Sunday, November 4, 2018

ध्येयवेडा काजवा : श्री रमाकांत रहाटे




            
 किती वाट पहिली उजेडासाठी....अंधार ठाण मांडून बसलेला असताना काल म्हाडा कॉलनी अचानक दीपावलीच्या तोंडावर प्रकाशात न्हाऊन निघाली. तमोमय जीवन जगणाऱ्या म्हाडावासियांना उजेडाचे डोळे मिळाल्याचा आनंद सर्वांना झालाच असेल. परंतु या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होताना म्हाडावासियांचा ह्द्याचा कण कण हा क्षण आनंदाने पाहत होता. जेथे अंधार असतो, तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य असते. मग तेथे उंदीर येतो. उंदीरांची एकलेपणाची आग शमवायला घुशी येतात. डांस येतात कीटक येतात. अंगाचे पानिपत करीत असतात. कुत्रे येतात हळूहळू पिलावळ जमा होते. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग धुंडाळताना  रात्रीच्या अंधारातला वाटसरू प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हणत म्हणत जाताना अचानक हल्लाबोल म्हणजे जीवांशी खेळ खेळला जात असतो. गेली अनेक वर्षे म्हाडावासीयांच्या नशिबी दुर्दैव आले होते. बरे झाले दीप लागले.
लाविले दीप रस्त्यावरी
भाग्य घेऊन आली दीपावली

ऐन दिवाळीत घराघरात ज्ञानाचा प्रकाश पोहचवावा यासाठी अनेक जणांनी यासाठी प्रयत्न केले. पाठपुरावा करीत होते पण अनेक वर्षे झाले म्हाडा आणि महापालिका समन्वयाच्या  अभावातून रखडलेले मार्गाप्रकाश दिवे अखेर स्थानिक नगरसेवक श्री रमाकांत रहाटे यांच्या  प्रयत्नातून लागले. चांगल्या कामाचे कौतुक करायलाच हवे. खरा आनंद शेअर करण्यात आहे, त्या गोष्टी काहीही असोत, कश्याही असोत.काही गोष्टी सकारात्मक उर्जेने घ्यायला हव्यात. नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी केलेले कार्य म्हणजे प्रकाशाने अंधारावर विजय मिळविल्यासारखे आहे. प्रेमाचा आणि विवेकाचा दीप आपण घर सजविण्यासाठी लावतो. पण घराबाहेर किंवा अंगणाबाहेर प्रकाश दीप लावून अंधारावर विजय मिळविण्याचे बहुमोल कार्य करणाराला किती सायास करावे लागले असतील. ते रहस्यमय प्रफुल हास्य पाहून कोणीही म्हणावं प्रसन्न अविष्कारी माणूस. सामाजिक समस्यांचे सखोल चिंतन करणारा, अत्यंत तन्मयतेने लोकसेवेला वाहून घेतले आहे. प्रत्येक माणसात सुप्त गुण दडलेले असतात. काही ना काही चांगलेच असतात. केवळ ११ मार्गप्रकाश दिप लावून थांबायला नको. श्री रहाटे यांच्या क्षमताचे मूल्यमापन करायला गेले तर प्रतिभेची कुंडले तागडीत टाकून त्या कुंडलाचा अपमान आम्हांला करणे शोभणार नाही. कामाने झपाटलेला माणूस.टंगळमंगळ करीत बसत नाही. होणार असेल तर होय.. नसेल नाही.
घोडपदेवची म्हाडा कॉलनी म्हणजे अचानक विश्वकर्म्याने घोडपदेव सारख्या भागात निर्माण केलेली वसाहत. विश्वकर्मा सारे काही बनवून गेला, पण मार्गप्रकाश दिवे तेथे निर्माण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे रुखरुख हीच आणि हुरहूर होती. कितीही पेटलो तरी अंधार दूर होणार नव्हता. झारीत शुक्राचार्य बसले असताना या विषयावर अधिक उहापोह करणे, म्हणजे उगीचच काळोख्या पडद्यावर आठवणीचा सिनेमा दाखविल्यासारखे होईल. रात्रीची अंधारी पायवाट. कुठल्या तरी खिडकीतून आलेल्या कवडश्यामुळे कसंबसं माणसे प्रयाण करीत असत. आमची माणसं सूर्यफुलासारखी आहेत. जिकडे सूर्य वळेल त्या दिशेला ते तोंड करीत असते. आमची मने अशीच आहेत. जेथून प्रकाश मिळेल, तेथून आपला विकास साध्य करण्यासाठी वळत असतात.
श्री रहाटे यांच्याविषयी काही चर्चेतल्या गोष्टी बोलताना त्यांनी महापालिकेतील मराठी राजभाषा दिन या संदर्भात अनेक सूचना मांडून महापालिकेत खऱ्या अर्थाने मराठी दिवस साजरा केला जात आहे. शिवाय बोजड आणि सर्वसामन्यांच्या डोक्यावरून जाते. कोणते भाषाप्रभू असे शब्द त्यामध्ये देतात की ते अभ्यासायला शब्दकोश घेऊन बसावे लागते. तिचे  शब्द सोपे व्हावेत, सुलभ व्हावेत यासाठी अमराठी अधिकाऱ्यांना मराठीची उजळणी लावा....! असे ठणकावून सांगायला कमी पडले नाहीत. आपली वाट आपल्याच पायांनी मळणारा, वृत्तीतले कृतीत आणणारा सतत धडपडणारा माणूस म्हणजे वैभववाडीचा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणारा ध्येयवेडा काजवा आहे. *श्री रहाटे यांना सुबुध्दपणे इतकंच सांगू इच्छितो की, दुरितांचे तिमिर घालवण्यासाठी आपण केलेल्या कार्यासाठी शुभेच्छा देताना आपल्या मनात असलेले आणि समाजाला आपणाकडून अपेक्षित असलेले.... जो जे वांच्छिल ते ते लाहो.....!*



*अशोक भेके*