Thursday, August 15, 2019

माणूस साधा आणि पक्का इरादा


किरण टाकळे
                       
            माणूस हा बोलणारा प्राणी. निर्मळ मनाची माणसं खूप बोलतात.पण अबोल माणसे बोलत नाहीत ती अत्यंत धोकादायक असतात, असे म्हटले जाते. एकवेळ  मुका असला तरी खुणा करून बोलतो. काहीजण रंगरेषाच्या सहाय्याने बोलतात. काही सुरातून, नादातून बोलत असतो. तर आमच्यासारखे क्वचित लेखणीतून बोलत असतो.परंतु आपल्या कर्माच्या सहाय्याने बोलणारा माणूस म्हणजे  *किरण टाकळे.....*  ध्येयापोटी, मायेपोटी समाजावर भाबडे प्रेम करणारा किरण म्हणजे जगण्याचा निव्वळ आनंद घेत आहे. सर्वांच्या उपयोगी पडावे, कोणी बोलावे अथवा न बोलावे, धावून जात पडेल ते काम इच्छा बाळगणाऱ्या किरणचे शब्दचित्र करण्याचा मोह होण्यास कारण असे घडले की, काल मी रस्त्यावरून जात असताना या शनिवारी काय लिहावे मनात विचार सुरु असताना एका इमारतीच्या खाली गर्दीत उभा असलेल्या किरणकडे माझे लक्ष गेले. त्याने देखील पाहिले. गर्दीतही त्याचा हात उंचावला गेला. तेव्हाच मनात आले विषय तर समोरून चालत आला. लहानपणापासून पाहत आलो त्या किरणवर लिहावे असा विचार बहुतेकवेळा मनात आला. परंतु काही ना काही कारणास्तव माझा हेतू साध्य झाला नाही. मध्यंतरी विभागीय ज्येष्ठ महिलांना देवदर्शन करून आणायची योजना आखली होती. साधारणत: सोळा एक बसेसची तयारी करण्याचा चंग बांधला होता. परंतु काही कारणास्तव त्या योजनेवर पाणी पडले. निराश झालेल्या किरणने दुसऱ्या कार्यक्रमाकडे स्वत:ला वळविले. मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचे ठरले. अनेक स्पर्धकांना निमंत्रणे धाडली. महाकाय स्मृतिचषक बनविण्यात आला आणि ऐनवेळी पुलवामा घटना घडली आणि या संकल्पनेला ऐनवेळी रद्दबातल करावे लागले. माणूस करायला इच्छुक असतो पण अडचणी उभ्या राहतात. मनातले हौशीपण धुळीस मिळते. अशा बाबी शब्दामध्ये बध्द करता येत नाही. परंतु ठीक आहे. त्यांना समाजासाठी काही तरी करायचेच आहे तर आज ना उद्या नक्कीच यापेक्षा अधिक उर्जेने करतील. ज्याचे कर्म बोलते ते जर विधायक असेल तर तो खरा समाजसेवी गप्प कधी बसत नाही. अनेक कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात पटाईत असलेल्या किरणला सनई सुरांच्या (सनईचे सूर म्हणजे वरातीचा मूड निर्माण करणारे) कार्यक्रमाची रूपरेषा आखता आली नाही.
            किरण राजू कामाठी चाळीतच मोठा झाला. श्याम टाकळे यांचे ज्येष्ठ पुत्र. वडील देखील समाजसेवी. घोडपदेव नागरी पतसंस्थेवर संचालक म्हणून ह्यात गेली. खरं तर ते वैश्यवाणी असल्याने त्यांचा धंद्याचा पिंड. धंदा करून पाहिला. धंद्यात चांगला जम बसला होता. पण एका जागी खिळून राहणे त्याला जमेल तो किरण कसला...! चळवळया माणसाला एका ठिकाणी बांधून ठेवले तर त्या जागेत भूकंप नक्कीच होऊ शकतो. किरण प्रकाशझोतात येण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे सौ समिता नाईक यांच्या निवडणूक प्रचारार्थ दारूखाना भागातील एकट्याने धुरा सांभाळताना तेथेच कैक दिवस राहिला. तेथेच खाटेवर डुलकी मारीत काही दिवस तेथेच वास्तव्य करीत त्या दाक्षिणात्य माणसांच्या गोतावळ्यात सहभागी झाला. त्यांचा आदर करीत, त्यांना समजावून घेत त्यांच्या चालीरीतींना दाद देत सखा झाला. खिश्यात पैसे नव्हते, पण उत्तम स्वभाव आणि प्रामाणिकपणा या न संपणाऱ्या धनाच्या जोरावर दिवस रात्र  पक्षासाठी केलेले काम सर्वांच्या हळूहळू लक्षात आले. या कर्तुत्वाचे मोजमाप केले तर त्यातील गुणाची टक्केवारी निश्चित किती असावी...! हे संबधित किंवा ज्यांना राजकीय विषयाची आवड आहे आणि बारीक सारीक बाबीकडे ज्यांचे लक्ष असते ती मंडळी, राजकारणात किरण किती मुरब्बी आहे यासाठी  नक्कीच १०० गुण अदा करतील.
            आम्ही मंडळी दशक्रीयेला रे रोडच्या स्मशानभूमीत गेलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. दशक्रिया सभामंडपाच्या सभोवताली शेवाळ झाले होते. येणारे सगेसोयरे त्यादिवशी घसरणीचे शिकार झाले होते. परंतु प्रसंग पाहून कोणी काही बोलले नाही. परंतु आमच्या मनाला हि बाब चटका देऊन गेली. आम्ही घरी आल्याबरोबर सदर शेवाळविषयी वृत्त संबधितांना समजेल असे लिहिले. विश्वास बसत नाही. परंतु या किरणमहाशयांनी त्याच दिवशी पाऊस पडत असताना  रे रोडच्या स्मशानभूमीत जाऊन स्वत: कामगाराकडून सदर जागा स्वच्छ करून घेतली. हे मला त्यांनी सांगितले नाही तर मी सदर बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला आम्ही कालच स्वच्छ केल्याचे सांगितले...! तेव्हा मला कळले. साध्या मनाला बुचकळ्यात ढकलणारा हा  सरळ वळणाचा  आडवळणी विषय अधिकाऱ्यांनी ऐकविला अन त्यांच्या कार्यकर्तेगिरीला खरोखर प्रणाम केला. माणूस साधा पण पक्का इरादा असलेला समाजासाठी जेव्हा तळमळत असेल, अवघ्या समाजाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी जर कळकळ असेल तर त्याच्या कार्याला दाद द्यायला आम्ही मनाचा मोठेपणा दाखवायला हवाच.किरणसारखी माणसं समाजाशी जन्मजन्मांतरीचे नाते समजून आत्मविश्वासाने, सुखानं,अगदी रुची घेत घेत जर काम करीत असतील त्यांना शौकीन म्हणावं की, वखवखलेले म्हणावं....! त्याच्या व्यक्तिमत्वाचे काही विशेष येथे अधोरेलिखित करायला हवे होते. पण वाचकांना अधिक गुऱ्हाळ पसंत नसते आणि लेखनशिष्टतेत योग्य नव्हे. किरणनी स्विकारलेल्या या आनंदी पाऊलवाटेवर त्यांचे सहकारी असतील, सोबती असतील. आपण मात्र त्यांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.

अशोक भेके
घोडपदेव समूह


No comments:

Post a Comment