कॉटनग्रीनच्या दक्षिणेला तिकीटघराचा शाप असलेल्याविषयांन्वये लिहिताना राजकीयांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राज्यकर्त्यांनी, कार्यकर्त्यांनी दिलदार,क्षमाशील,सहिष्णूघोडपदेव फेरबंदर नागरिकांना गेली अनेक वर्षे तिकीट घर देणार म्हणून झुलवत ठेवले आहे. निवडणुका येतात जातात. हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत आहे. कोणत्या राजकीय पक्षास दोष द्यायचा नाही किंवा राजकीय कार्यकर्त्यावर दोषारोप करायचे नाहीत. पण कार्यकर्ता, नेता म्हणून मिरविताना आपण लोकसमस्यांचे निराकरण करण्यात कोठेतरी अयशस्वी आहोत.हे जनतेला कळलेले आहे. तरीही या प्रश्नाचा *घोडपदेव समूहावर* (WHATS APP) उहापोह झाला तेव्हा *मनसे विभागाध्यक्ष श्री विजय लिपारे* आदि सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून रेल्वे महाव्यवस्थापकांना कॉटनग्रीन रेल्वेस्थानकात आणून समस्यांचा पाढा वाचला होता. त्यावेळी आम्ही सवंगड्यासहित उपस्थित होतो. महाव्यवस्थापकांनी तेथे आश्वासन दिले होते. नक्कीच तिकीट घर बांधणार....! आम्ही देखील आनंदी झालो होतो. अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटत होते. आठ महिने होत आले. कुठे मांशी शिकली....! कळेनासे झाले आहे. परंतु आपल्याला हवे असलेले तिकीट घर देण्यात कोणते झारीतले शुक्राचार्य आपल्या भावनांशी खेळत आहेत. सौजन्य जेव्हा काम करीत नाही तेव्हा अन्य पर्यायाचा मार्ग उघडावा. या मताचा मी आहे. आज गरज आहे आंदोलनाची..! कळ दाबायची वेळ आली आहे. ज्यावेळी या शब्दांना अर्थ येईल किंवा असंख्य प्रवाश्यांच्या, आमच्या नागरिकांची वेदनेची भाषा कधी कळतील, ठाऊक नाही. परंतु न उमजल्यास तेव्हा मात्र नागरिकांची बोलण्याची हिमंत करणारी साहसी जिभ सैराट झालेली असेल, हे खात्रीपूर्वक सांगतो.
कॉटनग्रीन रेल्वे स्थानक घोडपदेव फेरबंदर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. काही अंतरावर असल्याने भायखळा,चिंचपोकळी मध्य रेल्वेच्या स्थानकाऐवजी कॉटनग्रीनचा वापर आपण करीत आलो आहोत. त्यात म्हाडाचे भव्य संकुल उभे राहिल्याने गर्दी वाढल्याचे आपल्यासर्वांच्या लक्षात आले असेलच. या स्थानकात प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. त्यापैकी महत्वाची समस्या म्हणजे दक्षिणेला तिकीट घर हवं आहे. आता उत्तरेला पुलावर एक तिकीट घर आहे. छत्रपती शिवाजी स्थानकाकडे जाताना तेथे तिकीट काढायची आणि पुलावरून खाली उतरायचे अन वळसा मारून पुन्हा तो भला मोठा डोंगर चढायचा. जेजुरी गडाच्या पायऱ्या चढताना काही होत नाही पण ही चढण चढताना पायात गोळा येतो. आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य, खड्याखुड्यातून स्थानकात प्रवेश करताना दुर्गंधी म्हणजे प्रवाश्यांना अत्तराचा सुगंध दिल्याप्रमाणे त्याकडे तक्रार करूनही न बघणारे रेल्वेप्रशासनात एकेक शिरविरहित नग बसले आहेत. आपल्या घोडपदेव फेरबंदरवासियांचा अंत पाहत आहेत. त्यांच्या सहनशक्तीला आव्हान देत आहेत. तिकीटघर देण्यामागे देखील या अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. माझ्या मते तिकीट घर देणे ही क्षुल्लक बाब आहे. ९ Platform चे १२ Platform कॉटनग्रीन स्थानकात शक्य नसताना केले गेले. पण एक तिकीट घर उभारता येत नाही. ही आपली शोकांतिका नव्हे थट्टा आहे. रेल्वेकडे जाण्यासाठी SKY WALK BRIDGE आहे. आपल्या नागरिकांना किती लाभदायक आहे...! विचार करा. हा प्रश्न रेल्वे अंतर्गत येत नाही.परंतु आमच्या समस्यांकडे न बघणे ही थट्टाच आहे. कदाचित आपल्याला कोणीतरी दिलेला शाप असावा. याखातर आपल्या समस्यांकडे रेल्वे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही.
रे रोड स्थानकात अनेक वर्षानंतर तिकीट घर आले. पण काही मर्यादित वेळेसाठी. कर्मचारी गैरहजर तिकीटघर बंद. नाही तर पुलावरच्या तिकीट घराचा वापर करा. पुलावर आतून जायचे तर तिकीट तपासनिसाची भीती उदभवते. या स्थानकाविषयी आता नको, नंतर पाहू......! किती उफाळून वर येणाऱ्या गोष्टी मनात दाबून ठेवायच्या, टोपलीत झाकलेल्या नागाप्रमाणे....!
मध्यंतरी आपल्या विभागातील एका तरुणाला रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यानी लुटले होते. तात्पुरता हाहाकार माजला. गर्दुल्ले, तृतीय पंथी लोकांनी बहुतांशी अंतर्गत भाग व्यापलेला आहे त्यामुळे एका असह्य तरुणीवर रात्रीच्या वेळी सामुहिक बलात्कारासारखी लज्जास्पद घटना घडली. काही नागरिकांच्या सावध वृत्तीमुळे त्या गुन्हेगारांना पकडले गेले. आपल्या मायभगिनी येत जात असतात. पोलीस संरक्षणाला नाही.कधीही उदघोषक नसतो. तर कधी वीज गायब असते. अशा अनेक कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकातील समस्या आहेत. दक्षिणेला तिकीट घर उपलब्ध झाले तर वर्दळ वाढेल. त्यामुळे अनेक समस्या उदभवणार नाहीत.
पन्नास रुपयांचे पेढे, पंधरा रुपयांचा नारळ, दहा रुपयांचा हार, एक रुपया चप्पल सांभाळणाराला आणि पांच रुपये दान पेटीत.... एवढे करून आपण देवापर्यंत पोहचत नाही. पण आपला आवाज केंद्रात बसलेल्या रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख हस्ते परहस्ते पोहचवा.जेणेकरून मंत्र्याला आपल्या वेदना जाणवतील, त्यांना रुखरुख लागेल आणि ते आपल्याला शापातून मुक्त करतील.
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment