घोडपदेव विभागात एक अस्सल माणिक रत्न म्हणून जुन्या पिढीला ठाऊक असलेले शंकरराव धामणीकर. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणी गांवात धोंडीबा जाधव यांच्या यांच्या घरात २०.१०.१९१४ साली एक माणिक रत्न जन्माला आले. घरची परिस्थिती फारच गरीबीची. गरीब परिस्थितीशी झुंजत असताना त्यांनी सन १९३२ ला मुंबई गाठली. चास्कर चाळीतल्या बैठ्या चाळीत त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली. सटवी जन्माला घालताना ललाटी भाग्य घेऊन पाठविते. जे ठरविलेले असते ते होत नाही, नियती वेगळेच काही तरी घडविते अन त्याचे नशीब उजळवीते. शंकररावांच्या बाबतीत असचं घडले. आवाज चांगला होते. चुलते रामजी बाबा खंडोबा भक्त होत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जागरण गोंधळ व्यवसाय करू लागले. जागरणातून खंडोबाची पदे, कथाकथन आणि गायन क्षेत्रात त्यांनी जम बसविला. हे पाहून दगडूबाबा साळी यांनी त्यांना त्यांच्या तमाशासंचात सामील करून घेतले. तेथे त्यांनी निवेदन, गायन आणि अभिनयाचे धडे आत्मसात केले तीन एक वर्षे त्यांनी त्यांच्या सोबत पायपीट केली अन सन १९३७ साली आपला पारंपारिक जागरण व्यवसाय पुन्हा सुरु केला.
पूर्वी जागरणात तीनच माणसं असत एक गाणारा दोन साथीदार ... पण शंकरराव यांनी आमुलाग्र बदल घडवून आणत किमान ८ माणसांचा संच जमा केला. त्यामध्ये गण, गवळण, पोवाडे, खंडोबाची पदे संभाषणासहित करीत आणि वाघ्याचा पेहराव धारण करीत श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने ठिकठीकाणी गात कार्यक्रम करू लागले. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी जागरणातून पारंपारिक कथांचा आधार घेत खंडोबाचे लगीन, म्हाळसाचे लग्न, गोरक्ष जन्म, हरीश्चंद्र तारामती,सत्यवान सावित्री अशा अनेक नाटिकानी लोकरंजन केले. खेड आंबेगाव जुन्नर आणि मुंबईत सर्वत्र त्यांना निमंत्रणे येऊ लागली. हे करीत असताना शाहीर विष्णुपंत कर्डक यांच्याशी भेट झाली अन शंकररावांना पोवाड्याची गोडी लागली.या नंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, साने गुरुजी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची मेजवानी अधून मधून त्यांना मिळत असे. ते विचार ऐकून भारावून जात असत. सदर विचारांची गाणी पोवाडे तयार करून कलेच्या माध्यमातून लोकरंजनाबरोबर लोक शिक्षणाचे काम केले.काळाबाजार, गुंडगिरी, शेतकऱ्यांची दु:ख, अस्पुश्यता, मंदिर प्रवेश, अधिक धन्य पिकवा, शिक्षणाचे महत्व,दारूबंदी, अंधश्रद्धा आदी विषयांवर पोवाडे, गीत लिहून जनजागृती केली. हे सारे काही करीत असताना लोकांकडून उत्स्फूर्तपणे दोन सोन्याची आणि किती तरी चांदीची पदके त्यांना भर कार्यक्रमात बहाल करण्यात आली. केवळ जागरण, गोंधळ आणि लोकनाट्य करीत राहिले नाहीत. सदर कालावधीत फावल्या वेळात त्यांनी गांधींजींचे स्वप्न, जनजागृती, आणि जय मल्हार ‘ ही तीन पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली.
`धामणीकरांच्या ‘बाणु – मल्हारीचं लगीन’ या कथानकावरून इंडिअन नँशनल थिएटर यांनी ‘खंडोबाचे लगीन; सादर केले. त्या मध्ये सूत्रधार म्हणून भूमिका साकारली. शंकरराव धामणीकर हे नांव सर्वत्र गाजत असताना दिल्लीतील विश्व युवक केंद्र लोकसंगीत अकादमीने खंडोबागीत सादर करण्यासाठी निमंत्रित केले. दिल्लीची वारी झाल्यानंतर आकाशवाणीनी वेळोवेळी कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलाविले. मुंबई दूरदर्शन सुरु झाल्यानंतर धामणीकरांचे खंडोबाचे लगीन आणि हुतात्मा बाबु गेनूचा पोवाडा सादर करून आपल्या कलेला महाराष्ट्राच्या घरादारात पोहचविले. हा माणूस फार मोठा होता. पण समाज ‘जागरण, गोंधळ आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताकडे वेगळ्या नजरेने पाहत असतो. तेच धामणीकरांच्या बाबतीत झाले. इतका मोठा लवाजमा सांभाळताना अनेकांची घरे चालविताना धामणीकर आहे तेथेच राहिले. त्यांचं कितीतरी अप्रकाशित साहित्य, काव्य पडून आहे. त्यापैकी अलीकडेच ‘चौर्य’ या चित्रपटासाठी त्यांचे एक गीत घेतले आहे. येत्या १० ऑगस्ट २०१६ रोजी हा चित्रपट थिएटर झळकेल तेव्हा आपल्याला आपल्या शंकरराव धामणीकरांचे नांव पाहायला मिळेलच.
शंकरराव धामणीकर हा माणूस म्हणजे घोडपदेवच्या दृष्टीने खरोखर माणिक होते. रत्न अनेक पण रत्नांचा राजा म्हणून माणिक ओळखले जाते. असं हे माणिक रत्न एका छोट्याश्या घरात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या या माणसाचा गौरव होणे उचित आहे.आपल्या ८२ वर्षाच्या जीवन प्रवासात बरेच कमावीत या मातब्बर गड्याने २९ ऑगस्ट ९६ ला आपला अखेरचा निरोप घेतला आजही ‘वाघ्या-मुरळी नाचती परोपरी । आवडी ऐशी पाहीन जेजुरी’ आणि ‘‘आई अंबाबाईच्या नावानं... उदो उदो मायेचा निजरूप आईचा गोंधुळ मांडला, उदे उदे ग अंबाबाई गोंधळा ये.... या त्यांनी गायलेल्या गीतांची आठवणीने मन भरून आले आहे. शाहीर शंकरराव धामणीकर आम्हाकडून आपणास भावपूर्ण अभिवादन .........!
अशोक भेके
No comments:
Post a Comment