Sunday, November 4, 2018

ध्येयवेडा काजवा : श्री रमाकांत रहाटे




            
 किती वाट पहिली उजेडासाठी....अंधार ठाण मांडून बसलेला असताना काल म्हाडा कॉलनी अचानक दीपावलीच्या तोंडावर प्रकाशात न्हाऊन निघाली. तमोमय जीवन जगणाऱ्या म्हाडावासियांना उजेडाचे डोळे मिळाल्याचा आनंद सर्वांना झालाच असेल. परंतु या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होताना म्हाडावासियांचा ह्द्याचा कण कण हा क्षण आनंदाने पाहत होता. जेथे अंधार असतो, तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य असते. मग तेथे उंदीर येतो. उंदीरांची एकलेपणाची आग शमवायला घुशी येतात. डांस येतात कीटक येतात. अंगाचे पानिपत करीत असतात. कुत्रे येतात हळूहळू पिलावळ जमा होते. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग धुंडाळताना  रात्रीच्या अंधारातला वाटसरू प्रभाते मनी राम चिंतीत जावा म्हणत म्हणत जाताना अचानक हल्लाबोल म्हणजे जीवांशी खेळ खेळला जात असतो. गेली अनेक वर्षे म्हाडावासीयांच्या नशिबी दुर्दैव आले होते. बरे झाले दीप लागले.
लाविले दीप रस्त्यावरी
भाग्य घेऊन आली दीपावली

ऐन दिवाळीत घराघरात ज्ञानाचा प्रकाश पोहचवावा यासाठी अनेक जणांनी यासाठी प्रयत्न केले. पाठपुरावा करीत होते पण अनेक वर्षे झाले म्हाडा आणि महापालिका समन्वयाच्या  अभावातून रखडलेले मार्गाप्रकाश दिवे अखेर स्थानिक नगरसेवक श्री रमाकांत रहाटे यांच्या  प्रयत्नातून लागले. चांगल्या कामाचे कौतुक करायलाच हवे. खरा आनंद शेअर करण्यात आहे, त्या गोष्टी काहीही असोत, कश्याही असोत.काही गोष्टी सकारात्मक उर्जेने घ्यायला हव्यात. नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी केलेले कार्य म्हणजे प्रकाशाने अंधारावर विजय मिळविल्यासारखे आहे. प्रेमाचा आणि विवेकाचा दीप आपण घर सजविण्यासाठी लावतो. पण घराबाहेर किंवा अंगणाबाहेर प्रकाश दीप लावून अंधारावर विजय मिळविण्याचे बहुमोल कार्य करणाराला किती सायास करावे लागले असतील. ते रहस्यमय प्रफुल हास्य पाहून कोणीही म्हणावं प्रसन्न अविष्कारी माणूस. सामाजिक समस्यांचे सखोल चिंतन करणारा, अत्यंत तन्मयतेने लोकसेवेला वाहून घेतले आहे. प्रत्येक माणसात सुप्त गुण दडलेले असतात. काही ना काही चांगलेच असतात. केवळ ११ मार्गप्रकाश दिप लावून थांबायला नको. श्री रहाटे यांच्या क्षमताचे मूल्यमापन करायला गेले तर प्रतिभेची कुंडले तागडीत टाकून त्या कुंडलाचा अपमान आम्हांला करणे शोभणार नाही. कामाने झपाटलेला माणूस.टंगळमंगळ करीत बसत नाही. होणार असेल तर होय.. नसेल नाही.
घोडपदेवची म्हाडा कॉलनी म्हणजे अचानक विश्वकर्म्याने घोडपदेव सारख्या भागात निर्माण केलेली वसाहत. विश्वकर्मा सारे काही बनवून गेला, पण मार्गप्रकाश दिवे तेथे निर्माण करण्याचे विसरून गेला. त्यामुळे रुखरुख हीच आणि हुरहूर होती. कितीही पेटलो तरी अंधार दूर होणार नव्हता. झारीत शुक्राचार्य बसले असताना या विषयावर अधिक उहापोह करणे, म्हणजे उगीचच काळोख्या पडद्यावर आठवणीचा सिनेमा दाखविल्यासारखे होईल. रात्रीची अंधारी पायवाट. कुठल्या तरी खिडकीतून आलेल्या कवडश्यामुळे कसंबसं माणसे प्रयाण करीत असत. आमची माणसं सूर्यफुलासारखी आहेत. जिकडे सूर्य वळेल त्या दिशेला ते तोंड करीत असते. आमची मने अशीच आहेत. जेथून प्रकाश मिळेल, तेथून आपला विकास साध्य करण्यासाठी वळत असतात.
श्री रहाटे यांच्याविषयी काही चर्चेतल्या गोष्टी बोलताना त्यांनी महापालिकेतील मराठी राजभाषा दिन या संदर्भात अनेक सूचना मांडून महापालिकेत खऱ्या अर्थाने मराठी दिवस साजरा केला जात आहे. शिवाय बोजड आणि सर्वसामन्यांच्या डोक्यावरून जाते. कोणते भाषाप्रभू असे शब्द त्यामध्ये देतात की ते अभ्यासायला शब्दकोश घेऊन बसावे लागते. तिचे  शब्द सोपे व्हावेत, सुलभ व्हावेत यासाठी अमराठी अधिकाऱ्यांना मराठीची उजळणी लावा....! असे ठणकावून सांगायला कमी पडले नाहीत. आपली वाट आपल्याच पायांनी मळणारा, वृत्तीतले कृतीत आणणारा सतत धडपडणारा माणूस म्हणजे वैभववाडीचा दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देणारा ध्येयवेडा काजवा आहे. *श्री रहाटे यांना सुबुध्दपणे इतकंच सांगू इच्छितो की, दुरितांचे तिमिर घालवण्यासाठी आपण केलेल्या कार्यासाठी शुभेच्छा देताना आपल्या मनात असलेले आणि समाजाला आपणाकडून अपेक्षित असलेले.... जो जे वांच्छिल ते ते लाहो.....!*



*अशोक भेके*

Sunday, October 28, 2018

ती फुलराणी : संजू जोशी



*संजीवनी जोशीला* पाहिलं की, भक्ती बर्वेची आठवण आल्याशिवाय राहत नाही.  ती फुलराणी नाटकातील मंजुळा आणि आमच्या संजू जोशी... काही फरक वाटत नाही. त्या फुलराणीतील मंजूचा  मास्तर अशोक आणि संजू जोशीचा राजकुमार देखील अशोक... कधी काळी हा राजबिंडा राजकुमार टाप टाप करीत घोड्यावर बसून आला होता. इतका हँडसम माणूस, पिळदार दंड  आणि डोळे.... बापरे ! भेदक... म्हणजे भलतेच आकर्षक. खरंतर देवांनी नाकीडोळी छान कन्यारत्न पाठविलेले पाहून फडक्यांना ही पोर  उजवायला जोडे झिजवायला लागणार नाहीत. हे तेव्हा अनेकांनी म्हटले होते. सांगायचं म्हणजे तथ्यच होतं. महत्वाचं म्हणजे जिल्हे इलाही सम्राट अशोकाच्या कानावर या लावण्यवतीची वार्ता येऊन थडकली. मुळात सम्राट हा सिनेरसिक, गानरसिक.. खरं तर तिच्या लावण्यापेक्षा सुमधुर आवाजावर फिदा झाला.  लगोलग  हातात ती फुलमाला खास माटुंग्याच्या दुकानातून बनवून आणली होती.उभयतानी एकमेकांच्या गळ्यात घातलेला तो पुष्पहार म्हणजे लक्ष्मीला नारायण भेटला. बुद्धीजीवी फार तर विज्ञान आणि वाणिज्य ( अर्थ) यांचा संगम झाला, असेच म्हणतील. कारण अशोकराव विज्ञान शाखेचे संजू जोशी वाणिज्य शाखेतल्या. आतापर्यंत त्या टवटवीत आयुष्य जगत आहेत. त्यांच्या आयुष्यातला खरेपणा देखील जास्त आहे. संसार आणि नोकरी करताना कोठेही कांगावा करीत कधी करणार नाहीत. तुला शिकवीन एकदाचा धडा.... असा अभिनयी अंदाज कधी चुकुनही नाटकी ढंगात त्यांच्या सप्तरंगी आयुष्यात उच्चारला गेला नाही.

संजू जोशी चुकून बँकिंग क्षेत्रात प्रवेशकर्त्या झाल्या, असे मनोमन वाटते. त्या आगळ्या कलावंत...  उत्तम अभिनयाबरोबर त्यांच्याकडे असलेले अप्रतिम निवेदिकेचे कौशल्य हा सुप्त गुण त्याचे वर्णन आम्ही काय करावं. आता त्यांच्या वर्णनाचे अस्तर उलगडून सांगायचे म्हणजे मध्यम बांधा,केस पिंगट काळे आणि मनाने फटकळ असली तरी मनमोकळी !! मनात किंतु आणि परंतुला स्थान नाही. वागण्यात बोलण्यात ऐट पाहिली की, आपण त्यांच्याकडून शिकावं... शिकण्यासाठी लहानथोर असा भेदभाव  मनात आणीत नाही आणि जो आणतो तो शिकत नाही. मनातले गुंज कथन करायचे झाले तर उपजीविकेसाठी नोकरी करायलाच हवी. परंतु जर आपल्या छंदीपणाला पांघरून घालून नकोच. आपल्या अंगात असलेल्या कलेशी मैत्रीचे घट्ट नाते विणले गेले तर तेच आयुष्य जगायला नवीन दिशा देईल. पोहायला येते म्हणून पाण्याशी घट्ट मैत्री होते.म्हणून ते पाणी आपल्याला हवे तेवढे उचलून धरते.याबाबत संजू जोशींनी आपल्या आवडीनिवडीला एकसंघ बांधून ठेवले आहे. भोंडला असो वा रास दांडिया... अगदी नियोजन करून त्यात उतरायचे. अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणायचं नाही नाहीतर मागून कुणीतरी चढ्या आवाजात विठूचा गजर हरिनामाचा.... मराठी मनाच्या कोपऱ्यातून आलेला थेटपणा हास्याच्या उकळ्याना ऊत आणायचा.

पार्ल्याला त्यांचं घर चोरट्यांनी फोडले. ही बातमी वाऱ्यावरची वरात होऊन घराघरात पोहचली. घरात होतं ते घेऊन पोबारा केला. दुसरा कुणी असता तर नसानसातून वाहणारा त्वेष पाहून त्यासमयी चोरटा भस्मसात झाला असता. अशोकराव किंचित चमकले आणि संजू जोशीना भरून आले. आयुष्याची कमाईवर चोरट्यांनी मारलेला हात... वाईट वाटले पण मी पानवाल्याच्या गादिसमोर उभा राहून विचार करीत असताना त्या चोरट्यांना सरळ भाषेत वेडा यासाठी ठरविला की,  संजू जोशीच्या डोळ्यातून टपकलेले ते मोती मौल्यवान मागे टाकून गेले. हा एक विनोदबुद्धीचा एक भाग आहे. पण आलेल्या संकटावर कशी मात करायची याचे उपजत ज्ञान असावे लागते. देवाच्या देणीतले एक ठेवनीचे देणे, जे सर्वांकडे नसते. इष्ट आणि स्पष्ट बोलण्यातून मर्यादांचे उल्लंघन झाले तर नाराजीचे सूर उमटतात. पण संजू जोशी यांच्याकडे असलेले कुणालाही न दुखावण्याचे देणे, याची गोळाबेरीज करायला नको.

मध्यंतरी त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या आप्तांनी *संजीवन* नावाचा कविता संग्रह प्रकाशात आणला. दरवर्षी त्यांचा वाढदिवस ही आमच्यासाठी एक पर्वणी असते. आनंदाच्या क्षणाची माळ गुंफत  स्नेहभावनेने मित्र मैत्रिणी, ताई माई आईआजी सकाळी सकाळी बहुरंगी स्वभावाच्या रंगपेटीला  ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ सूर आळवून शुभेच्छा देतात. ही मिळणारी उत्स्फूर्त दाद त्यांना शतायुषीच्या पल्याड घेऊन जावी, ही सदिच्छा व्यक्त करून या लेखन मैफिलीची सांगता करतो.

अशोक भेके

*चर्चा एका दाऊची*




परवा दाऊ लिपारे यांनी वेगळ्या वाटेवर प्रयाण केल्याचे म्हणजे मनसेतून शिवसेनेत दाखल झाल्याचे सोशल मिडीयावर प्रसारित झालेले फोटो पाहून कोणी अचंबित होण्यासारखेच आहे. या वृत्ताची चर्चा होणारच. त्यात काहींनी केली व्यक्त हळहळ, त्यात टीकाही होती  तर काहींनी केले स्वागत. दाऊ म्हणजे विजय लिपारे... खास वेगळेपणाने मैत्री जपणारा एक पराकोटीचा आमचा सुसंस्कृत मित्र. मनसेच्या गोतावळ्यात दाऊला नेहमीच झुकते माप दिले. शिवाय वरिष्ठ पातळीवर कांकणभर अधिक कौतुकही केले गेले. हे शिवसेनेत देखील घडेल. अती रथी महारथी ही मंडळी देखील वाऱ्यावर सोडणार नाहीत. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी कुठे जायचे आणि कोठे राहायचे....! संविधानाने दिलेले व्यक्तीस्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य यानुसार मनमर्जीनुसार आपल्याला कोठेही संचार करता येतो. त्या संचारात जीवनात वाहणारा आनंदाचा निर्झर कायम राखला  पाहिजे. जे जे उत्तम उन्नत उदात्त अपेक्षित असते ते तेथे मिळेलच असे नाही. पण एक महत्वाचे जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. ज्याच्यात हिम्मंत, त्यालाच बाजारात किमंत... किती सुलभतेने आपण म्हणून जातो.  हे राजकीय क्षेत्राशी निगडीत नाही. पक्षांतर करणारांची हिम्मंत तात्पुरती असते आणि किमंत शून्य होते. जेव्हा आपल्याला पक्षातील काही गोष्टी पटत नसतील आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या असतील तर आपण शांत बसलेले बरे....!
*तू यावं, तू जावं*
*मन बंधन तोडीत जावं*
*शिव बंधन बांधीत यावं*


हे समर्थन नाही तर वस्तुस्थितीचे कथन आहे. दाऊने  पण त्यांच्या सोबत्यांवर भरभरून प्रेम केले, हे नाकारता येणार नाही. हे घडायच्या अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला आम्ही जवळ जवळ अर्धा तास गप्पा मारल्या. पण त्यांच्या बोलण्यातून असे काय जाणवले नाही. अखेर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक पाहिले की, त्यांनी पांघरलेला मुखवटा न गळून पडण्यासारखा होता. चेहऱ्यावर न जाणवणारे भाव. चिडचिड नव्हती उद्वेगही नव्हता. रंगमंचावरचा विदुषक देखील आपल्या बुरख्याआडची छटा लपवू शकत नाही. आपण तर माणसे... एकमेकांचा चेहरा वाचू शकत नाही, याचा अर्थ असा की, आम्ही म्हणजे एक शून्यासारखी गत झाली. स्वाभिमानी पण प्रेमळ, क्वचितप्रसंगी बिलंदर ( आता घडलेल्या प्रसंगावरून ) शक्यतो सत्याची कास धरणारा विजय लिपारे मनाला जाम भिडतो. नगरच्या शेतीत आणि मातीत वाढलेला हा रुबाबदार आपुलकीबाज व्यक्तिमत्वाशी आम्ही जोडलो गेलो.
मनसेला नवीन नाही. अनेक होते त्यांनीही वेगळ्या वाटा निवडल्या. जाणारे जात आहेत. त्याचा फरक इतरांच्या मनावर होत नाही, हे विशेष. विशेष म्हणजे असे काही घडले की मनसैनिक जागे होतात. त्यादिवशी काहीतरी चारशे साडे चारशे महाराष्ट्र सैनिक  माझगाव गडावर पोहचले होते. अशी जागरूकता असेल आणि अंतर्गत कलहाकडे सुजानतेने दुर्लक्ष केले तर, गेलेली उभारी पुन्हा मिळविता येईलच. हे स्थानिकांचे म्हणणे रास्त आहे.
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ आहे. चांगली पाने वाट्याला येणे, हा एक नशिबाचा भाग आहे. पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे हे विजय लिपारेना कितपत जमतंय....! जमलं तर यश निश्चित आहेच. तरीही आम्हां सृष्टांच्या शुभेच्छा सदैव त्यांच्या पाठीशी आहेत.
त्यांना उतरोत्तर यशोन्नती मिळत राहो आणि त्या वाढत्या उन्नतीबरोबर अहंकाराचा वारा न लागो...! पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.



*अशोक भेके*


Thursday, October 25, 2018

*आमचा सुरमयी विनू*




आमचा विनू म्हणजे *विनायक जोशी*. डोंबिवली सारख्या सांस्कृतिक नगरीला लाभलेले  म्हणण्याऐवजी *बँक ऑफ इंडिया*  सारख्या राष्ट्रीयकृत बँकेला लाभलेला आनंदाचा झरा. सतत आनंदाने पाझरत असतो. बागा फुलवीत असतो. अनेकांच्या मनातल्या बागा फुलविण्यासाठी त्यांनी उच्चारलेले, वाह .... क्या बात है....! अप्रतिम. काय त्याचं बोलणं, मधात घोळलेले आणि तुपात तळलेलं.एखाद्याने सहज फिदा व्हावं, अगदी तसं गोड बोलणं.काय विलक्षण जादु आहे या माणसात....! निखळ आनंद निर्माण करू पाहणारे श्री विनायक जोशी जसे बोलतात त्याचे कारण त्यांचं जेवणात गोडवा असतो. सहचारिणी पौर्णिमेच्या हाताचा स्पर्श म्हणून की काय त्या मधाळ बोलण्यावर पुरुषवर्गापेक्षा महिलावर्ग अधिक प्रमाणात आकर्षित होतो, हे रहस्य कुणाला न सांगितलेले बरे...! त्यांना तर माहितीच आहे मी काही कुणाला रहस्य सांगत नाही. तरीही ते अधून मधून माझ्यावर आक्षेप घेऊन नाही नाही तू कधी असे बोलत नाही....! हि त्यांची चेष्टा म्हणजे  त्यांचे गोड बोलणे बघून मी देखील माझ्या घरी बायकोला सांगितले, आपल्याला देखील गुळ टाकून जेवण करीत जा....! जमणार नाही.....! थेट प्रश्नातला दम काढून घेतला आणि म्हणाली डॉक्टरांनी गोड खाण्यास मनाई केली आहे. तुम्ही मिरचीची भजीच खात जा..! वाटल्यास खर्डा बनून देते. असे  दरडावून सांगणाऱ्या बायकोला काय म्हणायचं.
मला लहानपणी शाळेत जबरदस्तीने भाषण करायला उभे केले. भाषण कसं करायचं ठाऊक नव्हतं, गुरुजींनी ढकलत ढकलत मुलांच्या पुढे उभे केले. काय बोलावं..समजत नव्हतं. बंधू भगिनी बोलून झाले आणि पाय थरथरायला लागले. ओठांत देखील वादळ आल्यासारखी स्थिती निर्माण झाली अन यातच माझा माझ्या पोटावर हात गेला तसं मला कारण मिळाले. गुरुजी..... पोटात गडबड. कशीबशी सुटका झाली. सुटका होताना मात्र आग्र्याहून शिवराय निसटले कसे.... हे मनात आले. पण विनू म्हणजे कोणताही विषय असो, घुमवून फिरवून आणतो. भाषणकला सर्वाना जमते असे नाही. विनूकडे मौलिक विचार सांगण्याचे लकब,मानवी स्वभावाचे सूक्ष्म अवलोकन करून मनमोकळेपणाने कौतुक करण्याची सहृदयता, नर्म विनोदाचा शिडकावा या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या समृध्द वकृत्वशैलीत दिसून येते. कधीकाळी आम्ही प्रयत्न केला आणि शौचालय गाठले होते. पुन्हा धाडस होत नाही. विनोदाने गुदगुदल्या करीत समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्यछटा उमटविणारा नायक म्हणजे विनायक....! आपुलकीने  *किशोर तिगडी*  त्याला बुवा म्हणून साद घालतो. बुवा कीर्तनकारांना म्हणतात. नव्वद वर्षापूर्व प्रारंभ झालेल्या भावगीतांवर सखोल अभ्यास करीत व्याख्यान देत जुनं ते सोनं कसं होतं हे हरीभक्त पारायणकार आपल्या पांडुरंगाची महती सांगतात त्या प्रमाणे अनेक प्रतीभावंतानी निर्माण केलेल्या भावगीतांचा  सखोल चिंतनाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना देऊ करणारा विनायक हा या विषयातील अभ्यासाचा नायकच.  
विनायक जोशी  नावाला वैशिष्ट्ये  असेल तर त्यांच्या सुरमयी सांज संगीतामुळे.....! स्वरांचा आराधक आहे. सूर ताल लय यांचा आकृतीबंध असलेल्या त्यांच्या अनेक मैफिली ऐकल्या. त्यांच्या स्वरात आकार आहे तोच तेजस्वी असल्यामुळे कुंदनलाल सैगलचा प्रतीरव घेऊनच मंचावर बाबुलमोराची सुरेल ताण... म्हणजे श्रोत्यांना काहीकाळ तरी भूतकाळात डोकावून आणते. गाणे आमचा प्रांत नाही.  पण घरात ऐकायला कंटाळवाणे असते, सुरांची बेचैनी यातना देते, तेच जर मैफिलीत बसल्यावर मात्र ती सुरेल ताण... व्वा व्वा करीत मनसोक्त आनंद भोगतो आणि तेथील वातावरणात रमतो. मनात तरंग उठल्याने आता काहीतरी झंकारत असल्याची अनुभूती ओठावर पुटपुटल्याविना राहवत नाही. गाणं ऐकणं तेवढं माहिती आहे. त्याचा आनंद शब्दापलीकडचा. सांगायचा प्रयत्न करून आपल्या अपंग बुद्धीचे अनाठायी प्रदर्शन केल्यासारखे होईल.
गाण्याप्रमाणे आमच्या विनुला खाद्यआहाराचा  फार लळा आहे. *उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म*, हे उगाच म्हटले नाही. जठराग्नीच्या आवडी निवडीकडे लक्ष न देता ताटात आलेले तळलेलं, भाजलेलं,उकडलेलं काही असो....! गपगुमान पोटात ढकलायचे. वरून म्हणायचे, क्या बात है...! म्हणतात असे खाल्याने माणूस लठ्ठ होतो.पण विनुकडे पाहून त्या आहारतज्ञाला लाखोली वाहावी, असेच वाटते. काय खोटे सल्ले देतात. हे खाऊ नका ते खाऊ नका. तरुणपणीचा फोटो आणि आताचा फोटो जरी एकत्र ठेवला तरी ती अंगकाठी आहे तीच अजून तशीच ठेवली आहे. आमच्यासारखे अनेक बालमोहन झाले असतील पण एकही केस न गळलेला विनू....!
कधी कधी वेळ मिळाला आणि कंटाळा आला की, मला असे काहीतरी सुचते. प्रकृती सांगते ते करायचे असते ते लेखकाने. पण गवय्याला रियाज करावा लागतो. ते नादमाधुर्य चोखंदळून पाहावे लागते. पेशकारी जुनी असली ती खुलवून आणि फुलवून नवीन रचनाबध्द करण्याचा प्रयास रियाज घडवून आणतो. जीवनाचा सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा याची दृष्टी ईश्वराने बहाल केली आहे. जीवनात खळखळून वाहणारा आनंदाचा झरा सतत आपल्या आनंदवनात हसता खेळता बहरता राहो, हि सदिच्छा व्यक्त करून येथेच थांबतो. नाहीतर म्हणाल काय गुऱ्हाळ मांडले आहे.

*अशोक भेके*

*चर्चेतील माणसं : श्रीमान आगलावे*



परवा *श्रीमान आगलावे*  नावाचे गृहस्थ नेहमी प्रमाणे दसऱ्याचं सोने द्यायला आले सोने देताना अलिंगन दिले. अलिंगन देताना मनात अनेक विचार आले. हा माणूस फार भारी म्हणण्यापेक्षा अती कद्रू माणूस. ह्या बोटावरची थुकी त्या बोटाला कधी लावील कळणार नाही. त्याचे वर्णन करता येणार नाही. तो सडपातळ देखील नाही आणि जाडजूडा म्हणता येणार नाही. काळा की गोरा हे सांगायला मन तयार नाही. आमच्याच मातीत वाढला. नगाऱ्यासारखा फोफावला. त्यांच्या अंत:करणात काहीच राहत नाही. फक्त वितुष्ट आणण्यात त्यांना मिळत असलेल्या आत्मिक समाधाना शिवाय कुरुक्षेत्रात विजय मिळविल्याचा आनंद याचे  मला त्यांच्या स्वभावाचे विच्छेदन करता येणे अशक्यच. परवा घारूअण्णाला  फोन करून सांगितले, अरे अण्णा घरी बसून काय करतोस.... तुझ्या नावाने येथे गुळण्या केल्या जात आहेत. लगेच अण्णा आले. शहानिशा केली नाही. त्यांनी ऐकणाराला सुनाविले. आपलेपणा आणि परकेपणा यातील तर्कशास्त्र तंत्र  श्रीमान आगलावेना माहितीच नाही. त्यांची सवय हि घातकीच असल्यामुळे त्यांच्यापुढे कोणता विषय चर्चेला आणणे. हे आमचे ठरवून असते. त्यांनीच विषय काढायचा आणि त्यावर आमच्याकडून प्रतिक्रिया काढून घ्यायच्या आणि त्या संबधिताला अशा पटवून द्यायच्या की, अरे तुझ्या मुलाच्या लग्नात मंडळाचे पैसे वापरले म्हणून कधी चर्चा न होता हि कानगुज करीत आगलावे कळीचे नारद झाले होते. कुणाची म्हैस कधी गाभण राहिली ह्याची बित्तबातमी फक्त आगलावेनी चवीचवीने चुरुमुरू करीत सांगावी. परवा आमच्या संतोषने सहज विचारले, आमच्यावर तुम्ही नाराज आहात....! मी चक्क नाही म्हटले. पण माझ्या लक्षात आले, यांना आगलावे भेटले की काय....! मी सरळ अमुक माणसाने काही  सांगितले ना...! मग तू निर्धास्त रहा. आगलावे कमालीचा माणूस...! अशी बनवाबनवी कुणालाही शक्य नाही. जाईल त्याच्या तोंडावर गोड बोलायचे अन मागून निंदानालस्ती करणारा गडी. घात सारेच करतात. विश्वास ठेवावा कुणावर..? एकवेळ शत्रूवर डोळे झाकून विश्वास ठेवावा पण आगलावेंच्या छोट्या छोट्या करामती म्हणजे होळी पेटवून ठणाणा बोंबलणाराना पाहत बसायचे. किती दिवस असा स्वभाव बाळगणार.... एकदिवस हाच स्वभाव आगलावेंच्या घरावर घिरट्या घालून बेचिराख केल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना सांगायचं म्हणजे विस्तवात हात घालून भाजून घेतल्यासारखे होईल.
आगलावे सर्वांवर प्रेम करतात. सर्वांशी आदराने बोलतात. मिश्किली करतात. थट्टा करून हसवतात. समोरच्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. हवी ती मदत करीत असतात. पण हळूच त्याची माहिती काढून घेतात. तो आपल्या वरचढ असेल तर मात्र आगलावेंच्या जळाऊ लाकडाच्या वखारीत खाक झाला म्हणून समजा. कोणीतरी म्हटले होते महिला म्हणजे जळाऊ लाकडाच्या वखारी पण मुळातच ते चुकीचे असल्याचे आगलावे यांच्यावरून समस्त आमच्या मित्रपरिवाराला तरी कळलेच आहे. महाभारतात एकलव्य एकाग्रतेने बाण चालविण्याचे सुरु असायचे. पण आगलावे एकाग्रतेने आपल्या गोट्या उडविण्यात दंग. पसरलेल्या गोट्यापैकी कोणत्याना कोणत्या गोटीला त्यांची गोटी थडकलीच पाहिजे. अगदी नेमबहाद्दर...  कधी कधी अशी गोफण फिरवी की, खडा हवा तेथे लागल्याशिवाय यांना चैन पडत नसे.
संजय आणि विजय दोन्ही बऱ्यापैकी मित्र होते. त्यांना काय अवदसा सुचली त्यांनी आगलावेशी मैत्री केली. आगलावेनी त्यांच्या दोघांमध्ये एक वीट घातली. रोज विटेवर वीट रचल्या जात होत्या. त्या मधल्या विटेवर बसून आगलावे कधी उजव्या कानात तर कधी डाव्या कानात कुरकुरत  वातावरण गढूळ करीत आहे. मनं दुभंगत होती. आम्ही हे उघड्या डोळ्याने पाहतोय. पण आगलावेना आवरायचे कोणी...? असा गहन प्रश्न पडला आहे.
आता बाळोबा ( बाळासाहेब मुद्दामहून लिहिणे टाळतोय ) नावाचे एक सद्गृहस्थ वर्णाने सावळे, जबरदस्त प्रेमळ स्वभाव आणि लाघवी बोलणं. त्यांच्या लोकप्रियतेचे चटके न लागेल असे आगलावे कसले....! पण आगलावेना कुणाचे बरे झाल्याचे सुख नाही.वाईट झाल्याचे दु:ख नाही. कोण मेला गेला त्याचे सोयरसुतक नाही. रसिकही नाही अन अरसिक देखील नाही. खरंच कधी कधी अशी माणसं कायम स्मरणात राहतात त्यांच्या लोक नावडत्या कर्तबगारीमुळे...! म्हणतात शत्रू असावा पण आगलावेसारखा मित्र नसावा. तरीही आम्ही कधी आगलावेना दुखावत नाही. एखाद्याला असते सवय म्हणून रेटत रेटत न्यायचं काम करतो. आज मी आगलावेचा गौरव केला आहे. तो केवळ त्यांच्या अफाट कर्तबगारी साठी केला आहे. अशी माणसे होती म्हणून रामाला वनवासाला जावे लागले. महाभारत झाले. समाजात अनेक अदृश्य आगलावे शक्ती आहेत त्यांच्या विकृत स्वभावाचा तोल पायरीपायरीने ढासळत असतो. त्यांचा विचित्रपणाचा सबंध मनाच्या जडणघडणीशी जुळवीत बेफाम उधळणाऱ्या श्रीमान आगलावेचा वारू समाजात वावरणाऱ्या किंवा घराघरात घुसू पाहत असेल तर आताच लगाम घालून  आपणही त्यांना जरूर शुभेच्छा द्या. विसरू नका आगलावे आपलेच....!
Add caption

*अशोक भेके*



*मी चर्चेतील माणसं लिहितो हे माझ्या मित्राने वाचले. सहज त्याने मला प्रश्न केला हि माणसं तुझ्या परिचयातील आहेत म्हणून लिहितोस. पण असे एक व्यक्तिमत्व शोध आणि कल्पनेत उतरवून लिहून दाखव. म्हणून मी एक काल्पनिक स्वरूपाचा साधा लेख माझ्या मित्रासाठी लिहिला आहे. आगलावे ही अदृश्य व्यक्तीचा कुणाशीही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीत्या संबंध नाही, याची जरूर नोंद घ्यावी.*

Saturday, October 13, 2018

ज्येष्ठ नागरिक संघटना, घोडपदेव*




उपरोक्त संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन आज अगदी थाटामाटात होत आहे. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन एक चांगल्या उपक्रमाचे रोप लावले , आता वाढीस लागले आहे. लवकरच त्याचा वृक्ष होईल, यात तिळमात्र शंका नाही. *घोडपदेव समूह* अशा ज्येष्ठ मंडळीचा नित्य आदर करीत आली आहे आणि यापुढे देखील करीत राहील. या वरिष्ठांकडे अनुभवाची इतकी दौलत आहे की, काय घेऊ आणि काय नको, असेच वाटते. यांच्या झोळीतून घेतल्याने त्यांचे कमी होत नाही पण त्यातले शाब्दिक सौदर्य आणि विचार श्रीमंतीमुळे आपण देखील वर्तमानातले सुभेदार नक्कीच होत आलो आहोत. आचार विचार हे त्यांच्याकडून घेतल्याने आजची पिढी सुसंस्कारी झालेली दिसेल. आता सर्वांच्या बाबतीत म्हणता येत नाही. पण जे ज्येष्ठांना देवत्व बहाल करतात. त्यांना नक्कीच अनुभव आले असतील. अनुभव स्वीकृती हा एक छंद आहे. तो कसा जोपासायचा... हे ज्याचे त्याच्यावर निर्भर असते. ज्येष्ठांशी स्नेहाची हितगुज म्हणजे ईश्वराला वंदन केल्यामुळे ऐश्वर्य लाभते, असे म्हणतात. परंतु ते सत्य आहे हे मानायला आजची पिढी तितकीशी उत्सुक नसेल.
ज्येष्ठांचे प्रश्न व चिंता या विशिष्ट धोरणात्मक बाबींसाठी निर्माण झालेल्या संघटनेला अद्याप समाजाचे म्हणावे तसे बळ मिळत नाही, हे खेदाने म्हणावे लागेल. महाराष्ट्रात एकूण ४५०० ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत. त्यांच्या डोक्यावर स्थानिक नेत्यांनी दानी पुरुषांनी छप्पर दिले आहे. सांज सकाळ मजेत बसतात. गप्पा मारीत असतात. येथे मात्र तसे घडलेले दिसत नाही. दुर्लक्षित परिस्थितीत सुखाचे व आनंदाचे जीवन देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काही करायला हवेच. आश्वासनाची खैरात ऐकायला मिळेल.पण त्यांच्यासारखे आपण एकदिवस होऊ आणि त्यांच्यात बसायला जाऊ तेव्हा मनाला वेदना होतील. अरेरे यांच्यासाठी आपण केले असते तर......! आंध्र प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली मध्ये या राज्यामध्ये ज्येष्ठांना आदराचे स्थान आहे. तेथे १८०० ते २००० इतकी पेन्शन दिली जाते. पण आपल्या राज्यात केवळ ६०० ते १००० इतकी पेन्शन देऊन तोंडाला पाने पुसली जातात. ज्येष्ठ मंडळीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते. त्यांना आसऱ्याची गरज असते. मंदिराला आधार समजतात. महाराष्ट्रात एकूण परिस्थिती पाहता ५०% पेक्षा अधिक महिला आहेत. वार्धक्यामुळे पती साथ सोडून गेल्यानंतर त्या विधवेचे जीवन जगत असतात. पाठीशी संपत्ती नसते. त्यांना प्रेम हवे असते. माया अपेक्षित असते.
एक गृहस्थ आपल्यात वावरताहेत. त्यांना गुडघेदु:खी मुळे चालता येत नाही. घरातून नाक्यापर्यंत कसेबसे काठी टेकवीत येतात. इलाज करायला पैसे नाहीत. मिळालेले धन त्यांनी आपल्या कुटुंबियासाठी खर्च केले. त्यांना आता ८०० रुपये पेन्शनवर कसंबसं जगायचे आहे. अजून जगायची इच्छा आहे, पण परिस्थतीमुळे रुग्णालयात फेरे मारणे देखील परवडत नाही. संघटना यासाठी जन्माला येते त्यांना अशा घटनाना सामोरे जाता यावे म्हणून... त्यांच्या समस्यावर मात करण्यासाठी, सोयी सुविधा देण्यासाठी घोडपदेव मध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना कार्य करायला अवतरली आहे.
एका ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेत काही दिवसापूर्वी सहज गेलो होतो. बरीच मंडळी बाकावर बसली होती. एक आजीबाई डोळे पुसित काहीतरी शेजारी बसलेल्या बाईंना काहीतरी सांगत होत्या. काय सांगत असतील... रडत का असाव्यात. मी नवखा होतो. पण त्यांची समस्या जाणून घ्यायची तीव्र इच्छा मनाला लागून राहिली होती. एका ज्येष्ठाला विचारले तेव्हा कळले, मुलगा घरदार विकून परदेशात गेला. जाताना त्याने आपल्या जन्मदात्रीला रेल्वेस्टेशनवर सोडून गेला. त्या संस्थेने आजीबाईला आसरा दिला होता. वाईट वाटले. पण त्या आधार देणाऱ्या संस्थेविषयी मनात प्रेम भरून आले. संस्थेत काम करणारी मंडळीमध्ये प्रत्येक क्षेत्रातील घटक होता. आपल्यापरीने ज्येष्ठांच्या समस्या निवारण करीत होते.




*ज्या सभेत वृध्द नसतील ती सभा होऊ शकत नाही. जे धर्म सांगत नाहीत ते वृध्दच नाहीत....* असा वृद्धांचा गौरव महाभारतात वाचायला मिळतो. *घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती...* हा सुविचार भिंतीवर शोभून दिसतो. मुळात चार दिशेला तोंड असलेल्या श्रमजीवी मध्यवर्गीय समाजातील अनुभवाच्या महासागराना एकत्रित आणण्याचे सुयोग्य कार्य घोडपदेव ज्येष्ठ नागरिक संघ यांनी केले आहे. करीत आहेत. सध्या सभासदांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे क्षण साजरे करीत आहे. त्यांना द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आणि पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी हा प्रपंच....!
अशोक भेके

देवांचे दलाल




          मंदिरात जायचे म्हटले की, का कोण जाणे भीती वाटते. ते जागृत देवस्थान म्हटले की अजून मनात भीती निर्माण होते. भीती देवाची नसते, ती असते ती देवपण पांघरलेल्या भटजी पुजाऱ्याची. हे भाविकांचे भटजी नसतातच. ते असतात फक्त त्यांना दक्षिणा देणाऱ्या श्रीमंताचे....! दानपेटीवर त्यांची भलीमोठी थाळी म्हणजे मंदिरापेक्षा त्यांची  जमापुंजी अधिक आढळून येते. मध्यंतरी आम्ही एका सुप्रसिध्द मंदिरात गेलो होतो.पंचवीस एक पुजारी त्या मूर्तीच्या भोवती.... दर्शनाला आलेल्या भक्तांच्या हृदयात त्या देवाची झेरॉक्स छापून घ्यायची ही माफक अपेक्षा. त्या कोंडाळे करून राहिलेल्या पुजाऱ्यांकडून होत असलेला अपेक्षाभंग हा कुणाला सांगायचा म्हणजे माझा अढळ विश्वास असून देखील नास्तिकतेचे फटकारे आपल्यावर ओढवून घ्यायचे.
          देव जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे, हे मान्य असून देखील जेथे दुरावस्था आणि गर्दी असलेल्या मंदिरात चार चार तास रांगेत उभे राहून दर्शनाला जातो तर तेथे उर्मट माणसांचे दर्शन लाभते. दर्शन थाळीत पैसे न टाकणाऱ्या भक्ताला हाकलविणारे तेथील पुजारी किंवा सुरक्षा यंत्रणा जबरदस्त कार्यान्वित असते. भीती हि देवाची नसते तेथील माजोर उर्मट वागणाऱ्या पुजाऱ्याची धडकी भरविणारी असते. उघडे अगडबंब धिप्पाड शरीरयष्टी कमाविलेले हे लोक म्हणजे खरं तर आपले दुकान थाटून बसलेले आहेत. आपली माणसं खरं तर भोळी भाबडी श्रद्धावंत. त्यांच्या भोळेपणाच्या फायदा घेणारे संधिसाधू देखील समाजात वर मान करून फिरत आहेत.
                 गत महिन्यात एका मुलीचा साखरपुडा होता. देवळातल्या भटजीला सांगितले होते. वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती काकुळतीने त्या वरमाईने केली होती. नवरा अकस्मात सोडून गेल्यामुळे ती बिच्चारी आपल्या मुलीच्या विवाहाचे सारे काही पाहत होती. साखरपूड्याला माणसं जमली. भटजीचा पत्ता नव्हता. भटजी आले नाही म्हणून फोनाफोनी सुरु झाली. तेव्हा कळले, भटजीला अधिक दक्षिणा देणाऱ्या श्रीमंतांच्या घरची पूजा करायला गेले होते. अखेर आमच्या एका मित्राने त्याला येत असलेल्या मंत्रविधीनुसार साखरपुडा उरकवून घेतला. देवळाबाहेर बसणारे भिक्षुक परवडले, ते तर थाळीत पडलेले सुखासमाधानाने स्वीकारतात. पण हे देवळातले भटजी आपली कार्यकक्षा ओलांडून कुठल्यातरी श्रीमंताची हुजरेगिरी करतात. तेव्हा मनाला वाईट वाटते. देवानंतर आम्ही यांना देवपण बहाल करतो. तेच आमच्या लोकांशी ब्रम्हराक्षस होऊन  वागतात. मंदिरात फक्त फुल नारळ आणि प्रसाद चढविला जातो का...? अन्य काही गोष्टी बहाल केल्या जातात. त्यांची कुणाला खबरबात देखील नसते. मागच्या वाटेने त्यांना पाय फुटतात. कारण काही मंदिरात  *CCTV*  सारखी यंत्रणा कार्यान्वित नसते. असेल तर त्या कॅमेऱ्याचे तोंड त्या दिशेला नसतेच. या देवळांच्या दलालांचे धंदे कितीतरी आहेत.
                  अकस्मात नवरा गेल्यामुळे विधवा पत्नीला भरणीश्राध्द करणेच भाग आहे. हातावर पोट असलेला नवरा अचानक जाण्यामुळे घरात येणारी कमाई बंद झाली होती.कसं बसं घर चालविणारी ती मंदिरातल्या भटजीकडे आली होती. त्याने तिला ५०० रुपये दक्षिणा सांगितली. तीने त्याला सांगितले इतके पैसे कोठून आणू....! काहीतरी कमी घे बाबा... अगदी काकुळतीने म्हणाली. पण एक छदाम कमी नाही म्हणत तो अड्डेलतट्टू भटजी अडून बसला. शेवटी ती कबूल झाली. काय करणार बिच्चारी....! समाजात राहायचे आहे तिला. उडतउडत ही बातमी माझ्या कानापर्यंत येऊन पोहचली. तेव्हा मी त्या भटजीला समजावून सांगितले. गरीब आहे. थोडंफार सांभाळून घे. मला तो म्हटला देखील नक्की कमी घेणार....! मलाही बरे वाटले, काहीतरी चांगले काम केले की चेहऱ्यावर आनंद झळकतोच.
                   अखेर भरणीश्राध्द करायला गेलेल्या त्या भटजीने मात्र त्याची जात त्या दिवशी दाखविली. खुशाल त्या बाईकडून  ५०० रुपये उकळून मंदिरात परतला. या भटजीला काय म्हणावे.... देवाचे दलाल. त्याला पूर्णच घ्यायचे होते तर मला त्यांनी सांगितले असते तर मी माझ्या खिश्यातले दिले असते. आता तुम्ही म्हणाल मंदिराचे नांव घेऊन लिहायला पाहिजे होते. *मागच्या वेळी एका मंदिराचे नांव लिहिले तर एकाने असा शाप दिला की, तुझे एक महिन्याच्या आत वाटोळे होईल...*  तो निस्वार्थी भक्त होता. स्वच्छ मनाने त्याच्या मनातले बोलला होता. मी जवळ जवळ एक महिना चिंतेत होतो. पण मला देवापेक्षा या मधल्या दलालांची अधिक भीती वाटू लागते. देव तर दूरच असतो पण हे मधले दलाल थेट दर्शन घडून देत नाही. यांच्यामुळे जागृत देवस्थानाचा अर्थ बदलत चालला आहे. मुर्तीतल्या देवाने देखील यांच्या ढोंगी, लुटारूवृत्तीमुळे पळता पाय काढला आहे. आता या दलालापासून सावध राहायला हवे...! मी तर सावध आहेच, पण आपणदेखील राहावे. एक आहे चांगल्याला चांगलेच म्हटले पाहिजे. पण जे वाईट करतात त्यांचं समर्थन काही महाभाग करतात. तेव्हा मात्र डोक्यात तिडीक येऊन जाते.

*अशोक भेके*


Saturday, October 6, 2018

चर्चेतील माणसं : श्री दिलीप वागस्कर




Image may contain: 1 person, closeup

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. पण त्याला हटकण्याची हिमंत कुणामध्ये नव्हती.एक जन हिमंत करून म्हणाला,                     
    'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?'                                                                                                       
         तेव्हा कोळी म्हणाला, 'तुला रे काय करायचे, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मी करणारच.' तात्पर्य म्हणजे काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्‍याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. अनेकजण स्वार्थापोटी नागरिकांचे हाल करीत असतात. तेव्हा त्यांच्या कृत्यांना लगाम घालणारा माणूस लोकांना अपेक्षित असतो. पण तो हिम्मतबाज माणूस कोण असेल तर *श्री दिलीप वागस्कर*  यांचे नावं सहजगत्या समोर येईल. या वर्षी येत्या ७ ऑक्टोबरला   त्यांचा *सुवर्णमहोत्सवी वाढदिवस* असल्यामुळे थोडीफार चर्चा होणारच. चर्चा कोणत्याही गोष्टीवर होते, फक्त निमित्त हवे असते. आतापर्यंत आपण पूर्वजांची थोरवी सांगताना वर्तमानकाळात डोकावण्यासाठी मेंदू तडफडत होता. चर्चेतील माणसं लिहिताना हे भरून निघाले.
*सौ. वत्सलाबाई आणि श्री. रघुनाथ वागस्कर* या कष्टकरी कुटुंबियांत, मुंबई राणीबाग येथील वाणी चाळ  येथे जन्माला आलेले *श्री. दिलीप वागस्कर* यांच्याविषयी थोडेसे रेखाटन करताना एका मध्यमवर्गीय माणसाची अकारण स्तुती करीत नाही पण जे चांगले आहे त्याचे कौतुक करायलाच हवे. भायखळा बाजारात व्यवसाय करीत कृतार्थ आणि कष्टमय जीवन जगत सारे काही आलबेल असताना नियतीने पदरात टाकलेले दु:ख म्हणजे पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे सदैव नम्र असलेल्या पत्नी *नम्रताचे* अचानक सोडून जाणे, कल्पना करता येणार नाही. एक करुण, हळवी किनार, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्कीच ओले करते. आतवर कुठेतरी हेलावून टाकते. पण आपल्या चिल्यापिल्या कडे पाहत नव्या उमेदीने समाजात उभे राहिले. सौम्य प्रकृतीचा सडपातळ माणूस. गळ्यात विविध प्रकारच्या सोनसाखळया ही त्यांची ओळख पुरेशी आहे.
एक काठी असेल आणि कोणत्याही आधाराविना ती उभी करायची असेल तर ती उभी राहणार नाही. दोन काठ्या उभ्या राहणार नाहीत. पण तीन तिकाटने उभे केले तर त्या काठ्यांना एकत्रितपणाचे बळ प्राप्त होईल, हे श्री वागस्कर यांनी हेरले आणि सर्वाना बरोबर घेऊन हुतात्मा बाबु गेनू नगरात अस्ताव्यस्त पडलेल्या अडचणीची एकत्रित मोळी बांधून सोडविण्याचे काम करीत आहेत. अंधार होता तेथे प्रकाशमान दिवे आले. शौचालय पडझड झाली होती तेथे दुरुस्ती झाली. शौचालयाला जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV बसविण्यात आले. २१ कुटुंबियांना दरमहा पुरेल इतके अन्नधान्य वाटप. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्याच्या घरात पितळी समई वाटप. विद्यार्थी गुणगौरव, गेली आठ दहा महिने झाले. विविध लोकोपयोगी उपक्रम पाहतो आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक दिवशीय सहल. शैक्षणिक, क्रिडा क्षेत्राशी निगडीत अनेक स्तुतीजन्य कार्यक्रम.. हा माणूस नुसता झपाटलेला आहे. सतत काम करीत असल्यामुळे सध्या चर्चेत आहे. सध्या चर्चेत असलेले व्यक्तिमत्व. अनेक कारणांनी हे नावं सध्या चर्चेत आहे. पुनर्विकास रखडलेल्या हुतात्मा बाबू गेनू नगर परिसरातील  रहिवाशी बांधवांनी चांगली गोष्ट साध्य करण्यासाठी तप केले असावे म्हणून त्यातून जे फळ मिळाले ते *श्री. दिलीप वागस्कर* यांच्या रूपातून दिसत आहे. ते करीत असलेल्या कार्याने आजतरी अनेक कुटुंब त्यांना दुआ देत आहेत. *घोडपदेव समुह* अशा मनी दानत असलेल्या माणसाची कृतज्ञता व्यक्त करीत आहे.


*अशोक भेके*


*आठवणीतील माणसं : नारायण आलेपाकवाला*



Image may contain: text


परवा एका मुलाने वीस रुपये कमविले त्याने इतक्या ऐटीत सांगितले की, त्याने वीस लाखाची कमाई केली. आश्चर्य वाटले. आम्ही लहान असताना ५ पैश्यासाठी किती किती कामे केली हे मनात आले तरी डोळ्याच्या किनारी ओलसर होते. लहानपण गेले पण त्या लहानपणातल्या आठवणींची शिदोरी अनपेक्षितपणे कधी उघडली जाईल, सांगता येत नाही. १९७० ते ८० दशकात चाळीचाळीतून एक माणूस आलेपाक विकायला यायचा. सुमधुर आवाजात सातमजली साद घालायचा, तसे घराघरातून मुले बाहेर यायची अन म्हणायची नारायण आलेपाकवाला आला. खूप बोलका माणूस. मला ही खूप बोलणारी माणसं फार आवडतात. निर्मळ मनाची असतात. कुणाचं वाईट करायचं त्यांच्या मनाला शिवत नाही. हा माणूस त्यातला एक. शर्ट लेंगा घालून त्या साखरेच्या आणि गुळाच्या आलेपाक वड्या विकून पोटं भरायचा.  आलेपाक म्हणजे गुळ कमी अन किसलेले आले अधिक... कडक, तिखट, झणझणीत.साखरेचे होते ते गोड लागायचे. वास्तविक डोक्यात थैमान घातलेला माणूस. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणून धंदा करीत होता. कशासाठी, पोटासाठी....!
कोण होता नारायण... कोठून येत होता, कोठे राहत होता, हे ठाऊक नाही. पण धंद्याच्या लायक माणूस. वाचाळ माणूस आमच्या चाळ नावाच्या वाचाळ वस्तीत यायचा. तो काळ तसा चांगला नव्हता. पण नारायण पोटासाठी हातावर तो डबा खांद्यापर्यंत नेत असे. त्याकाळात त्याचे अप्रूप वाटले नाही. पण आम्ही मोठे झालो तेव्हा त्या कष्टकरी माणसाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत असे. मुलायम आवाजाचा साधा माणूस गाणं गात गात धंदा करायचा. त्याचा आलेपाक खाल्ला तर सर्दी खोकला झटपट मोकळा होत असे. त्याचा आलेपाक खाल्याने अमिताभ बच्चन सुपरस्टार झाल्याचे तो सांगत असे तर सुनील गावस्करचे शतक झळकले की, त्याने ऐटीत सांगितलेच पाहिजे. शून्यावर आउट झालेला खेळाडूला त्याने किती वेळा सांगितले आलेपाक खा.. आलेपाक खा पण त्याने खाल्ले नाही म्हणून तो शून्यावर आऊट झाला. किती अभिमानाने सांगायचा. एखाद्या डॉक्टरांच्या हाताला गुण नसेल पण नारायणाच्या आलेपाक खाल्याने सर्दीखोकला मुक्त होतो, हा भारी समज नारायणच्या मधाळ बोलण्यामुळे झाला होता. त्याचं बोलणं जणू तुपात तळलेलं असायचे.
नारायण म्हणजे आम्हांला विदुषक वाटायचा. आनंद देणाऱ्या खूप गोष्टी आहेत या जगात.एखाद्याचे अश्रू पुसताना देखील आनंद मिळतो. चिमुकल्या बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून देखील मन आनंदी होते. नारायण म्हणजे आनंदून टाकणारा, चैतन्याची कारंजी फुलविणारा सदाबहार माणूस. गंभीरपणे जीवनाकडे पाहताना मुलांना पोटं धरीसपर्यंत हसवायचा. त्यांच्याशी खेळायचा. गप्पा मारायचा. भुरळ पाडायचा.अगदी आपला.. आपल्या घरातला.. आपल्या रक्तमांसाचा माणुस. आम्ही स्विकारलेले नाते होते. ज्या संगतीत वाढतो, मोठे होतो.त्यांचे संस्कार आपल्या बालमनावर होत असतात. चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा अशी जाणकार मंडळी सांगतात. पण नारायणाबरोबर घालविलेला तो वेळ देखील आमच्या आरोग्याला लाभदायक असायचा, हि प्रांजळपणे कबुली द्यावीशी वाटते.
आज नारायण काय करतो ठाऊक नाही. पण लहानपणी एकदा  शिरोडकर हायस्कूल मध्ये आपल्या आवडत्या माणसाविषयी निबंध लिहायला सांगितला होता. एका चिमुरड्या  मुलीने त्याच्यावर छानसा निबंध लिहिला होता. तो निबंध सर्व शाळेतील मुलांना वाचायला मिळाला. उदंड लोकप्रियता कमावलेला एक फेरीवाला आबालवृद्धांच्या मनात घर करून राहिलेला नारायण आलेपाकवाला. सहज सुचलं अन मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली आठवणीतील शिदोरी  पावसाची रीपरीप व्हावी तसे लेखणीतून  झरझर उतरली.
*घोडपदेव समूह अशा कष्टकरी माणसांची देखील कदर करीत आहे.*


*अशोक भेके*

Saturday, September 22, 2018

आठवणीतील माणसं : मधु शेट्ये . . . . . .

YOUTUBE





जूनी माणसं किती गोड, अन चिवट असत. यावरून मला आज प्रकर्षाने मधु शेट्ये यांची खूप खूप आठवण येऊ लागली. हा माणूसच तसा होता. आम्हाला सोडुन गेले असले तरी प्रत्यक्षात मात्र आजही आमच्या सोबत आहेत असेच वाटते.कुठून तरी आपली कापडी पिशवी हलवित हलवित येईल असं राहून राहून वाटतं. 
पण मधु शेट्ये म्हटले तरी डोळ्यात टचकन अश्रू दाटून येतात. साचणार्या आसवांना वाट मोकळी करावी यासाठी आठवणीतील माणसं कै. मधु शेट्ये यांच्यासाठी दोन शब्द........

मधु शेट्ये म्हणजे वरिष्ठ असले तरी मात्र मी मोठा आणि तु छोटा हा भेदभाव कधीही जोपासला नाही. त्यांच्या हसण्यात आत्मियता, विश्वास आणि दिलासा दिसे त्यामुळे समोरचा माणूस त्यांच्या साध्या हसण्याने तृप्त होत असे. आपण लहाण होऊन समोरच्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारा त्यांचा स्वभाव. लहान मुलांबरोबर कॅरम खेळताना कोणी चिटींग केली तर लहान मुलांप्रमाणे भांडण करणारी बाल्यावस्था जोपासली होती. आम्ही भुवईची भाषा यांजकडून शिकलो. गोपनिय मसले ते नेहमी भुवईनी बोलायचे आम्ही तर डोळ्यांनी प्रतिसाद देत होतो. 
वाटले नव्हते इतक्या लवकर ते मार्गस्थ होतील.मृत्युशय्येवर चिवट झुंज देत देत साखरेपेक्षा गोड असणार्या या सुस्वभावी माणसाने एक दिवस कोरड्या ठाक वाटणार्या बटबटीत डोळ्यात उतरून आलेला ओलावा निरोप घेत घेत एका वळणावरती थांबला. अखेरचा तो दिवस ....... मुंबई पोर्ट ट्रस्ट रूग्णालयात मी त्यांच्याजवळ उभा होतो. शेवटचे ते काही क्षण ....... त्यांच्या पायातील भळभळणार्या जखमांना औषधाने धुत्कारले होते. कुटुंब औदासिन सावटाखाली खिन्न होऊन मृत्युंजय मंत्र जपत बाहेर बसले होते. 

इकडे शरीर हळूहळू शिथिल होत चालले होते. अगदी चेतनाहीन..... डोळ्यांत हालचाल मंदावलेली असली तरी माझ्याकडे एकटक पाहत होते . डोळे बोलत नसले तरी भुवया काही तरी सांगत होत्या माझं मलाच गहिवरून आले. कितीतरी सखे सोबती सोडून गेले पण अश्रूनी कधी डोळे पाणावलेले नव्हते पण या निपचित पडलेल्या मधु शेट्येंनी माझ्यातल्या गंगा यमुनांना पूर आणला होता. त्याक्षणी त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याऐवजी मलाच सावरण्याचा प्रयत्न झाला. असे आपले मधु शेट्ये............



अशोक भेके 

राणीबाग प्रश्नावर आंदोलन करण्याची गरज....!



बरेच दिवस मी स्थानिक लोकसमस्येवर लिहायचे टाळत होतो. मतभेद होत होते ते म्हणजे आधणातले रडायचे अन सुपातले हसायचे....! शेवटी मीच माझ्या मनाला आवर घातला. पण आज राणीबाग या प्रश्नावर अनेक मंडळीनी माझे डोके भंडावून सोडल्यामुळे आज या  विषयावर लिहायला घेतले.
१.   महापालिका प्रशासनाने पर्यटकांवर प्रवेशमूल्य वाढविले आणि कमी केले.
२.   प्रभातफेरी साठी प्रवेश मूल्य पाचपटीने म्हणजे मासिक १५० रुपये वाढविले. ( पर्यटकांचे कमी केले पण प्रभातफेरी नागरिकांना दिलासा का नाही...! )
३.   प्रभातफेरीसाठी आठवड्यातून बुधवार या दिवशी राणीबाग बंद ठेवण्यात आला.( बुधवारी बाग परिसरात वाहनाची येजा चालते का..! )
४.   शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा मार्ग रोखला गेला. ( भायखळा येथे जाणारे येणारे शालेय विद्यार्थी यांचा मार्ग रोखून प्रशासनाने काय मिळविले)

असे अनेक विषय घडत गेले पण आम्ही मुग गिळून गप्प बसलो. मुळात घोडपदेव समूहाने राणीबाग या विषयावर अनेकदा लिहिल्यानंतर त्यामध्ये सुधारणांचे पाऊल उमटले गेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह बंदिस्त अवस्थेत उभारण्याचे काम सुरु आहे. आज महापलिका प्रशासनाने उत्तरेकडील छोटासा दरवाजा आजपासून बंद करण्यात केला.
कुणी सांगितले....?
वरून ऑर्डर आहे ...! हे उत्तर मिळाले
असा कोण वर आहे...! तो आमच्या घोडपदेव नारळवाडी फेरबंदर भागातील नागरिकांच्या मुळावर उठला आहे. प्रभातफेरी साठी अनेक मान्यवर या बागेत उपस्थित असतात. अनेक वृध्द माय बाप मंडळी  कसरत करीत असतात. विविध वनस्पती आहेत त्या मोकळ्या वातावरणात  शुध्द हवेचा लाभ घेतात. कसं ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे या बागेत अर्धांगवायू आणि मधुमेहाचे आणि vertigo याचे रुग्ण येतात. डॉक्टरांचा सल्ला त्यांनी मोकळ्या वातावरणात चालावे. जितके चालाल तितके बरे वाटेल म्हणून वेड्यासारखी आशा सुटेना, अन देव भेटेना म्हणून आपले आयुष्य वाढविण्यासाठी चालतात. चालताना धडपडतात,पडतात. आज त्यांना हा बंद दरवाजा सांगतोय ‘तुमचे अच्छे दिन सुरु झाले आहेत...!’ पश्चिमेच्या मुख्य प्रवेशद्वारातून फक्त प्रवेश मिळेल. कोण घडवून आणत आहे हे सारे....! आमच्या नागरिकांना त्रास देऊन काय मिळत आहे, समजत नाही. कोण अधिकारी आहे....त्याने खुंट्याची सोडून झाडाला बांधली आहे. वरून सोज्वळ असतील पण आतल्या सावळ्या गोंधळाची कल्पना आम्हाला देखील आहे.
   हा बंद दरवाजा आमच्या विभागीय नागरिकांना कायम सुरु राहिलाच पाहिजे.... तसेच  बंद बुधवार हा पर्यटकांसाठी ठीक आहे पण प्रभातफेरी नागरिकांसाठी नको. हे लक्षात घ्यायला हवे अन्यथा......स्थानिक नागरिकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका.


अशोक भेके
घोडपदेव समूह


आठवणीतील माणसं : अशोक बाजीराव चोरगे






२२ नोव्हेंबर १९८०.... संध्याकाळचे सहा वाजले होते... तितक्यात हृदय पिळवटून काढणारी घटना कानावर येऊन आदळली अन ज्वालामुखीचा स्फोट होत आहे, असेच जाणवू लागले. ओठ थरथरत होते. मेंदू सुन्न झाला होता. काही कळत नव्हते. दादर स्थानकात *अशोक चोरगे* उतरत असताना त्या गर्दीत श्वास कोंडल्याने त्याचा अंत झाला. हि घटना ऐकली अन पायाखालची जमीन हादरली. धरणीकंप झाल्यासारखे वाटले. 
आमच्यातला एक मनमिळाऊ स्वभावाचा....
देवाच्या बागेतील कळ्या म्हणजे लहान मुलांवर प्रेम करणारा, त्यांना फुलविणारा....
मुलांच्या ओसाड मनोभूमीवर सहृदय मेघांचा वर्षाव करणारा...
*आमचा मित्र अशोक चोरगे*
त्याची मैत्री म्हणजे सृजनशील विचारांची, सधन संस्काराची साक्ष देणारी होती. समाजसेवक नव्हता कि राजकारणी नव्हता. अशोक चोरगे म्हणजे खरा हिरा होता. नियतीने त्याच्यावर घाला घातला होता. अवघे वयाची पंचविशी पूर्ण करण्याआधीच जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला.... यापुढे काय म्हणावे. हि घटना घडल्यानंतर चोरगे कुटुंबीय अनेक वर्षे सावरू शकले नाही.
मुंबई घोडपदेव मधल्या कांचवाला चाळीतील ते छोटेसे घर, मोजून फक्त ८० चौ. फुट. त्या घरात संसार थाटलेल्या *सौ आणि श्री बाजीराव चोरगे* यांना दिनांक १५ नोव्हेंबर १९५६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंदीआनंद झाला. जे कर्म चांगले करतात त्यांना फळ मिळते ते या बाळाच्या रूपातून चोरगे कुटुंबियांना मिळाले होते. प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेज शिक्षण येथेच पूर्ण झाले. शालांत परीक्षेत त्यावेळी ६४% गुण मिळवून विभागात प्रथम आला होता कॉटनग्रीन त्या दिव्याखाली अभ्यास करून Bsc Chemistry मध्ये first class ने उत्तीर्ण झाले, त्यावेळेस विभागात काही ठराविकच पदवीधर झालेले होते. पदवीधर झाल्यानंतर अनेक कंपन्यांची चालून नोकरीसाठी निमंत्रणे आली. मुंबई महानगरपालिकेत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले होते. चोरगे कुटुंबियांच्या नशिबात असं काय मांडून ठेवले होते कि सुख पाहता लोचनी....पण नियतीला हे मान्य नव्हते..!
एक किस्सा सांगायचा म्हणजे तेव्हा अकरावी म्हणजे SSC होती. एक समाजसेवक सतत या परीक्षेला बसत पण नापास होत असत. त्यांच्या पास होण्याने त्यांना अत्यंत लाभ होणार होता. तेव्हा त्यांनी माझ्या मित्राला गळ घातली. पण ती मागणी झिडकारली. समाजसेवक देखील येता-जाता मारक्या म्हशीसारखा त्याच्याकडे बघत असे. पण प्रामाणिक माणसाला कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसणाऱ्या आमच्या मित्राला भीती नव्हती.
अंगकांती निमगोरी, अतिउंचही नाही आणि अल्पउंची नाही अत्यंत प्रमाणबध्द शरीर. केस काळे आणि मागे फिरविलेले, सरळ नाक तेही बाकदार, ओठ लाल आणि पातळ, पेहराव म्हणजे साधी विजार आणि शर्ट... सतत हसतमुख चेहरा खळाळून हसताना उमटणारी भावमुद्रा म्हणजेच विनम्र भावमुद्रा.. जणू देवाने कलेचा नमुना निर्माण केला असल्याचे वाटत असे. संवादाला कधीच नकार न देणार्यात आणि संवादातून कायमच समाजहितकारक बुद्धिवादी भूमिका पटवून देण्याची असामान्य क्षमता बाळगणार्या‍ मित्राचे अकस्मात जाणे. खरोखर दुर्दैवी होते. आजही आठवणीचे मनोरे उभे केले तर सर्वप्रथम या मित्राला स्थान मिळते. हिऱ्याला घणाच्या घावाने इजा होत नाही. आज अशोक आपल्यात नसला तरी त्याचे मोल आजही आमच्या मनामनात घर करून आहे. 


अशोक भेके

Sunday, September 16, 2018

कार्यकर्ता येणार का आपल्या घरी.....?


मी नेहमी अनेक विषयावर लिहितो, तेव्हा कायम टीकात्मक लिहितो असा काहींचा आक्षेप आहे. कोणी म्हणतं मला नकारात्मक दिसतं. पण माझे प्रांजळ मत सांगतो,लिहिताना मी कुणा एकाला लक्ष्य करत नाही. सुचलं की लिहितो. सोशल मिडियावर म्हणजे फेसबुक अथवा व्हाटसअप वर काही दिवसापूर्वी घरघंटी आणि शिलाई मशीन स्वयंरोजगारासाठी महिलांसाठी शासकीय अथवा पालिकेच्या विविध योजनांच्या जाहिराती पोस्ट केल्या, अन आपल्या जबाबदारीचा गाशा गुंडाळला. आपल्या विभागात किती लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतात याचा कोणी ठाव घेत नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी केवळ एक गरजू महिलेला या योजनांचे लाभार्थी बनविले तर किती संसार फुलतील. किती आशिर्वाद, शुभार्शिवाद तुमच्या पाठीशी मिळतील याची मोजदाद करता येणार नाही. त्यांनी अर्ज आणायचे त्यांनीच भरायचे त्यांनीच सारे काही करायचे. दिखावा आपण का करायचा ...! न्यायालयाने फटकारले अन फ्लेक्स जवळ जवळ बंद झाले आणि ते खर्चिक ही होते. त्यामुळे कार्यकर्ता सोशल मिडिया सारख्या प्रभावशाली प्रसारमाध्यमांचा आसरा घेऊ लागला. मला याबाबत इतकेच म्हणायचे आहे की, आपल्या पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहचायला हव्यात. ज्यांना खरोखर गरज आहे त्या गरजवंत मोबाईल वापरत असतील का....! जर वापरत असतील तर सोशल मिडिया सारखं साधन त्यांच्याकडे उपलब्ध असेल का ....! यासाठी कार्यकर्ता हा गोरगरीबांच्या घरी गेला पाहिजे किंवा वस्ती, विभागामध्ये एखादे टेबल टाकून ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले तर या योजना घरादारापर्यंत पोहचतील.त्यामुळे कार्यकर्ता घरोघरी जाईल लोकांशी सुसंवाद वाढेल.
विभागपातळीवर किती निराधार मंडळी आहेत. त्यातले संजय गांधी निराधार योजना मध्ये किती लाभार्थी आहेत. कुणाला दोष देणे गैर आहे, पण माणसं आपल्याकडे येत नाहीत तर आपण माणसाकडे जावे अन त्यांना प्रोत्साहित करावे.समाजाची सेवा करताना अहंमपणा सोडायला हवा. हल्ली किती तरी आपल्या माय भगिनी पोळी भाजीचा व्यवसायात मन रमवू लागल्यात.कोणी कारखान्यातून घरी कामे आणतात आणि उदरनिर्वाह करतात. भाजीचा धंदा करतात. काल एका घरात जाने झाले. त्या छोट्याश्या घरात बरीचशी मंडळी राहत होती पुरुष एकच पण महिला अधिक, त्या घरात एक वृध्दा अंथरुणाला खिळून आहे.आजाराने कृश झालेली पाहिली जेमतेम तिचे वजन केले तर दहा किलोही भरणार नाही.किलकिल्या डोळ्यांनी पांघरूनातून पाहत होती. मनाला वेदना झाल्या. त्यांना गरज आहे आपल्या मदतीची.
मध्यंतरीच्या काळात कोणत्या तरी निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीसाठी काही कार्यकर्ते घरोघर फिरत असताना दिसले. बरं वाटले मनाला. कार्यकर्ते पक्षासाठी काम करणारे पाहतो पण तेच जर गरजवंताना हवा असलेला कार्यकर्ता अपेक्षित आहे. ‘ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के’ असं म्हणताना समाजाची दशा आणि दिशा ठरविताना सर्व सामान्यांना अपेक्षित असलेला कार्यकर्ता हवा आहे. आपण एखादी योजना सांगायची अन ती लोकांपर्यंत पोहचत नसेल तर त्याला काय अर्थ आहे का...! घरादारात ज्याला कार्यकर्ता म्हटले जाईल तो कार्यकर्ता. हल्ली व्यावसायिक आणि दिखावा करणारा कार्यकर्ता अधिक प्रमाणात दिसून येतो. सतरंज्या अंथरल्यानंतर आणि व्यासपीठावर माईक खुर्च्या ठेवल्यानंतर ऐटीत स्थानापन्न होणारे, फर्डा भाषण देणारे, भाषण करताना फोटोग्राफर कडे हळूच तिरकस नजरेने पाहणारे अन काय भारी पोझ देत टाळ्या मागणारे कार्यकर्ते दिसतात. अशा या कार्यकर्त्यांच्या वृती अन गुणांना सलामच नव्हे तर साष्टांग दंड्वंत घालायला हवा. कार्यकर्त्याचे कार्य अंधारात प्रकाश तेवत ठेवणाऱ्या पणती प्रमाणे हवे. निराश मनोवृत्तीचा कार्यकर्ता नको. जनमानसाने कार्यकर्ता कसा असावा कोणी विचारले तर अमुक अमुक माणसासारखा असावा किंवा या पक्षातील कार्यकर्त्यासारखा असावा. असं म्हटले गेले तर आपण अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाहीत. 


अशोक भेके

लोकप्रतिनिधी असे ही ..........!



             


     मागच्या आठवड्यात  ‘दैनिक  शिवनेर  मध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते . मुंबईतील वरळी भागातील सेनेचे आमदार  सुनील शिंदे यांनी मुंबई सारख्या शहरी भागात आपल्या स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा करीत कॉलेज समंत करून घेतेले. यानंतर छानश्या प्रतिक्रिया उमटल्या.  विशेष अभ्यासक्रम यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना विभागाबाहेर आधार घ्यावा लागत असे. प्रवेशप्रक्रियेसाठी  आमदारांना धावणे आलेच. पण धडपड करून त्यांनी त्यांच्या विभागासाठी आणलेली कौतुकाची वेल समृध्द केल्याशिवाय राहणार नाही. लोकप्रतिनिधी असा असावाहे मी तरी कौतुकाने म्हणेन. ग्रामीण आणि शहरातील शिक्षण सम्राटानी मांडलेल्या शैक्षणिक बाजाराला किंचितसा लगाम….!                     
सध्या सर्वच स्तरातून सोशल मिडीयावर गणपत ( आबा) देशमुखांच्या बाबत फार कौतुकास्पद लिहिले जात आहे. अलौकीक व्यक्तीमत्व .... लोकप्रतिनिधी  कसा असावा यांचे उदाहरण. पैसा खर्च न  करता निवडणुकीत दणदणीत मताधिक्याने भला माणूस १२ वेळा विधिमंडळात निवडून आला. सलग ९ वेळा म्हणजे एकूण ४५ वर्षे नगरसेवक पद भूषविलेल्या वरळीच्या मणिशंकर कवठे विषयी आजही समस्तांच्या मनात अभिमान जागृत होतो. डोंगराएवढं काम करून या माणसांनी मी केलं. कधी म्हटले  नाही.  पूर्वी लोकप्रतिनिधी ज्येष्ठअनुभवीआणि साधारणत: नागरिकांच्या सुखदु:खाशी एकरूप आणि समरस होत असत. त्यांचेही समाजकारण आणि संस्थात्मक राजकारणात लक्ष असे. मंडळाचा अध्यक्ष सचिवही  कोण असावा याचा बारीकसारीक विचार करीत असत. कारण संस्था कारभारात स्वच्छ व  पारदर्शकता हवी आणि त्यासाठी त्या संस्थेवर आस्था असणारी माणसे असायला हवी. हे धोरण मनात असे. आपली नेमकी कर्त्यव्ये काय आणि नागरिकांना आपल्याकडून काय अपेक्षी आहेयाची जाण होती. गावपातळीवर अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत कीप्रचार न  करता निवडून येतात. मतदार प्रचार करून तन मन धन अर्पून निवडून आणतात. त्यांच्या योगदानाचीत्यांच्या कार्याची  पोचपावती मतदार स्वखुषीने बहाल करतात.  बॅ. नाथ पैमधु दंडवतेरामभाऊ म्हाळगीबापूसाहेब काळदातेमृणालताईसुधीरभाऊ जोशीहेमचंद्रगुप्तेप्रमोद नवलकरबी. डी. झुटे,केशवराव धोंडगेअहिल्याताईयांच्यासारखे सज्जनचारित्र्यवानप्रामाणिक लोकप्रतिनिधी  अव्वल दर्जाचे संसदपटू वर्तमानकाळात दिसत नाहीत.
               आजचे लोकप्रतिनिधी असं का करीत नाहीत. ठळक दिसणारे काम त्यांच्याकडून का होत नाहीत. केवळ घरगल्ल्या दुरुस्तीरस्ते डांबरीकरणकुठेतरी रस्तोरस्ती शेड बांधायच्या अन वाचनालयाचे स्वरूप द्यायचे. ही कामे म्हणजे भविष्यात कोणी नांव काढणार नाही. आपल्या एका कामाने हीच पिढी काय भविष्यातील पिढीने देखील नांव काढले पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना काय हवं काय नको...! असे विषय विचारात घेणे अगत्याचे आहे. एक लोकप्रतिनिधी त्याच्या मतदारसंघात काय  करू शकतो. त्याच्या मनाला हवं तसं चित्र बदलू शकतो. आपल्या विभागात शुभ मंगल कार्यालय याची गरज आहे का ...मेरी मर्जीनुसार हवं तसं लुटणाऱ्या मंगलकार्यालयाविषयी काय प्रतिपादन करायचे. भटजीपासून आचारी आणि तत्सम विविध गरजा लक्षात ठेऊन चालविलेल्या एकाधिकारशाहीविषयी.... हॉल पाहिजे असतो सोबत ते सांगतील त्या दरानुसार आपण आपली गरज म्हणून बोकांडी बसून घेतो. माझ्या विभागात तीन जमाती नवीन आल्या. मंदिरसमाजमंदिरहॉल  निर्माण झाले. आम्ही मात्र कोरड्या पाषाणाप्रमाणे  पाहत राहिलो. आज मुंबईत प्रत्येक विभागात कॉलेज दिले तरी कमीच आहे. आज मुंबईतील मुले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षण घेत आहेत.माजोर शिक्षण सम्राट मंडळीना दणका देण्यासाठी स्थानिक विभागवार कॉलेज निर्मिती केली तर किती खर्च वाचेल याचा अंदाज कोणी घेतला आहे का....महापालिका शाळा ओस पडत चालल्या आहेत. शालेय वास्तूत हॉल निर्मिती करता येऊ शकते. पालिकेचा महसूल वाढू शकतो. विचार करायला काय हरकत आहे.
                        निवडणुकीच्या काळात आपल्या पाठीराख्यांसमवेत सातत्याने दिसणारे आणि निवडून आल्यानंतर वर्तमानपत्रातील बातम्या,कार्य अहवालदिनदर्शिका प्रकाशनदिवाळीत उटणे वाटपया सारख्या तत्सम कार्यक्रमापुरते राबणारेधडपडणारे लोकप्रतिनिधी अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. एका विभागात एका लोकप्रतिनिधीने हेर मंडळ नेमले आहे. कोणी बांधकाम सुरु केले कीसाहेबांच्या कानावर बित्त बातमी पोहचवायची. साहेब संबधितांना सांगून नोटीस काढीत. शेवटी नागरिक साहेबांकडे विभागीय कार्यकर्त्याला हाताशी धरून जात असे. मधल्यामध्येच खिचडी तयार होई अन बांधकाम तोंडी परवाना बहाल केला जात असे राजकीय उत्कर्ष आणि दबदबा निर्माण करण्यासाठी विभागवार असं  केले  जाणारच. यामागची कारणे म्हणजे आजची पिढी. त्यांना विभागाचा विकास नको असतो. त्यांना केवळ साहेबांकडून डोनेशन हवं असतं. गोविंदा असो वा गणपतीनवरात्र असो वा दिवाळी साहेबांनी या वेळेस काही तरी चांगलं दिले पाहिजे. साहेबाना देखील हेच हवं असतं. लोकप्रतिनिधींचा तरुण वर्गाला
आकर्षित करण्याचा एकमेव धंदा,
कामं करण्याऐवजी वाटा चंदा...!
हे पण तात्पुरत्या काळापुरते मर्यादित असते. निवडणुकीत अधिक  माया देणाऱ्या उमेदवाराची तळी उचलतात. तो निवडून येवो अगर न  येवो. मतदारसंघाचा विकास येथेच खुंटतो. निवडणुकीत वारेमाप पैश्यांची झालेली उधळण भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आपली काही वर्षे खर्च घालतो अन तो पर्यंत मुदत संपलेली असते.
                        पण आताचे लोकप्रतिनिधी वेगळेच. काही  लोकप्रतिनिधींचा  बडेजावत्यांचं वैभव आठवलं. हा नेता  म्हणजे हाताच्या किमान आठ बोटात अंगठ्यामनगटावर जाडसर ब्रेसलेट,आणि गळ्यात दोरखंडासारखी चैनडोळ्याला ली भारी दिसणारा गॉगलदिमतीला सफारी किंवा स्कार्पियो हा त्याचा  ट्रेडमार्कच . सोबत भाई आणि भाऊ म्हणजे सुरक्षिततेचे कवच घेऊण जनमनावर प्रभावी दर्शन घडविणाऱ्या लोकप्रतिनिधी यांचे आजचे रूप किंव करण्याजोगे आहे.
                        आजच्या लोकप्रतिनिधी कडून फार काही नाही पण त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख भविष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जावो. हे अगदी मनापासून वाटते हे मलाच वाटत नाही तर समस्त लोकशाहीनुसार विश्वासाने आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारराजाला वाटत आहे.

अशोक भेके