Sunday, September 16, 2018

पोलीस दादा, नाण्याच्या दोन बाजू.....!



एखादा पोलीस सेवेत रुजू असतना कोणत्यातरी गुंडाच्या अथवा विशिष्ट समाजाच्या हातून बेदम मार खातो अन मृत्यूमुखी पडतो तेव्हा काही दिवस त्या पोलिसाच्या कुटुंबीयावर सहानुभूती प्रकट केली जाते. सरकारी सहानुभूतीतून नोकरी किंवा मोठी रक्कम प्रदान करण्यात येते. नुकतेच वाहतूक पोलीस विलास शिंदेंच्या बाबतीत असंच घडले. बरंच काही तरी दिले गेले. पोलिसांनी एक दिवसाचा पगार जेमतेम ३५ ते ४० लाख रुपये शिंदे कुटुंबियांना दिला. दिला मी म्हणत असलो तरी जेव्हा त्यांच्या पदरात या साऱ्या गोष्टी पडतील तेव्हा पडतील तो पर्यंत सरणाची आग थंड झालेली असेल. विलास शिंदे गेल्याचे दु:ख सर्वांना आहे. आज ठिकठीकाणी पोलिसांवर हात उगारण्याची फँशन झाली आहे. अलीकडेच पुण्यातील एका पेठेत दुकानदार आणि महिलेची भांडण सोडावयास गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून देखील त्याच्यावर गुन्हा दाखल केला. चार पाच दिवसापूर्वी शिवाजीनगर वाहतूक पोलिसाची व्हिडीओ शूटिंग काही टवाळखोर मंडळी करीत त्या वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत होते. गत सप्ताहात जळगावात एका धर्मांध मुसलमानाने ‘खबरदार, हमारे मुसलमान भाईयो को परेशान किया तो’ त्या वाहतूक पोलिसाच्या दहा पिढीचा उध्दार त्याने केला. तो वाहतूक पोलीस शिपाई एक शब्दाने काही बोलू शकला नाही. मुंबईत पार्ले,ठाणे आणि धुळे जिल्ह्यातही या घटना घडल्या. इतकी माजुरडी वृत्ती नेमकी आली कुठून ...? इतके स्वस्त झाले आहेत का पोलिसांचे जीव ...? कुणीही उपटसुंभाने उठावं आणि हात उचलावा, शिव्या घालाव्यात, कायद्याची धमकी देऊन त्यालाच ब्लँकमेल करावं, त्याच्याकडून खंडणी वसूल करावी. या सगळ्यांचा अर्थ काय ...?
"सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय‘ या बिरूदाला जागत दहशतवाद्यांच्या गोळ्या स्वतःच्या छाताडावर घेणारा तुकाराम ओंबळेसारखा पोलिस..... आपल्या सुरक्षेसाठी, मुंबईचे जनजीवन सुस्थितीत राखण्यासाठी आपल्या इच्छा आकांशा पायदळी तुडवीत स्वत:चे सण असो वा घरगुती कार्यक्रम, कुटुंबाला सोडून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतो तो पोलीस..... लेकराबाळांच्या वाढदिवसालाही कधी हजर राहत नाही तो पोलीस.... ड्युटीची वेळ संपत असतानाच आलेल्या एखाद्या "डेडबॉडी‘चं पोस्टमार्टम करून ते त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापर्यंतचे काम करतो तो पोलीस .... दिवसभर चौकांमध्ये थांबून वाहतुकीचे नियंत्रण करताना प्राणघातक वायु छातीत भरुन आजाराला निमंत्रण देणारा हाच पोलीस.....! ऊन पाउस कि थंडी वारा न पाहता जनतेच्या सुरक्षेसाठी झटतो तो पोलीस....!
एका वाहतूक पोलिसाने साहेबांच्या बायकोकडे कागदपत्र मागितले. साहेबांची गाडी आणि कागदपत्रे मागतो. बायकोने साहेबाला फोन केला.काही तासातच वाहतूक शाखेतून बदली पोलीस खात्यात झाली. काही वर्षापूर्वी राजभवनावर पोलिसाला उन्हात उभा करणारा साहेब आजही स्मरणात असेल. हे शासकीय अंतर्गत खात्यातील पोलिसांवर असलेली दडपशाही. ही झाली नाण्याची एक बाजू पोलिसांविषयी मन हेलावणारी.
त्याच पोलीसाविषयी एक प्रश्न जनामनाला विचारावासा वाटतो, खरंच तुम्हाला पोलिसांविषयी सहानुभूती आहे का .....? क्षणिक सहानुभूतीचे प्रदर्शन होत आहे, असं आपणास वाटत नाही का..? एका विशिष्ट समाजाने पोलिसांवर हल्ले केल्यानंतर आपली सहानुभूती जागृत होते, असे नाही का वाटत....?
भेंडीबाजार मध्ये वाहतूक पोलीस सौजन्याने .. अगदी विनम्रतेने तेथील स्थानिक जनतेशी वागतो. तोच पोलीस अन्य ठिकाणी ही सौजन्यची ऐशी तैशी. सामान्य लोकांना कायद्याचा धाक आणि माजलेल्या सांडाना पाठबळ देणारे पोलीसच ....! अधिकाराचा गैरवापर करणारा पोलीस. झाडाआड लपून बसलेला आणि सावज जाळ्यात आलेले पाहून प्रकट होणारा पोलीस . शहरात मध्यरात्री पर्यंत सुरु असलेले बार आणि त्यामधील धांगडधिंगा राजरोसपणे सुरु पण उत्सवात १० च्या ठोक्याला रेडीओचे भोंगे बंद करणारे पोलीस. ते जितका पगार घेतात त्याहीपेक्षा कितीतरी कमी पटीने हातावर पोट असणारे सामान्य लोक आपला उदरनिर्वाह कसा करीत असतील. चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांमुळे शेफारलेले गुंडही स्वत:ला अनभिषिक्त सम्राट समजत आहे. पोलिसांची इतकी दहशत आहे की, सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढावयास मागत नाही. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना टोलमाफी.... जवळच्या वाहतूक शाखेत जाऊन परवानगीपत्र घ्यावे. कोणी गेले असेल तर त्यांनी या बसा .... काही क्षणातच तुम्हाला परवानगी पत्र अदा केले असेल का...? सरकारी काम आणि तासभर थांब, असा नक्कीच प्रत्यय आला असेल. काहीही कारण देऊन नागरिकांना त्रास दिला जातो. वाहतूक नियम जर वाचले तर नवीन गाडी रस्त्यावर येताच तिच्यावर १० ते १५ कारणास्तव दंड आकारणी होऊ शकते. विदेश नियमावली सुशासन आहे तर स्वदेश नियमावलीत दु:शासन आहेत. येथील लोकसंख्या विचारात घेऊन केली नाही. कोणत्या रस्त्यावर हेल्मेट वापरावे, कोणत्या रस्त्यावर शिटबेल्ट परिधान करावा, दहा मिनिटाच्या अंतराला तास लागतो तेथे या वाहतूक नियमावलीनुसार दंड आकारणी करणाऱ्या पोलिसांवर नागरिक प्रेम करणार का...? जे जे उड्डाणपुलावरून दुचाकी वाहने बंद करणाऱ्या वाहतूक विभागाला कोणत्या धर्माचा कळवळा दिसून येतो, हे तर दिसून येते.
प्रामाणिकपणे काम करणारे विरळच. सगळेच वाईट आणि सगळे चांगले असतात असे नाही. आता आपण कॉटनग्रीनचं उदाहरण घ्या. वाहतूक व्यवस्थित सुरु असावी याखातर हे पोलीस किती झटत असतात....! कोपऱ्यावर उभे राहून काय निरीक्षण करतात....! सिग्नल यंत्रणा सुरु नाही याचे कारण कोणी देईल का....? ज्या ठिकाणी चौकापेक्षा अधिक रस्ते आहेत तेथे सिग्नल यंत्रणेची गरज नाही, असा वाहतूक नियम आहे का...! जीव मुठीत घेऊन रस्ता पार करणाऱ्या आमच्या माय बाप नागरिकांना या पोलिसांविषयी खरोखर आदर वाटत असेल का....?
दुचाकी स्वार म्हणजे गुन्हेगारी, खंडणीखोर, हफ्तेखोर, देशद्रोही, समाजद्वेषी, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेला आव्हान देणाऱ्या शक्तीं या सारख्या घटकात मोडत असाव्यात. या वाहतूक नियमांची झळ पहिल्यांदा त्यांनाच सहन करावी लागते. राणीबागेत प्रभातफेरीला येणारे नागरिक असोत वा जेथे आपण राहतो त्या परिसरात दुचाकीवरून खरेदी करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी आपुलकीची भावना ओसंडून वाहत असेल का ...? ही नाण्याची दुसरी बाजू
ब्रिटिशांनी तयार केलेल्या पोलीस कायदा १८६१ वर आधारीत आहे. आज पोलिसांचे कामकाज १९५१ च्या मुंबई पोलीस कायदा या नुसार चालते. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर कालानुरूप बदल केले असले तरी मूळ साचा हा इंग्रज बनावटीचा आहे. त्यात बदल करण्यास राजकीय यंत्रणा उदासीन आहे. १९७९ ते १९८१ या दोन वर्षाच्या कालखंडात पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल सुचविणारे नेमलेल्या नँशनल पोलीस कमिशनने एकूण आठ अहवाल सरकार दरबारी सादर केले ते आजतागायत बासनात गुंडाळून ठेवलेले आहेत. पोलीस यंत्रणा स्वायत्त झाली पाहिजे तसेच कायदा आणि सुव्यवस्था आणि तपास हि स्वतंत्र यंत्रणा हवी जेणेकरून पोलिसांवरचा ताण कमी होऊ शकतो. मग आपण पोलीसातला माणूस पाहू शकतो.

अशोक भेके

No comments:

Post a Comment