Thursday, August 15, 2019

*वामनमुर्ती तुकाराम*

तुकाराम मारणे

माजात वावरणाऱ्या अनेक व्यक्तींशी रेशीमगाठी जुळत गेल्या. रेशमासारख्या मृदू मुलायम सुखद आणि पक्या गाठी इतक्या घट्ट होत गेल्या. अशा अनेक मंडळीनी मला इतके दिले की, त्यांच्या विषयीच्या भावना माझ्या कृतज्ञतेच्या आहेत. कृतज्ञता ही माझ्या शब्दातूनच व्यक्त करू शकतो. प्रवचनाच्या, किर्तनाच्या शेवटी  ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. यासारखे अनेक विठ्ठल ज्ञानेश्वर पंढरीनाथ तुकाराम सोबतीला आले. त्यापैकी मला माझे मित्र *श्री तुकाराम मारणे* यांच्याविषयी काहीतरी लिहावं, हे बरेच दिवस मनात होतं शब्दांना सांगावं, शब्दांना आठवू लागले की, तितक्यात कोणी तरी साद घालावी.बोलवावं, नाहीतर मोबाईलची घंटा घनघन वाजत राहावी. याचमुळे विचारशृंखला भंगत गेली आणि तुकाराम लिहिण्याचे राहून गेले. आज लिहायला घेतले खरे, पण तितक्यात आमचा एक मित्र कोलमडला.’उद्या सकाळी लवकर लग्नाला जायचं आहे ना...!, मग लवकर झोप’ त्याला जाऊन दिले आन पुन्हा एकदा आपले बस्तान ठोकले. आज तुकाराम पूर्णत्वास न्यायचाच. निर्धार केला. *तुकाराम मारणे* हा आमचा मित्र.


*तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा*
*काय महिमा वर्णूं त्याची*


पुण्यातल्या उंबरडे,आंबेगाव येथे १५.१२.१९५५ रोजी जन्म झालेल्या तदनंतरचे आयुष्य  मुंबईवासीय होऊन मारुती माळी चाळीत राहणारा. अत्यंत भाबडा, श्रद्धाळू,देवभोळा, सीधासाधा निर्मळ  स्वभावाची ठायी ठायी प्रचीती येते.देवघरातल्या समईसारख्या शांत स्वभावाचा.कुणी केलेल्या उपकाराचे सदैव स्मरण करणारा, फुकटेपणा करण्याची, अथवा बळकावण्याची वृती अजिबात नाही. एकवेळ खिश्यातले देईल पण कुणाच्या पांच पैश्याला मिंधा नाही.दूरदर्शनवरच्या मालिकेतल्या तुझ्यात जिंव गुंतला मधल्या राणासारखा...! वरून जरी साधा माणूस असली तरी यांच्यातला खळखळणारा लाव्हा क्वचितच कुणाच्या तरी निदर्शनास आला असेल. आचरणानेच काय,विचाराने देखील सत्प्रवृत्त, कुणाची निंदा नाही, कुणाविषयी वाईट चिंतने नाही. मदत करण्याच्या बाबतीत *तुकारामाचा आदर्श* हातिमताईचा....! नेकी कर, पाणी में डाल या तत्वांचा. मनापसून द्यायचे अन स्वाहा: करायचे.या माणसाचे मनोविश्लेषण खोलवर जाणताना भावनांचे आणि संवेदनाचे पदर वेगवेगळे करून पाहिले तर या ईश्वराने सुखी माणसाचा सदरा देताना काहीच हयगय केली नाही. कधीही न भेटायला येणारा माणूस जर आपल्या भेटीस आला तर साधारणपणे आपण आज कशी काय वाट चुकलात....! किंवा आमची आठवण कशी काय झाली, असे तिरक्या शब्दांचे शेले भेटताक्षणी हाणीत असतो. पण तुकाराम मात्र ‘अलभ्य लाभ...आज भेटीचा योग जुळून आला म्हणून आपण अवतरलात, असे मी समजतो.’ तिरकस बोलण्याने आनंद नासून जातो. समोरच्याच्या मनात आकस निर्माण होतो. हे घडू नये म्हणून त्यांचे स्नेह, औदार्य दर्शन प्रसन्न करते. वाद होतील किंवा जे पटत नाही त्याच्यापासून दूर राहणेच सदासर्वदा पसंत करतात.कुणीही माणूस आजारी पडला की, त्या आजऱ्याचे आसू स्वस्थ बसू देत नाही.पहिले अस्वस्थपण या माणसात जाणवते. हृदयाची स्पंदने धडधडू लागतात. मातीचे मुके कढ जसे मातीला कळते तसे आजाऱ्याला आधार कसा द्यायचा हे तुकारामकडून शिकावे.त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सर्वथा असते. अनेक जणांना अनुभव आहे. रात्री बेरात्री कधीही *अण्णा*  हाक मारली तर धावत जाई. आजारीमाणूस देखील आता पुढची चिंता नाही, म्हणून सोन्यासारखा आपला जिंव स्वाधीन करून मोकळे होतात. आश्वासक स्वर त्यांच्या अन्त:करणात घुमला जातो. जनसामान्यांच्या सुख-दु:खात सरळ सोप्या अर्थपूर्णबाबीसह समरस होणारा माणूस.तुकारामच्या आयुष्यात काळे पांढरे रंगी बेरंगी ढग आले आणि गेले....! आभाळ मात्र तेथेच राहिले. स्थितप्रज्ञ निष्ठावंत शिवसैनिक,मोलाची पदवी ग्रहण करून गर्दीत राहण्यापेक्षा मागे उभे राहून अतोनात कष्ट करणारा माणूस. शिवसेना म्हणजे त्यांचा जिंव की, प्राण. पक्षासाठी एकजींव झालेला माणूस. चार्ली चॅप्लीनसारखा तुरु तुरु चालणारा.पायाला भिंगरी लावल्यागत धावपळ करणारा. साधा पेहराव, शिडशिडीत बांधा म्हणजे मूर्ती लहान म्हटले की वामनमुर्ती हे संबोधन आलेच. माणूस आभाळासारखा उंचीचे मोजमाप करू नये पण वामनमुर्ती म्हणून संबोधने गैर नाही. या माणसाचा खरा स्वभावाचा प्रभाव आम्ही *बायांनो नवरे सांभाळा* हा प्रयोग नाट्यगृहात लावला तेव्हा मनावर बिंबला. त्याचा संसार समृध्द आहे, समाधानी आहे.सहचारीणी संगीतावहिनींची समाजसेवेची आवड सोबत त्यांनी स्वत:च्या प्रकाशाचा विचार न करता एकमेकांची सावली बनून राहणं, पसंत केले आहे. हळदी कुंकुवाची साथ एकमेकांची. कितीही म्हटले एकमेकांना अलौकिक, असामान्य तरीही राजकारणात उच्चपदी असून देखील समाजासाठी जमिनीवर पाय रोवून काम करणारी जोडी म्हणून कौतुक तर त्यांचं करायला हवं. खरं तर मफतलाल गिरणी बंद झाल्यावर परिस्थिती खालावली होती. पण एकमेकांनी आहे त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. मिळेल तेथे काम करीत तुकारामने ते संकटमय क्षण कौशल्याने, हळुवारपणे हाताळले. कष्टपूर्वक साध्य करण्याच्या वृत्तीचे कौतुक वाटल्यावाचून राहवत नाही. चेहऱ्यावर विलसणारे ते हास्य, हास्यप्रधान वामनमुर्तीकडे पाहिले तर त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणणे मनाला पटत नाही. वय झाले असले तरी तरुण आहेत. अजून काय लिहावं... लिहायला बसले की सुचत जाते अन आपण रेखाटत राहायचे. त्यापेक्षा आपले थोडक्यावर समाधान मानायला हवे.


अशोक भेके 

माणूस साधा आणि पक्का इरादा


किरण टाकळे
                       
            माणूस हा बोलणारा प्राणी. निर्मळ मनाची माणसं खूप बोलतात.पण अबोल माणसे बोलत नाहीत ती अत्यंत धोकादायक असतात, असे म्हटले जाते. एकवेळ  मुका असला तरी खुणा करून बोलतो. काहीजण रंगरेषाच्या सहाय्याने बोलतात. काही सुरातून, नादातून बोलत असतो. तर आमच्यासारखे क्वचित लेखणीतून बोलत असतो.परंतु आपल्या कर्माच्या सहाय्याने बोलणारा माणूस म्हणजे  *किरण टाकळे.....*  ध्येयापोटी, मायेपोटी समाजावर भाबडे प्रेम करणारा किरण म्हणजे जगण्याचा निव्वळ आनंद घेत आहे. सर्वांच्या उपयोगी पडावे, कोणी बोलावे अथवा न बोलावे, धावून जात पडेल ते काम इच्छा बाळगणाऱ्या किरणचे शब्दचित्र करण्याचा मोह होण्यास कारण असे घडले की, काल मी रस्त्यावरून जात असताना या शनिवारी काय लिहावे मनात विचार सुरु असताना एका इमारतीच्या खाली गर्दीत उभा असलेल्या किरणकडे माझे लक्ष गेले. त्याने देखील पाहिले. गर्दीतही त्याचा हात उंचावला गेला. तेव्हाच मनात आले विषय तर समोरून चालत आला. लहानपणापासून पाहत आलो त्या किरणवर लिहावे असा विचार बहुतेकवेळा मनात आला. परंतु काही ना काही कारणास्तव माझा हेतू साध्य झाला नाही. मध्यंतरी विभागीय ज्येष्ठ महिलांना देवदर्शन करून आणायची योजना आखली होती. साधारणत: सोळा एक बसेसची तयारी करण्याचा चंग बांधला होता. परंतु काही कारणास्तव त्या योजनेवर पाणी पडले. निराश झालेल्या किरणने दुसऱ्या कार्यक्रमाकडे स्वत:ला वळविले. मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचे ठरले. अनेक स्पर्धकांना निमंत्रणे धाडली. महाकाय स्मृतिचषक बनविण्यात आला आणि ऐनवेळी पुलवामा घटना घडली आणि या संकल्पनेला ऐनवेळी रद्दबातल करावे लागले. माणूस करायला इच्छुक असतो पण अडचणी उभ्या राहतात. मनातले हौशीपण धुळीस मिळते. अशा बाबी शब्दामध्ये बध्द करता येत नाही. परंतु ठीक आहे. त्यांना समाजासाठी काही तरी करायचेच आहे तर आज ना उद्या नक्कीच यापेक्षा अधिक उर्जेने करतील. ज्याचे कर्म बोलते ते जर विधायक असेल तर तो खरा समाजसेवी गप्प कधी बसत नाही. अनेक कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात पटाईत असलेल्या किरणला सनई सुरांच्या (सनईचे सूर म्हणजे वरातीचा मूड निर्माण करणारे) कार्यक्रमाची रूपरेषा आखता आली नाही.
            किरण राजू कामाठी चाळीतच मोठा झाला. श्याम टाकळे यांचे ज्येष्ठ पुत्र. वडील देखील समाजसेवी. घोडपदेव नागरी पतसंस्थेवर संचालक म्हणून ह्यात गेली. खरं तर ते वैश्यवाणी असल्याने त्यांचा धंद्याचा पिंड. धंदा करून पाहिला. धंद्यात चांगला जम बसला होता. पण एका जागी खिळून राहणे त्याला जमेल तो किरण कसला...! चळवळया माणसाला एका ठिकाणी बांधून ठेवले तर त्या जागेत भूकंप नक्कीच होऊ शकतो. किरण प्रकाशझोतात येण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे सौ समिता नाईक यांच्या निवडणूक प्रचारार्थ दारूखाना भागातील एकट्याने धुरा सांभाळताना तेथेच कैक दिवस राहिला. तेथेच खाटेवर डुलकी मारीत काही दिवस तेथेच वास्तव्य करीत त्या दाक्षिणात्य माणसांच्या गोतावळ्यात सहभागी झाला. त्यांचा आदर करीत, त्यांना समजावून घेत त्यांच्या चालीरीतींना दाद देत सखा झाला. खिश्यात पैसे नव्हते, पण उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा या न संपणाऱ्या धनाच्या जोरावर दिवस रात्र  पक्षासाठी केलेले काम सर्वांच्या हळूहळू लक्षात आले. या कर्तुत्वाचे मोजमाप केले तर त्यातील गुणाची टक्केवारी निश्चित किती असावी...! हे संबधित किंवा ज्यांना राजकीय विषयाची आवड आहे आणि बारीक सारीक बाबीकडे ज्यांचे लक्ष असते ती मंडळी, राजकारणात किरण किती मुरब्बी आहे यासाठी  नक्कीच १०० गुण अदा करतील.
            आम्ही मंडळी दशक्रीयेला रे रोडच्या स्मशानभूमीत गेलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. दशक्रिया सभामंडपाच्या सभोवताली शेवाळ झाले होते. येणारे सगेसोयरे त्यादिवशी घसरणीचे शिकार झाले होते. परंतु प्रसंग पाहून कोणी काही बोलले नाही. परंतु आमच्या मनाला हि बाब चटका देऊन गेली. आम्ही घरी आल्याबरोबर सदर शेवाळविषयी वृत्त संबधितांना समजेल असे लिहिले. विश्वास बसत नाही. परंतु या किरणमहाशयांनी त्याच दिवशी पाऊस पडत असताना  रे रोडच्या स्मशानभूमीत जाऊन स्वत: कामगाराकडून सदर जागा स्वच्छ करून घेतली. हे मला त्यांनी सांगितले नाही तर मी सदर बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला आम्ही कालच स्वच्छ केल्याचे सांगितले...! तेव्हा मला कळले. साध्या मनाला बुचकळ्यात ढकलणारा हा  सरळ वळणाचा  आडवळणी विषय अधिकाऱ्यांनी ऐकविला अन त्यांच्या कार्यकर्तेगिरीला खरोखर प्रणाम केला. माणूस साधा पण पक्का इरादा असलेला समाजासाठी जेव्हा तळमळत असेल, अवघ्या समाजाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी जर कळकळ असेल तर त्याच्या कार्याला दाद द्यायला आम्ही मनाचा मोठेपणा दाखवायला हवाच.किरणसारखी माणसं समाजाशी जन्मजन्मांतरीचे नाते समजून आत्मविश्वासाने, सुखानं,अगदी रुची घेत घेत जर काम करीत असतील त्यांना शौकीन म्हणावं की, वखवखलेले म्हणावं....! त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही विशेष येथे अधोरेलिखित करायला हवे होते. पण वाचकांना अधिक गुऱ्हाळ पसंत नसते आणि लेखनशिष्टतेत योग्य नव्हे. किरणनी स्विकारलेल्या या आनंदी पाऊलवाटेवर त्यांचे सहकारी असतील, सोबती असतील. आपण मात्र त्यांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.

अशोक भेके
घोडपदेव समूह


आठवणीतील माणसं : साहेब....!


सहकारतज्ञ कै. सुभाष सखाराम शिंदे 

           


                  खरंच कोणी नसते संगतीला तेव्हा आठवणी हळव्या मनाला स्पर्शून डोळ्यातून ओघळतात. वर्तमानाच्या या वळणावर भूतकाळ कळत नकळत समीप येऊन उभा राहतो आणि आठवणीस हमखास खेटतो. मग आमच्या भावना शब्दातून बोलू लागतात आणि कागदावर खोलू लागतात. निमित्त आहे चौक अनावरण. साहेबांच्या नावाने ज्या कर्मभूमीत ज्यांनी सहकाराचा वटवृक्ष लावला. त्या रस्त्यावर बागडणारे, झोपणारे श्रमजीवी लोकांच्या आणि वर्षानुवर्षे सावकारशाहीच्या मगरमिठीत गुदमरलेल्या गरजू पिडीताना एक विशाल आशेचा किरण देणाऱ्या सहकारतज्ञ कै. सुभाष सखाराम शिंदे यांच्या चौकाचे अनावरण होत असल्याने साहेबांच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना त्यांची ती सोज्वळ, मितभाषी चष्म्याच्या आडून डोळ्यात आणि गालात हसणारी त्यांची मूर्ती समोर आली.
                                   श्री सुभाष सखाराम शिंदे...११ नोव्हेंबर १९४० रोजी वडगाव सहानी, जुन्नर, पुणे  येथे शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म झाला. जनमानसात त्यांना साहेब याच विशेषणाने ओळखले जात असे.कारण घोडपदेव मध्ये त्याकाळात पदवीधर होऊन विभागाचे नांव प्रकाशझोतात आणणारे.. पदवीधर होऊन तेथेच न थांबता वकिलीचे शिक्षण घेत  कायदा शास्त्राचे ज्ञान आकलन करीत  घोडपदेव सारख्या गिरणी आणि माथाडी कामगार वस्तीत शंभर चौ. फुटाच्या सुभाषलेनच्या  घरात आपल्या चार लेकरासह जीवन जगणाऱ्या साहेबांनी आपल्या आयुष्याला लोकांसाठी  अर्पित करीत खरं आणि प्रामाणिकपणे जगले. सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे पण सज्जन होऊनच या जगाचा निरोप घेताना ती आयुष्याची कमाई शिल्लक राखली ते म्हणजे साहेबांचे नांव. म्हणून तर येत्या काही दिवसातच मोठ्या दिमाखात त्यांचे नाव चौकाला दिले जात आहे. साहेबांनी आयुष्यात काय केले....! हे मी लोकांना सांगणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल. विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचा वटवृक्ष साहेबांनी कै. दिनकर पारखे,  कै. हरिभाऊ काचळे  यांच्या मदतीने लावला. उत्तम पायाभरणी केल्यामुळे आज संस्थेचा पसारा वाढत चालला आहे. प्रारंभी फंड या सामुहिक चळवळीतून त्यांनी जिवनावश्यक वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर वितरीत करताना आपल्या माणसाला नेमका लाभ कसा होईल, याकडे शांत आणि सखोल विचारी मनाने लक्ष दिले. सोबत दावल दफ्तरे, खिल्लारी नावाच्या सद्गृहस्थाने साथ दिली. अर्धागिनी सौ. सुनीताताई शिंदे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. विशेष म्हणजे ते केंद्र शासनाच्या आयकर विभागात सेवेला असताना त्यांना आयकर निरीक्षक म्हणून बढती मिळालेली असताना आपल्या सामाजिक सेवेत खंड पडेल याकारणास्तव त्यांनी बढती नाकारली. त्यांनी स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता अनेकांना एकत्रित करून सहकाराची गुढी उभारली त्यामुळे गोरगरीबांच्या गरजा पूर्ण होत गेल्या. आपल्या माणसाच्या अडचणी पाहून डोळ्यात अश्रू उभे राहत असत. पण तेच अश्रू न वाळविता मित्र बनून सहाय्यास धावून गेले. अडचणी आल्या मात करीत गेले. यश आले वाटून घेतले. मीपणा न करता साहेबांनी खरोखर आयुष्यात कमावले ते नांव.
                                   साहेबांच्या बाबतीत एक उदाहरण त्यांच्या मुखातुनच ऐकला. ते एस टी ने जुन्नर जात असताना त्यांचे पैश्याचे पाकीट चोराने मारले. तेपण गाडीत बसल्यावर कंडक्टर तिकीट तिकीट करीत आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले. आता काय करायचे....! कपाळावर घाम जमू लागला. गावी जाणे तर महत्वाचे होते. रात्री अकरा नंतर दुसऱ्यादिवशी सकाळी ९ वाजता गाडी. कंडक्टर साहेबांकडे पाहत उभा होता. त्याच्याही काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. साहेब पाकीट गेले वाटते.....?
साहेबांच्या मनातल्या नेमक्या आणि आवश्यक गोष्टीवर कंडक्टरने नेमके हेरले. तेव्हा कंडक्टर म्हणाला चिंता करू नका. मी तुम्हांला ओळखतो...! मी तिकीट देतो. समाजाच्या भल्यासाठी घोडदौड करणारांना असे लाभ घडतात. कुठेतरी पुण्याई कामाला येते.
                                        साहेबांचा अमृतमहोत्सवी सांगता समीप येत असताना साहेबांना आजाराने ग्रासले. ते बिछान्यावर खिळले. शांत दिसणाऱ्या सागराचे अंत:करण ढवळून निघाले. अखेरीस बदलला खेळ, बदलून गेले सवंगडी. सुन्न आणि खिन्न साहेबांचे मन सागराच्या लाटेत घुटमळत राहिले. नियतीच्या निष्ठुर खेळाला कोणी कधी जाणले नसेल पण साहेबांकडे पाहिले असता कठोर पाषाणाच्या डोळ्यात नियतीने पाणी आणले होते. जोवर जिंव आहे तोपर्यंत समाजासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी लढेन असे सांगत ज्या समाजाच्या मनावर, त्यांच्या हळव्या वेदनेवर औषध कसे लावायचे आणि मात्रा कितीशी वापरायची त्या समाजसेवकाला असे निपचित पडलेले पाहून आभाळ भरून आले होते कडा पाणावल्या होत्या. आणि एक लाट आली आणि.....! कुणाला मरण चुकले नाही. परंतु जाणारांनी चटका देत जाणे, हे सहन होत नाही.  तो दिवस होता ४ ऑगस्ट २०१५. आज चार वर्षे झाली. साहेब गेले असले तरी त्यांचे प्रेरणादायी विचार आजही मागे आहेत. ते सदैव प्रेरणादायी असतील.


अशोक भेके
*घोडपदेव समूह*


Sunday, November 4, 2018

ध्येयवेडा काजवा : श्री रमाकांत रहाटे




            
 किती वाट पहिली उजेडासाठी....अंधार ठाण मांडून बसलेला असताना काल म्हाडा कॉलनी अचानक दीपावलीच्या तोंडावर प्रकाशात न्हाऊन निघाली. तमोमय जीवन जगणाऱ्या म्हाडावासियांना उजेडाचे डोळे मिळाल्याचा आनंद सर्वांना झालाच असेल. परंतु या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होताना म्हाडावासियांचा ह्द्याचा कण कण हा क्षण आनंदाने पाहत होता. जेथे अंधार असतो, तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य असते. मग तेथे उंदीर येतो. उंदीरांची एकलेपणाची आग शमवायला घुशी येतात. डांस येतात कीटक येतात. अंगाचे पानिपत करीत असतात. कुत्रे येतात हळूहळू पिलावळ जमा होते. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग धुंडाळताना  रात्रीच्या अंधारातला वाटसरू प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हणत म्हणत जाताना अचानक हल्लाबोल म्हणजे जीवांशी खेळ खेळला जात असतो. गेली अनेक वर्षे म्हाडावासीयांच्या नशिबी दुर्दैव आले होते. बरे झाले दीप लागले.
लाविले दीप रस्त्यावरी
भाग्य घेऊन आली दीपावली

ऐन दिवाळीत घराघरात ज्ञानाचा प्रकाश पोहचवावा यासाठी अनेक जणांनी यासाठी प्रयत्न केले. पाठपुरावा करीत होते पण अनेक वर्षे झाले म्हाडा आणि महापालिका समन्वयाच्या  अभावातून रखडलेले मार्गाप्रकाश दिवे अखेर स्थानिक नगरसेवक श्री रमाकांत रहाटे यांच्या  प्रयत्नातून लागले. चांगल्या कामाचे कौतुक करायलाच हवे. खरा आनंद शेअर करण्यात आहे, त्या गोष्टी काहीही असोत, कश्याही असोत.काही गोष्टी सकारात्मक उर्जेने घ्यायला हव्यात. नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी केलेले कार्य म्हणजे प्रकाशाने अंधारावर विजय मिळविल्यासारखे आहे. प्रेमाचा आणि विवेकाचा दीप आपण घर सजविण्यासाठी लावतो. पण घराबाहेर किंवा अंगणाबाहेर प्रकाश दीप लावून अंधारावर विजय मिळविण्याचे बहुमोल कार्य करणाराला किती सायास करावे लागले असतील. ते रहस्यमय प्रफुल हास्य पाहून कोणीही म्हणावं प्रसन्न अविष्कारी माणूस. सामाजिक समस्यांचे सखोल चिंतन करणारा, अत्यंत तन्मयतेने लोकसेवेला वाहून घेतले आहे. प्रत्येक माणसात सुप्त गुण दडलेले असतात. काही ना काही चांगलेच असतात. केवळ ११ मार्गप्रकाश दिप लावून थांबायला नको. श्री रहाटे यांच्या क्षमताचे मूल्यमापन करायला गेले तर प्रतिभेची कुंडले तागडीत टाकून त्या कुंडलाचा अपमान आम्हांला करणे शोभणार नाही. कामाने झपाटलेला माणूस.टंगळमंगळ करीत बसत नाही. होणार असेल तर होय.. नसेल नाही.
घोडपदेवची म्हाडा कॉलनी म्हणजे अचानक विश्वकर्म्याने घोडपदेव सारख्या भागात निर्माण केलेली वसाहत. विश्वकर्मा सारे काही बनवून गेला, पण मार्गप्रकाश दिवे तेथे निर्माण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे रुखरुख हीच आणि हुरहूर होती. कितीही पेटलो तरी अंधार दूर होणार नव्हता. झारीत शुक्राचार्य बसले असताना या विषयावर अधिक उहापोह करणे, म्हणजे उगीचच काळोख्या पडद्यावर आठवणीचा सिनेमा दाखविल्यासारखे होईल. रात्रीची अंधारी पायवाट. कुठल्या तरी खिडकीतून आलेल्या कवडश्यामुळे कसंबसं माणसे प्रयाण करीत असत. आमची माणसं सूर्यफुलासारखी आहेत. जिकडे सूर्य वळेल त्या दिशेला ते तोंड करीत असते. आमची मने अशीच आहेत. जेथून प्रकाश मिळेल, तेथून आपला विकास साध्य करण्यासाठी वळत असतात.
श्री रहाटे यांच्याविषयी काही चर्चेतल्या गोष्टी बोलताना त्यांनी महापालिकेतील मराठी राजभाषा दिन या संदर्भात अनेक सूचना मांडून महापालिकेत खऱ्या अर्थाने मराठी दिवस साजरा केला जात आहे. शिवाय बोजड आणि सर्वसामन्यांच्या डोक्यावरून जाते. कोणते भाषाप्रभू असे शब्द त्यामध्ये देतात की ते अभ्यासायला शब्दकोश घेऊन बसावे लागते. तिचे  शब्द सोपे व्हावेत, सुलभ व्हावेत यासाठी अमराठी अधिकाऱ्यांना मराठीची उजळणी लावा....! असे ठणकावून सांगायला कमी पडले नाहीत. आपली वाट आपल्याच पायांनी मळणारा, वृत्तीतले कृतीत आणणारा सतत धडपडणारा माणूस म्हणजे वैभववाडीचा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणारा ध्येयवेडा काजवा आहे. *श्री रहाटे यांना सुबुध्दपणे इतकंच सांगू इच्छितो की, दुरितांचे तिमिर घालवण्यासाठी आपण केलेल्या कार्यासाठी शुभेच्छा देताना आपल्या मनात असलेले आणि समाजाला आपणाकडून अपेक्षित असलेले.... जो जे वांच्छिल ते ते लाहो.....!*



*अशोक भेके*

Sunday, October 28, 2018

ती फुलराणी : संजू जोशी



*संजीवनी जोशीला* पाहिलं की, भक्ती बर्वेची आठवण आल्याशिवाय राहत नाही.  ती फुलराणी नाटकातील मंजुळा आणि आमच्या संजू जोशी... काही फरक वाटत नाही. त्या फुलराणीतील मंजूचा  मास्तर अशोक आणि संजू जोशीचा राजकुमार देखील अशोक... कधी काळी हा राजबिंडा राजकुमार टाप टाप करीत घोड्यावर बसून आला होता. इतका हँडसम माणूस, पिळदार दंड  आणि डोळे.... बापरे ! भेदक... म्हणजे भलतेच आकर्षक. खरंतर देवांनी नाकीडोळी छान कन्यारत्न पाठविलेले पाहून फडक्यांना ही पोर  उजवायला जोडे झिजवायला लागणार नाहीत. हे तेव्हा अनेकांनी म्हटले होते. सांगायचं म्हणजे तथ्यच होतं. महत्वाचं म्हणजे जिल्हे इलाही सम्राट अशोकाच्या कानावर या लावण्यवतीची वार्ता येऊन थडकली. मुळात सम्राट हा सिनेरसिक, गानरसिक.. खरं तर तिच्या लावण्यापेक्षा सुमधुर आवाजावर फिदा झाला.  लगोलग  हातात ती फुलमाला खास माटुंग्याच्या दुकानातून बनवून आणली होती.उभयतानी एकमेकांच्या गळ्यात घातलेला तो पुष्पहार म्हणजे लक्ष्मीला नारायण भेटला. बुद्धीजीवी फार तर विज्ञान आणि वाणिज्य ( अर्थ) यांचा संगम झाला, असेच म्हणतील. कारण अशोकराव विज्ञान शाखेचे संजू जोशी वाणिज्य शाखेतल्या. आतापर्यंत त्या टवटवीत आयुष्य जगत आहेत. त्यांच्या आयुष्यातला खरेपणा देखील जास्त आहे. संसार आणि नोकरी करताना कोठेही कांगावा करीत कधी करणार नाहीत. तुला शिकवीन एकदाचा धडा.... असा अभिनयी अंदाज कधी चुकुनही नाटकी ढंगात त्यांच्या सप्तरंगी आयुष्यात उच्चारला गेला नाही.

संजू जोशी चुकून बँकिंग क्षेत्रात प्रवेशकर्त्या झाल्या, असे मनोमन वाटते. त्या आगळ्या कलावंत...  उत्तम अभिनयाबरोबर त्यांच्याकडे असलेले अप्रतिम निवेदिकेचे कौशल्य हा सुप्त गुण त्याचे वर्णन आम्ही काय करावं. आता त्यांच्या वर्णनाचे अस्तर उलगडून सांगायचे म्हणजे मध्यम बांधा,केस पिंगट काळे आणि मनाने फटकळ असली तरी मनमोकळी !! मनात किंतु आणि परंतुला स्थान नाही. वागण्यात बोलण्यात ऐट पाहिली की, आपण त्यांच्याकडून शिकावं... शिकण्यासाठी लहानथोर असा भेदभाव  मनात आणीत नाही आणि जो आणतो तो शिकत नाही. मनातले गुंज कथन करायचे झाले तर उपजीविकेसाठी नोकरी करायलाच हवी. परंतु जर आपल्या छंदीपणाला पांघरून घालून नकोच. आपल्या अंगात असलेल्या कलेशी मैत्रीचे घट्ट नाते विणले गेले तर तेच आयुष्य जगायला नवीन दिशा देईल. पोहायला येते म्हणून पाण्याशी घट्ट मैत्री होते.म्हणून ते पाणी आपल्याला हवे तेवढे उचलून धरते.याबाबत संजू जोशींनी आपल्या आवडीनिवडीला एकसंघ बांधून ठेवले आहे. भोंडला असो वा रास दांडिया... अगदी नियोजन करून त्यात उतरायचे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणायचं नाही नाहीतर मागून कुणीतरी चढ्या आवाजात विठूचा गजर हरिनामाचा.... मराठी मनाच्या कोपऱ्यातून आलेला थेटपणा हास्याच्या उकळ्याना ऊत आणायचा.

पार्ल्याला त्यांचं घर चोरट्यांनी फोडले. ही बातमी वाऱ्यावरची वरात होऊन घराघरात पोहचली. घरात होतं ते घेऊन पोबारा केला. दुसरा कुणी असता तर नसानसातून वाहणारा त्वेष पाहून त्यासमयी चोरटा भस्मसात झाला असता. अशोकराव किंचित चमकले आणि संजू जोशीना भरून आले. आयुष्याची कमाईवर चोरट्यांनी मारलेला हात... वाईट वाटले पण मी पानवाल्याच्या गादिसमोर उभा राहून विचार करीत असताना त्या चोरट्यांना सरळ भाषेत वेडा यासाठी ठरविला की,  संजू जोशीच्या डोळ्यातून टपकलेले ते मोती मौल्यवान मागे टाकून गेले. हा एक विनोदबुद्धीचा एक भाग आहे. पण आलेल्या संकटावर कशी मात करायची याचे उपजत ज्ञान असावे लागते. देवाच्या देणीतले एक ठेवनीचे देणे, जे सर्वांकडे नसते. इष्ट आणि स्पष्ट बोलण्यातून मर्यादांचे उल्लंघन झाले तर नाराजीचे सूर उमटतात. पण संजू जोशी यांच्याकडे असलेले कुणालाही न दुखावण्याचे देणे, याची गोळाबेरीज करायला नको.

मध्यंतरी त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या आप्तांनी *संजीवन* नावाचा कविता संग्रह प्रकाशात आणला. दरवर्षी त्यांचा वाढदिवस ही आमच्यासाठी एक पर्वणी असते. आनंदाच्या क्षणाची माळ गुंफत  स्नेहभावनेने मित्र मैत्रिणी, ताई माई आईआजी सकाळी सकाळी बहुरंगी स्वभावाच्या रंगपेटीला  ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ सूर आळवून शुभेच्छा देतात. ही मिळणारी उत्स्फूर्त दाद त्यांना शतायुषीच्या पल्याड घेऊन जावी, ही सदिच्छा व्यक्त करून या लेखन मैफिलीची सांगता करतो.

अशोक भेके

*चर्चा एका दाऊची*




परवा दाऊ लिपारे यांनी वेगळ्या वाटेवर प्रयाण केल्याचे म्हणजे मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याचे सोशल मिडीयावर प्रसारित झालेले फोटो पाहून कोणी अचंबित होण्यासारखेच आहे. या वृत्ताची चर्चा होणारच. त्यात काहींनी केली व्यक्त हळहळ, त्यात टीकाही होती  तर काहींनी केले स्वागत. दाऊ म्हणजे विजय लिपारे... खास वेगळेपणाने मैत्री जपणारा एक पराकोटीचा आमचा सुसंस्कृत मित्र. मनसेच्या गोतावळ्यात दाऊला नेहमीच झुकते माप दिले. शिवाय वरिष्ठ पातळीवर कांकणभर अधिक कौतुकही केले गेले. हे शिवसेनेत देखील घडेल. अती रथी महारथी ही मंडळी देखील वाऱ्यावर सोडणार नाहीत. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी कुठे जायचे आणि कोठे राहायचे....! संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य यानुसार मनमर्जीनुसार आपल्याला कोठेही संचार करता येतो. त्या संचारात जीवनात वाहणारा आनंदाचा निर्झर कायम राखला  पाहिजे. जे जे उत्तम उन्नत उदात्त अपेक्षित असते ते तेथे मिळेलच असे नाही. पण एक महत्वाचे जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. ज्याच्यात हिम्मंत, त्यालाच बाजारात किमंत... किती सुलभतेने आपण म्हणून जातो.  हे राजकीय क्षेत्राशी निगडीत नाही. पक्षांतर करणारांची हिम्मंत तात्पुरती असते आणि किमंत शून्य होते. जेव्हा आपल्याला पक्षातील काही गोष्टी पटत नसतील आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतील तर आपण शांत बसलेले बरे....!
*तू यावं, तू जावं*
*मन बंधन तोडीत जावं*
*शिव बंधन बांधीत यावं*


हे समर्थन नाही तर वस्तुस्थितीचे कथन आहे. दाऊने  पण त्यांच्या सोबत्यांवर भरभरून प्रेम केले, हे नाकारता येणार नाही. हे घडायच्या अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला आम्ही जवळ जवळ अर्धा तास गप्पा मारल्या. पण त्यांच्या बोलण्यातून असे काय जाणवले नाही. अखेर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक पाहिले की, त्यांनी पांघरलेला मुखवटा न गळून पडण्यासारखा होता. चेहऱ्यावर न जाणवणारे भाव. चिडचिड नव्हती उद्वेगही नव्हता. रंगमंचावरचा विदुषक देखील आपल्या बुरख्याआडची छटा लपवू शकत नाही. आपण तर माणसे... एकमेकांचा चेहरा वाचू शकत नाही, याचा अर्थ असा की, आम्ही म्हणजे एक शून्यासारखी गत झाली. स्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर ( आता घडलेल्या प्रसंगावरून ) शक्यतो सत्याची कास धरणारा विजय लिपारे मनाला जाम भिडतो. नगरच्या शेतीत आणि मातीत वाढलेला हा रुबाबदार आपुलकीबाज व्यक्तिमत्वाशी आम्ही जोडलो गेलो.
मनसेला नवीन नाही. अनेक होते त्यांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. जाणारे जात आहेत. त्याचा फरक इतरांच्या मनावर होत नाही, हे विशेष. विशेष म्हणजे असे काही घडले की मनसैनिक जागे होतात. त्यादिवशी काहीतरी चारशे साडे चारशे महाराष्ट्र सैनिक  माझगाव गडावर पोहचले होते. अशी जागरूकता असेल आणि अंतर्गत कलहाकडे सुजानतेने दुर्लक्ष केले तर, गेलेली उभारी पुन्हा मिळविता येईलच. हे स्थानिकांचे म्हणणे रास्त आहे.
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ आहे. चांगली पाने वाट्याला येणे, हा एक नशिबाचा भाग आहे. पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे हे विजय लिपारेना कितपत जमतंय....! जमलं तर यश निश्चित आहेच. तरीही आम्हां सृष्टांच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी आहेत.
त्यांना उतरोत्तर यशोन्नती मिळत राहो आणि त्या वाढत्या उन्नतीबरोबर अहंकाराचा वारा न लागो...! पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.



*अशोक भेके*


Thursday, October 25, 2018

*आमचा सुरमयी विनू*




आमचा विनू म्हणजे *विनायक जोशी*. डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीला लाभलेले  म्हणण्याऐवजी *बँक ऑफ इंडिया*  सारख्या राष्ट्रीयकृत बँकेला लाभलेला आनंदाचा झरा. सतत आनंदाने पाझरत असतो. बागा फुलवीत असतो. अनेकांच्या मनातल्या बागा फुलविण्यासाठी त्यांनी उच्चारलेले, वाह .... क्या बात है....! अप्रतिम. काय त्याचं बोलणं, मधात घोळलेले आणि तुपात तळलेलं.एखाद्याने सहज फिदा व्हावं, अगदी तसं गोड बोलणं.काय विलक्षण जादु आहे या माणसात....! निखळ आनंद निर्माण करू पाहणारे श्री विनायक जोशी जसे बोलतात त्याचे कारण त्यांचं जेवणात गोडवा असतो. सहचारिणी पौर्णिमेच्या हाताचा स्पर्श म्हणून की काय त्या मधाळ बोलण्यावर पुरुषवर्गापेक्षा महिलावर्ग अधिक प्रमाणात आकर्षित होतो, हे रहस्य कुणाला न सांगितलेले बरे...! त्यांना तर माहितीच आहे मी काही कुणाला रहस्य सांगत नाही. तरीही ते अधून मधून माझ्यावर आक्षेप घेऊन नाही नाही तू कधी असे बोलत नाही....! हि त्यांची चेष्टा म्हणजे  त्यांचे गोड बोलणे बघून मी देखील माझ्या घरी बायकोला सांगितले, आपल्याला देखील गुळ टाकून जेवण करीत जा....! जमणार नाही.....! थेट प्रश्नातला दम काढून घेतला आणि म्हणाली डॉक्टरांनी गोड खाण्यास मनाई केली आहे. तुम्ही मिरचीची भजीच खात जा..! वाटल्यास खर्डा बनून देते. असे  दरडावून सांगणाऱ्या बायकोला काय म्हणायचं.
मला लहानपणी शाळेत जबरदस्तीने भाषण करायला उभे केले. भाषण कसं करायचं ठाऊक नव्हतं, गुरुजींनी ढकलत ढकलत मुलांच्या पुढे उभे केले. काय बोलावं..समजत नव्हतं. बंधू भगिनी बोलून झाले आणि पाय थरथरायला लागले. ओठांत देखील वादळ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली अन यातच माझा माझ्या पोटावर हात गेला तसं मला कारण मिळाले. गुरुजी..... पोटात गडबड. कशीबशी सुटका झाली. सुटका होताना मात्र आग्र्याहून शिवराय निसटले कसे.... हे मनात आले. पण विनू म्हणजे कोणताही विषय असो, घुमवून फिरवून आणतो. भाषणकला सर्वाना जमते असे नाही. विनूकडे मौलिक विचार सांगण्याचे लकब,मानवी स्वभावाचे सूक्ष्म अवलोकन करून मनमोकळेपणाने कौतुक करण्याची सहृदयता, नर्म विनोदाचा शिडकावा या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या समृध्द वकृत्वशैलीत दिसून येते. कधीकाळी आम्ही प्रयत्न केला आणि शौचालय गाठले होते. पुन्हा धाडस होत नाही. विनोदाने गुदगुदल्या करीत समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमटविणारा नायक म्हणजे विनायक....! आपुलकीने  *किशोर तिगडी*  त्याला बुवा म्हणून साद घालतो. बुवा कीर्तनकारांना म्हणतात. नव्वद वर्षापूर्व प्रारंभ झालेल्या भावगीतांवर सखोल अभ्यास करीत व्याख्यान देत जुनं ते सोनं कसं होतं हे हरीभक्त पारायणकार आपल्या पांडुरंगाची महती सांगतात त्या प्रमाणे अनेक प्रतीभावंतानी निर्माण केलेल्या भावगीतांचा  सखोल चिंतनाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना देऊ करणारा विनायक हा या विषयातील अभ्यासाचा नायकच.  
विनायक जोशी  नावाला वैशिष्ट्ये  असेल तर त्यांच्या सुरमयी सांज संगीतामुळे.....! स्वरांचा आराधक आहे. सूर ताल लय यांचा आकृतीबंध असलेल्या त्यांच्या अनेक मैफिली ऐकल्या. त्यांच्या स्वरात आकार आहे तोच तेजस्वी असल्यामुळे कुंदनलाल सैगलचा प्रतीरव घेऊनच मंचावर बाबुलमोराची सुरेल ताण... म्हणजे श्रोत्यांना काहीकाळ तरी भूतकाळात डोकावून आणते. गाणे आमचा प्रांत नाही.  पण घरात ऐकायला कंटाळवाणे असते, सुरांची बेचैनी यातना देते, तेच जर मैफिलीत बसल्यावर मात्र ती सुरेल ताण... व्वा व्वा करीत मनसोक्त आनंद भोगतो आणि तेथील वातावरणात रमतो. मनात तरंग उठल्याने आता काहीतरी झंकारत असल्याची अनुभूती ओठावर पुटपुटल्याविना राहवत नाही. गाणं ऐकणं तेवढं माहिती आहे. त्याचा आनंद शब्दापलीकडचा. सांगायचा प्रयत्न करून आपल्या अपंग बुद्धीचे अनाठायी प्रदर्शन केल्यासारखे होईल.
गाण्याप्रमाणे आमच्या विनुला खाद्यआहाराचा  फार लळा आहे. *उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म*, हे उगाच म्हटले नाही. जठराग्नीच्या आवडी निवडीकडे लक्ष न देता ताटात आलेले तळलेलं, भाजलेलं,उकडलेलं काही असो....! गपगुमान पोटात ढकलायचे. वरून म्हणायचे, क्या बात है...! म्हणतात असे खाल्याने माणूस लठ्ठ होतो.पण विनुकडे पाहून त्या आहारतज्ञाला लाखोली वाहावी, असेच वाटते. काय खोटे सल्ले देतात. हे खाऊ नका ते खाऊ नका. तरुणपणीचा फोटो आणि आताचा फोटो जरी एकत्र ठेवला तरी ती अंगकाठी आहे तीच अजून तशीच ठेवली आहे. आमच्यासारखे अनेक बालमोहन झाले असतील पण एकही केस न गळलेला विनू....!
कधी कधी वेळ मिळाला आणि कंटाळा आला की, मला असे काहीतरी सुचते. प्रकृती सांगते ते करायचे असते ते लेखकाने. पण गवय्याला रियाज करावा लागतो. ते नादमाधुर्य चोखंदळून पाहावे लागते. पेशकारी जुनी असली ती खुलवून आणि फुलवून नवीन रचनाबध्द करण्याचा प्रयास रियाज घडवून आणतो. जीवनाचा सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा याची दृष्टी ईश्वराने बहाल केली आहे. जीवनात खळखळून वाहणारा आनंदाचा झरा सतत आपल्या आनंदवनात हसता खेळता बहरता राहो, हि सदिच्छा व्यक्त करून येथेच थांबतो. नाहीतर म्हणाल काय गुऱ्हाळ मांडले आहे.

*अशोक भेके*