आयुष्य म्हणजे गुलाबाचं फुल.. सुंदर आणि सुगंधित. गुलाबाला सौदर्य प्रदान केलंय तर उमलताना गंधाची पखरण केलीय. देठावर पाकळ्यांचा मुकुट शोभून दिसतो. पाकळ्याविरहीत देठ कुरूप दिसतो तर देठाविना पाकळ्यांचे अस्तित्व नसते. देठ हे गुलाबाचे अस्तित्व तर पाकळ्या या व्यक्तित्व. आयुष्यात गुलाबासारखा कर्त्यव्याचा देठ असावा तर छंदाच्या पाकळ्या असाव्यात. छंद म्हणजे ध्यास.. उपासना.. काही तरी करण्याची स्फूर्ती. छंद वेळ घालविणे नव्हे तर आपले व्यक्तिमत्व, संस्कृती आपला दृष्टीकोन जोपासला जातो. आपल्या विभागात असाच एक गुलदस्त्यातील छंदी आहे त्यांचे नांव *श्री दादा( राम) धर्माधिकारी*. या दादांना दुर्मिळ मराठी गाणी जमविण्याचा छंद आहे. तो त्यांनी जोपासलेला आहे. ग्रामोफोनवर चालणाऱ्या त्या गाण्यांच्या तबकड्या खापराच्या, नंतर प्लास्टिक मध्ये आल्या, तदनंतर कॅसेट आल्या. सी डी आल्या. काळ बदलत गेला तसतसा संगीताच्या जडणघडणीत कमालीचा बदल होत गेला. याचा महाठेवा *दादा धर्माधिकारी* यांनी जतन करून ठेवला आहे. मुंबईत अशी माणसे फार कमी आहेत. त्यांच्याकडे असा ठेवा उपलब्ध आहे. म्हणून तर संगीत कंपन्यांची माणसे आजही शोधत शोधत येतात अन त्या ठेव्याला नवीन मुलामा लावून बाजारात आणतात. पूर्वी संकलक म्हणून अशा माणसांची नांवे सदर अल्बमवर दिसत होती. काही जन मेहनताना मागू लागले अन ती नांवे पुसट झाली. मेहनताना देताना कंपन्या फार मोठा देतात असे नव्हे तर केवळ दीडएकशे रुपये हातावर टेकवून ते नामानिराळे होतात. पण या छंदीना एक आंतरिक उर्मी असते. छंद हा केवळ स्वत:ला आनंद मिळविण्यासाठी नसतो तर दुसऱ्याच्या आनंदासाठी केलेला संचय. आजच्या काळात कोणी कुंदनलाल सैगलची ‘बाबुलमोरा’ ऐकविली तर भूतकाळात गेल्यासारखे नक्कीच वाटेल. ते संगीत ऐकताना माणसं तल्लीन होत असत. शब्दनशब्द त्यांच्या हृदयावर कोरला जात असे. खुल्या वातावरणात गायलेले ते गीत असे. वाऱ्याची झुळूक सोबतीला सांज चढवीत असे.पक्ष्यांच्या किलबिलची कोरस होती तो चढता स्वर असे तर आज बंद खोलीत ध्वनिमुद्रित केलेला उडता स्वर.
प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद आहे. दुर्मिळ नाणी जमा करणे, पोष्टाची तिकिटे जमा करणे, चित्रकारितेचा, गीतगायनाचा, कलेचा आदी अनेक छंद आहेत. छंद माणसाला ओळख देतात. छंद माणूसपण टिकविते.माणुसकी वाढविते. जगण्यावर प्रेम करायला शिकविणारा छंद तर मन रमविणारा छंद. छंद जीवनाचा, निसर्गाचा, माणसाच्या मनाचा शोध घ्यायला शिकवितात. काही मंडळीना समाजोपयोगी कामे करण्याचा छंद. त्यातून स्वत:ची ओळख गवसते आणि जगण्याची नवी दृष्टीही लाभते. पण देवाने माणसाला एकसारखे बनविताना प्रत्येकाला एकेक छंद दिले पण ही कला जोपासण्याचा ध्यास दिला नाही.असंही म्हणणे चुकीचे ठरेल. काहींची कारणे तशी असू शकतात. जन्मापासून ते जर आपल्या कुटुंबासाठी काबाडकष्ट करीत असतील तर त्यांना कसला आला छंद. बहुतेक ट्रकच्या मागे आपण ‘नाद करायचा नाय’ असे लिहिलेले पाहतो. पण आज आपण लिहिले पाहिजे ‘नाद करायचाय’. आज नाही करणार तर कधी करणार.. असं ठासून सांगितले पाहिजे. पण आजच्या पिढीला एकच छंद जडला आहे तो म्हणजे मोबाईल ( भ्रमणध्वनी ) त्यावरील विविध प्रकारचे गेम. लहान लहान मुलांच्या हाती मोबाईल दिल्याने छंद वेगळाच जडावत चालला आहे. यातून लाभही असेल पण तोटा अधिक दिसून येत आहे.
*दादा धर्माधिकारी* हे घोडपदेव विभागातील तत्कालीन बुवा चाळ तर आता हेरंब दर्शन सोसायटीतील रहिवाशी. हा माणूस म्हणजे एक उत्तम चित्रकारसुध्दा आहे. अप्रतिम चित्र काढण्यात त्यांचा हातखंडा आहेच याशिवाय ते पूर्वी फलक रंगविण्याचे काम करीत असत. ते सूचनाफलक असोत वा दुकानावरच्या पाट्या असोत. मोत्यासारखी अक्षरे दिसत तेव्हा राम आर्ट म्हणजे दादा धर्माधिकारींचे पेंटिंग आहे, हे सांगितले जायचे. मुळात हा व्यवसाय होता त्यांचा. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु असे. अनेक माणसं असे छंद जोपासत असतील. आम्हांला अशा आनंदकृती जपणाऱ्या माणसाविषयी अभिमान आहे.
अशोक भेके
टिप्पण्या