Saturday, September 22, 2018

आठवणीतील माणसं : अशोक बाजीराव चोरगे






२२ नोव्हेंबर १९८०.... संध्याकाळचे सहा वाजले होते... तितक्यात हृदय पिळवटून काढणारी घटना कानावर येऊन आदळली अन ज्वालामुखीचा स्फोट होत आहे, असेच जाणवू लागले. ओठ थरथरत होते. मेंदू सुन्न झाला होता. काही कळत नव्हते. दादर स्थानकात *अशोक चोरगे* उतरत असताना त्या गर्दीत श्वास कोंडल्याने त्याचा अंत झाला. हि घटना ऐकली अन पायाखालची जमीन हादरली. धरणीकंप झाल्यासारखे वाटले. 
आमच्यातला एक मनमिळाऊ स्वभावाचा....
देवाच्या बागेतील कळ्या म्हणजे लहान मुलांवर प्रेम करणारा, त्यांना फुलविणारा....
मुलांच्या ओसाड मनोभूमीवर सहृदय मेघांचा वर्षाव करणारा...
*आमचा मित्र अशोक चोरगे*
त्याची मैत्री म्हणजे सृजनशील विचारांची, सधन संस्काराची साक्ष देणारी होती. समाजसेवक नव्हता कि राजकारणी नव्हता. अशोक चोरगे म्हणजे खरा हिरा होता. नियतीने त्याच्यावर घाला घातला होता. अवघे वयाची पंचविशी पूर्ण करण्याआधीच जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला.... यापुढे काय म्हणावे. हि घटना घडल्यानंतर चोरगे कुटुंबीय अनेक वर्षे सावरू शकले नाही.
मुंबई घोडपदेव मधल्या कांचवाला चाळीतील ते छोटेसे घर, मोजून फक्त ८० चौ. फुट. त्या घरात संसार थाटलेल्या *सौ आणि श्री बाजीराव चोरगे* यांना दिनांक १५ नोव्हेंबर १९५६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंदीआनंद झाला. जे कर्म चांगले करतात त्यांना फळ मिळते ते या बाळाच्या रूपातून चोरगे कुटुंबियांना मिळाले होते. प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेज शिक्षण येथेच पूर्ण झाले. शालांत परीक्षेत त्यावेळी ६४% गुण मिळवून विभागात प्रथम आला होता कॉटनग्रीन त्या दिव्याखाली अभ्यास करून Bsc Chemistry मध्ये first class ने उत्तीर्ण झाले, त्यावेळेस विभागात काही ठराविकच पदवीधर झालेले होते. पदवीधर झाल्यानंतर अनेक कंपन्यांची चालून नोकरीसाठी निमंत्रणे आली. मुंबई महानगरपालिकेत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले होते. चोरगे कुटुंबियांच्या नशिबात असं काय मांडून ठेवले होते कि सुख पाहता लोचनी....पण नियतीला हे मान्य नव्हते..!
एक किस्सा सांगायचा म्हणजे तेव्हा अकरावी म्हणजे SSC होती. एक समाजसेवक सतत या परीक्षेला बसत पण नापास होत असत. त्यांच्या पास होण्याने त्यांना अत्यंत लाभ होणार होता. तेव्हा त्यांनी माझ्या मित्राला गळ घातली. पण ती मागणी झिडकारली. समाजसेवक देखील येता-जाता मारक्या म्हशीसारखा त्याच्याकडे बघत असे. पण प्रामाणिक माणसाला कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसणाऱ्या आमच्या मित्राला भीती नव्हती.
अंगकांती निमगोरी, अतिउंचही नाही आणि अल्पउंची नाही अत्यंत प्रमाणबध्द शरीर. केस काळे आणि मागे फिरविलेले, सरळ नाक तेही बाकदार, ओठ लाल आणि पातळ, पेहराव म्हणजे साधी विजार आणि शर्ट... सतत हसतमुख चेहरा खळाळून हसताना उमटणारी भावमुद्रा म्हणजेच विनम्र भावमुद्रा.. जणू देवाने कलेचा नमुना निर्माण केला असल्याचे वाटत असे. संवादाला कधीच नकार न देणार्यात आणि संवादातून कायमच समाजहितकारक बुद्धिवादी भूमिका पटवून देण्याची असामान्य क्षमता बाळगणार्या‍ मित्राचे अकस्मात जाणे. खरोखर दुर्दैवी होते. आजही आठवणीचे मनोरे उभे केले तर सर्वप्रथम या मित्राला स्थान मिळते. हिऱ्याला घणाच्या घावाने इजा होत नाही. आज अशोक आपल्यात नसला तरी त्याचे मोल आजही आमच्या मनामनात घर करून आहे. 


अशोक भेके

No comments:

Post a Comment