Saturday, September 8, 2018

यशाचे मानकरी



                काही दिवसांपूर्वी आपल्या विभागातील *ओमकार सुरेश चव्हाण* यांना टाईम्स ऑफ इंडियाच्या भव्य व्यासपीठावर *स्टुडंट ऑफ द इयर*  चा पुरस्कार घेताना त्याचा छापून आलेला फोटो….. अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्याचा गौरव करण्यात आपणही हयगय केली नाही आणि करीत नाही. त्याने एक स्वप्न पाहिले आहे.आपण अत्युच्च शिखर गाठायचे. त्यासाठी तो दिवसरात्र अभ्यास एके अभ्यास करीत आहे. स्वप्न बघावीत आणि बघितलीच पाहिजेत. कारण ती प्रत्यक्षात उतरायला मन अधीर झालेले असते. हे क्षण त्याचे मज्जा मस्तीचे आहेत. तो त्यातही आंनद घेतो.  बाहेरच्या जगातील घडामोडी वर लक्ष ठेऊन अभ्यास करणे अन प्रत्येक वर्षी यश संपादन करीत ध्येयाकडे वाटचाल करणारा आपला ओमकार त्याच्या शरीरातील अणुरेणु यशाच्या ध्येयासाठी झपाटलेला आहे. यशाच्या पायरीवर चढताना पाहताना आम्हां मित्रपरिवाराला होणारा आनंद काही केल्या लपून राहणार नाही. या अगोदर विभागातून जबरदस्त महत्वाकांक्षा आणि प्रबळ इच्छेच्या जोरावर *माधव देशमुख* आयइएस झाले, *नितेश वर्पे, विवेक जाधव,* आशुतोष पोखरकर* या तरुणांनी डॉक्टरकी केली. काही मुलांनी इंजिनिअर म्हणून पदविका प्राप्त केली त्यांचा देखील आनंद विभागाने साजरा केला आहे.  खूप खूप यश संपादन करावे म्हणून आईवडीलांनी घेतलेले कष्टदेखील विसरता येणार नाहीत. आम्हांला जसा अभिमान आहे तसा त्यांच्या मात्यापित्याना काकणभर सरस अभिमान वाटत असेल, यात तिळमात्र शंका नाही. आपल्या पाल्याने आपल्या कष्टाचे पांग फेडले म्हणून सर्वात जादा आनंद त्यांना होणे स्वाभाविक आहे. ही मुले त्या छोट्याश्या घरात आदळआपट... बाहेर आरडाओरड सुरु असताना... सणासुदीचे भोंगे सुरु असताना देखील आपल्या कर्त्यवात तसूभरही ढळत नाहीत म्हणून त्यांचे मनापासून कौतुक करावेसे वाटते.  आजची मुले मनाशी एक कल्पना ठरवितात आणि त्या कल्पनेसाठी आपले बालपण, तरुणपण झोकून देतात. यशस्वी होण्यासाठी त्यांची आंतरिक तळमळ आणि इच्छा पहिली तर आपल्या भूतकाळाची आपल्याला लाज वाटेल. आजची युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोश्याची पिढी.                                    आमच्या पिढीला  यश शब्दाचा अर्थच नीटसा गवसला नाही.  मागे डोकावून पाहताना आमची पिढी शाळेत जात होती ती केवळ आईवडिलांच्या इच्छेखातर. ती शाळेची कपडे पाहिली असतील चुरगाळलेले, केविलवाणी अवस्था. पण एक म्हणजे ज्याच्यात प्रचंड अपयश पचविण्याची धमक असते तेच भव्यदिव्य यश संपादन करू शकतात. हे ही तितकेच खरे.यशासाठी प्रयोजन लागते ते आमच्या पिढीकडे नव्हते. आजच्या पिढीकडे आहे. शिवाय आईवडिलांचे पाठबळ आहे. आईबाबा एक वेळा आपली तहानभूक विसरतील पण आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यात हयगय करीत नाहीत. दहावी, बारावी  परीक्षेच्या वेळी महिना दोन महिने घरातील दूरदर्शन संचाला टाळेदेखील लावतील. पण आपल्या बाळाच्या अभ्यासाची काळजी घेताना दिसतील. आज आपल्याला कळत असेल त्यावेळी आपण दंगा,मस्ती किंवा गावभर हुंदडण्याला आवर घातला असता तर किंवा आजच्या पिढीसारखी स्वप्नं पाहिली असती तर आपल्या किंवा त्यांच्या पंक्तीत आपण सामील झालो असतो. काहीजन परिस्थितीचे बळी आहेत. त्यांच्या मनात असूनही त्यांना कौटुंबिक कारणास्तव आपल्या इच्छा, आकांक्षाना स्वाहा करावे लागले.
                   *ओमकार*  सारखी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. ध्येय काबीज करण्यासाठी झटत आहेत. पण यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्यता नव्हे. मनात भावनांचा कितीही गोंधळ असेल तरी आजची तरुणाई समोरच्यांशी चांगले वागते. इतिहास आतुरतेने जाणून घेताना भविष्याबद्दल जागरूकता दिसून येते.  गतिमान जीवन जगण्यात तथ्य आहे, हे आजच्या पिढीमुळे उमजले आहे.
                   पण स्वभावानुसार फरक पण जाणवेल मोबाईल पासून लँपटाँप पर्यंत हातात मिळाल्याने त्यांना कशाचीही कदर नाही. काही उद्धट असतील तर काही एकलकोंडे दिसून येतील. अशा युवावर्गाकडे ध्येयाबद्दल सुनिश्चीती नसते. त्यामुळे काही बहकले जातात. खर्चिक स्वभाव विघातक विचार करतात. वाटा वेगळ्या निवडतात. फसले जातात त्यांची आयुष्य उध्वस्त झालेली पाहताना मन तीळ तीळ तुटते. झटपट श्रीमंतीच्या नादात भलतेच काही तरी घडून गेले तर परत फिरण्याच्या वाटा बंद होतात.
                             मला आठवतंय एक मुलाला नव्वदीच्या दशकात दहावी परीक्षेत त्यावेळी चांगले गुण प्राप्त झाले होते. गुण सांगणे म्हणजे मुस्काटात मारून घेताल्यासारखे होईल म्हणून गुण सांगत नाही. पण त्यावेळी  त्याला खांद्यावर घेऊन काढलेली मिरवणूक..... तेथेच परिवर्तन घडून गेले. त्या मुलाच्या डोक्यात हवा गेली. तो दोन बोटे जमिनीवरून चालू लागला. पुढच्या शिक्षणाचा बोऱ्या वाजला. तो काळ  आणि आजच्या काळात जमीन आस्मानचा फरक आहे. आजच्या विद्यार्थ्याला ९०% गुण मिळाले तरी त्याला समाधान वाटत नाही. त्यामुळे ही आजची पिढी नेत्रदीपक यशाचे मानकरी ठरत आहेत. आंनद हा आहेच शिवाय आमच्या शुभेच्छा देखील त्यांच्या पाठीशी आहेत.

                                                                   

    *अशोकभेके*

No comments:

Post a Comment