मार्गे फेरबंदर, बँ. नाथ पै मार्गे नारळवाडी आणि पुन्हा रामभाऊ भोगले मार्ग हा पालखीचा मार्ग केवळ जाती जमातींच्या विचारातून पूर्वपरंपार सुरु आहे. पालखीतले आकर्षण म्हणजे देवकाठी, हलगी वाद्यावर नाचली जाणारी देवकाठी. सर्वांच्या पुढे या देव काठीला मानाने दिशा देतात. त्यानंतर लेझीम, ढोल, ताशे बँडच्या तालावर आपआपल्या आवडीप्रमाणे नाचत असतात. जबरदस्त बेभान होऊन महिलांच्या पिंगा, फुगड्यानी धमाल उडते. ज्येष्ठ नागरिक या उत्सवात, पालखी सोहळ्यात अगदी तरुण होऊन नाचतात.
इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद गडे असा यात्रौत्सव मुंबईत थोड्याच ठिकाणी केला जातो, दिवसेंदिवस हे सोहळे खर्चिक होत चालल्याने काही मर्यादा येऊ घातल्या आहेत. भविष्यात या परंपरा जतन केल्या जातील का...? हा प्रश्न भेडसावत असला तरी बाबांची कृपा भक्तांवर अफाट आहे, असं समजू आणि कापरीबाबा की जय म्हणू .....!



अशोक भेके

No comments:

Post a Comment