Thursday, August 15, 2019

*वामनमुर्ती तुकाराम*

तुकाराम मारणे

माजात वावरणाऱ्या अनेक व्यक्तींशी रेशीमगाठी जुळत गेल्या. रेशमासारख्या मृदू मुलायम सुखद आणि पक्या गाठी इतक्या घट्ट होत गेल्या. अशा अनेक मंडळीनी मला इतके दिले की, त्यांच्या विषयीच्या भावना माझ्या कृतज्ञतेच्या आहेत. कृतज्ञता ही माझ्या शब्दातूनच व्यक्त करू शकतो. प्रवचनाच्या, किर्तनाच्या शेवटी  ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. यासारखे अनेक विठ्ठल ज्ञानेश्वर पंढरीनाथ तुकाराम सोबतीला आले. त्यापैकी मला माझे मित्र *श्री तुकाराम मारणे* यांच्याविषयी काहीतरी लिहावं, हे बरेच दिवस मनात होतं शब्दांना सांगावं, शब्दांना आठवू लागले की, तितक्यात कोणी तरी साद घालावी.बोलवावं, नाहीतर मोबाईलची घंटा घनघन वाजत राहावी. याचमुळे विचारशृंखला भंगत गेली आणि तुकाराम लिहिण्याचे राहून गेले. आज लिहायला घेतले खरे, पण तितक्यात आमचा एक मित्र कोलमडला.’उद्या सकाळी लवकर लग्नाला जायचं आहे ना...!, मग लवकर झोप’ त्याला जाऊन दिले आन पुन्हा एकदा आपले बस्तान ठोकले. आज तुकाराम पूर्णत्वास न्यायचाच. निर्धार केला. *तुकाराम मारणे* हा आमचा मित्र.


*तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा*
*काय महिमा वर्णूं त्याची*


पुण्यातल्या उंबरडे,आंबेगाव येथे १५.१२.१९५५ रोजी जन्म झालेल्या तदनंतरचे आयुष्य  मुंबईवासीय होऊन मारुती माळी चाळीत राहणारा. अत्यंत भाबडा, श्रद्धाळू,देवभोळा, सीधासाधा निर्मळ  स्वभावाची ठायी ठायी प्रचीती येते.देवघरातल्या समईसारख्या शांत स्वभावाचा.कुणी केलेल्या उपकाराचे सदैव स्मरण करणारा, फुकटेपणा करण्याची, अथवा बळकावण्याची वृती अजिबात नाही. एकवेळ खिश्यातले देईल पण कुणाच्या पांच पैश्याला मिंधा नाही.दूरदर्शनवरच्या मालिकेतल्या तुझ्यात जिंव गुंतला मधल्या राणासारखा...! वरून जरी साधा माणूस असली तरी यांच्यातला खळखळणारा लाव्हा क्वचितच कुणाच्या तरी निदर्शनास आला असेल. आचरणानेच काय,विचाराने देखील सत्प्रवृत्त, कुणाची निंदा नाही, कुणाविषयी वाईट चिंतने नाही. मदत करण्याच्या बाबतीत *तुकारामाचा आदर्श* हातिमताईचा....! नेकी कर, पाणी में डाल या तत्वांचा. मनापसून द्यायचे अन स्वाहा: करायचे.या माणसाचे मनोविश्लेषण खोलवर जाणताना भावनांचे आणि संवेदनाचे पदर वेगवेगळे करून पाहिले तर या ईश्वराने सुखी माणसाचा सदरा देताना काहीच हयगय केली नाही. कधीही न भेटायला येणारा माणूस जर आपल्या भेटीस आला तर साधारणपणे आपण आज कशी काय वाट चुकलात....! किंवा आमची आठवण कशी काय झाली, असे तिरक्या शब्दांचे शेले भेटताक्षणी हाणीत असतो. पण तुकाराम मात्र ‘अलभ्य लाभ...आज भेटीचा योग जुळून आला म्हणून आपण अवतरलात, असे मी समजतो.’ तिरकस बोलण्याने आनंद नासून जातो. समोरच्याच्या मनात आकस निर्माण होतो. हे घडू नये म्हणून त्यांचे स्नेह, औदार्य दर्शन प्रसन्न करते. वाद होतील किंवा जे पटत नाही त्याच्यापासून दूर राहणेच सदासर्वदा पसंत करतात.कुणीही माणूस आजारी पडला की, त्या आजऱ्याचे आसू स्वस्थ बसू देत नाही.पहिले अस्वस्थपण या माणसात जाणवते. हृदयाची स्पंदने धडधडू लागतात. मातीचे मुके कढ जसे मातीला कळते तसे आजाऱ्याला आधार कसा द्यायचा हे तुकारामकडून शिकावे.त्याच्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी सर्वथा असते. अनेक जणांना अनुभव आहे. रात्री बेरात्री कधीही *अण्णा*  हाक मारली तर धावत जाई. आजारीमाणूस देखील आता पुढची चिंता नाही, म्हणून सोन्यासारखा आपला जिंव स्वाधीन करून मोकळे होतात. आश्वासक स्वर त्यांच्या अन्त:करणात घुमला जातो. जनसामान्यांच्या सुख-दु:खात सरळ सोप्या अर्थपूर्णबाबीसह समरस होणारा माणूस.तुकारामच्या आयुष्यात काळे पांढरे रंगी बेरंगी ढग आले आणि गेले....! आभाळ मात्र तेथेच राहिले. स्थितप्रज्ञ निष्ठावंत शिवसैनिक,मोलाची पदवी ग्रहण करून गर्दीत राहण्यापेक्षा मागे उभे राहून अतोनात कष्ट करणारा माणूस. शिवसेना म्हणजे त्यांचा जिंव की, प्राण. पक्षासाठी एकजींव झालेला माणूस. चार्ली चॅप्लीनसारखा तुरु तुरु चालणारा.पायाला भिंगरी लावल्यागत धावपळ करणारा. साधा पेहराव, शिडशिडीत बांधा म्हणजे मूर्ती लहान म्हटले की वामनमुर्ती हे संबोधन आलेच. माणूस आभाळासारखा उंचीचे मोजमाप करू नये पण वामनमुर्ती म्हणून संबोधने गैर नाही. या माणसाचा खरा स्वभावाचा प्रभाव आम्ही *बायांनो नवरे सांभाळा* हा प्रयोग नाट्यगृहात लावला तेव्हा मनावर बिंबला. त्याचा संसार समृध्द आहे, समाधानी आहे.सहचारीणी संगीतावहिनींची समाजसेवेची आवड सोबत त्यांनी स्वत:च्या प्रकाशाचा विचार न करता एकमेकांची सावली बनून राहणं, पसंत केले आहे. हळदी कुंकुवाची साथ एकमेकांची. कितीही म्हटले एकमेकांना अलौकिक, असामान्य तरीही राजकारणात उच्चपदी असून देखील समाजासाठी जमिनीवर पाय रोवून काम करणारी जोडी म्हणून कौतुक तर त्यांचं करायला हवं. खरं तर मफतलाल गिरणी बंद झाल्यावर परिस्थिती खालावली होती. पण एकमेकांनी आहे त्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले. मिळेल तेथे काम करीत तुकारामने ते संकटमय क्षण कौशल्याने, हळुवारपणे हाताळले. कष्टपूर्वक साध्य करण्याच्या वृत्तीचे कौतुक वाटल्यावाचून राहवत नाही. चेहऱ्यावर विलसणारे ते हास्य, हास्यप्रधान वामनमुर्तीकडे पाहिले तर त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणणे मनाला पटत नाही. वय झाले असले तरी तरुण आहेत. अजून काय लिहावं... लिहायला बसले की सुचत जाते अन आपण रेखाटत राहायचे. त्यापेक्षा आपले थोडक्यावर समाधान मानायला हवे.


अशोक भेके 

1 comment:

  1. Online Casino | Play Online Casino UK | FBCAsino.com
    Join FBCasino.com now for access to 100,000 of the hottest online 1xbet korean casino 메리트카지노 games. Play slots, table games, and more for free at 바카라 FBCasino.com.‎Free Bets · ‎Casino · ‎Login

    ReplyDelete