फार पूर्वी दानव देवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या करायचे. देव प्रसन्न होत वरदान देत असत. मग तो मातलेला दानव देवांसहित सर्वाना सळो की पळो करून सोडीत... हे ऐकून वाचून अत्यंत कंटाळा आला. पण आधुनिक युगातला एक उल्लुमशाल मला दिसला.आता तुम्ही म्हणाल उल्लुमशाल म्हणजे काय...! हे त्याचे टोपण नांव. गोरा रंग,डब्बल हड्डीची शरीरयष्टी आणि पाणीदार डोळे पाहिले तर अहिंसक आणि निरुपद्रवी व्यक्तिमत्व. पण प्रत्यक्षात तसं नव्हतं कोणता तरी देव त्याला प्रसन्न झाला अन त्यांच्या अंगावर माजोरीची आणि मग्रुरीची झूल चढवून मोकळा झाला होता. असं अनपेक्षित वरदान लाभल्यामुळे या उल्लुमशाला स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास झाल्यामुळे बिरबलाने शिजविलेल्या आयत्या खिचडीवर ताव मारू लागला. ताव मारून मारून बेड्कासारखा फुगलेला, तागडीतही तोलता येत नव्हतं.त्याच्या ऱ्हस्व आणि सदोष आकलनाने तोंडावर सामाजिक भलामण आणि पाठीमागे ... जाऊ द्या असे शब्द वापरून आमच्या लेखणीचा अपमान. पण हे महाशय पाळण्यात असतना सतत तोंडात पाय घालण्याच्या सवयीमुळे हे बाळ मोठेपणी लहान तोंडी मोठा घास घेणार, थोरामोठ्यांना नांव ठेवणार ....! आई बापाचे संस्कार मातीमोल करणार ....हे पित्याने वर्तविलेले भाकीत सत्यात उतरले. बाळाचे पाय पाळण्यात पाहिले तेव्हा एक जन बरळला हा तर पीडितांना जंजाळात गोवणार...! काय सांगू त्या महाशयाचे उदगार तंतोतंत खरे ठरले. त्याच्या उद्योगाचे काय वर्णन करू..! विध्वंसक उद्योग. वेलीचा गुंता करून भूकललेल्या बकरी बकरे यांना दाखवायचा आणि निर्जन स्थळी न्यायचा भुकेल्या बकऱ्या बकरे त्या जंजाळात आपले मुंडके घालायच्या अन फसायाच्या. मग हा उल्लुमशाल त्यांच्यावर झडप घाली. इमानाशी गद्दारी आणि बेइमनाशी संगत करीत समाजाचे दीर्घकालीन नुकसान करीत स्वत: बेसुमार हाव करणारा करीत होता. काय त्याचा तामझाम आणि सरंजाम ....! घरात नाही दाणा, अन बाजीराव मला म्हणा...! पक्का फसवा मोह्जाली.कोणत्याही प्रश्नाची जाण नाही. ढीगभर काम करण्याची लकब नाही. त्याच्या वर्तनामुळे माहोलातील शिस्तप्रिय यंत्रणा खिळखिळी तर वैगुण्य झाकण्यासाठी लंगडी सबब सांगण्यात वस्ताद....! त्याची अती सोंगे पाहून सामान्यांचा भ्रमनिरास. खवचटपण आणि प्रचंड बडबडीमुळे टकलीला चरे पडले होते. पुरता भंजाळलेला हा उल्लुमशाल दुसऱ्यांना खचविण्यारा विचारांचा पिंगा घालीत असे.
उल्लुमशालचे हे उद्योग पाहून जंगलातला एक शहाणा हत्ती गोंधळलेला होता. काय करावे सुचेना. हत्ती समाजाच्या हितासाठी झटत होता. चुकी करणारांना समझदारीच्या उपदेशाचे डोस पाजीत असे. क्रित्येक वाईट चाली त्यांच्या मध्ये सुधारणा आणली होती. पण तो करीत असताना ज्यांना उद्देशून डोस असायचे ते नाराज व्हायचे. चडफडायचे, गरळ ओकायाचे. पण हत्ती हा जागेवर स्थिर होता. समजूतदार होता सर्वाना एकोप्याने बरोबर घेऊन जायचा त्याचा उद्देश म्हणजे समाज जोडो अभियान. त्यामुळे कुणाच्या मेंदूला झिणझिण्या येत असतील.जे चुकीचे ते चुकीचेच. निर्भीडपणे सत्य प्रतिपादन करणे अथवा बोलणाऱ्याविषयी समाजाला पटत नाही. पण त्यातून समाजाच्या भल्याच्या गोष्ठी निर्णयाप्रत येत असतील किंबहुना दूर गेलेल्या चिमण्यांना परत फिरारे अशी भावनिक साद... असो वा समाजकल्याण विषयी आवाहनाने आमचं समाज जीवन सुधारत असेल तर हत्ती हा त्यांच्या जागेवर अत्युत्तम म्हणावा लागेल. हत्तीच्या कळपात सर्वच शहाणे आहेत असेही नाही. श्रमजीवी वेडे देखील आहेत पण सुधारणा महत्वाचीच.
एक काळ असा होता या उल्लुमशालाच्या खांद्यावर हात ठेवला तरी हात चिंब भिजत असे पण आता त्याच्या हृदयात हात घातला तरी ओल लागत नाही. आटत चाललेले प्रेम. काय लिहायचं...! अंगावर झूल चढली की, आपणही हत्ती असल्याची स्वप्ने पडू लागली. त्यांची लेखणी अश्लील शब्दांवर स्वार झाली. हत्तीशी टक्कर मारायला गेलात तर कपाळमोक्ष निश्चित आहे. पण त्या उल्लुमशालाला सांगू इच्छितो, बाबा रे .....! आसक्तीने सजवलेल्या,प्रेमाने सावरलेल्या चिरेबंदी वाड्यात राहून काही तरी सत्कर्म कर. आपले आयुष्य एखाद्या सत्कार्यासाठी खर्च कर.
अशोक भेके
No comments:
Post a Comment