बालपण म्हणजे सोनेरी दिवस. प्रत्येकाच्या मनात एक कोपरा सुगंधी आठवणीनी भरलेला असतो. त्या मोकळ्या जागेत त्यादिवशी ती लहान मुले बँट-बॉल खेळत होती. मोकळी जागा बघितली लहान मुले चेंडू घेऊन खेळत असतात.खेळात मग्न असताना गोलंदाजाने टाकलेला चेंडू उसळी मारून त्या चेंडूफळीला हळूच स्पर्श करीत एका वाटसरूच्या पाठीवर जोराची शाबासकीची थाप देतो. तो माणूस किंचाळतो.अनपेक्षितपणे कुणी मारलेली थाप त्याला घायाळ करते. तो ओरडतो ती लहान मुले पसार होतात. हा शिव्यांची लाखोली वाहत उभा असतो. आम्ही देखील बालवयात अशीच मस्ती, केलेल्या चुका, खेळलेले खेळ सारे काही आठवू लागल्या. आम्ही खेळत असत तेव्हा एकजन आम्हांला खेळून देत नसे. पण तो येत असलेला पाहून ‘लांडगा आला रे ...आला.’ म्हणून धूम ठोकणारा आमचा मित्र परिवार.. खरंच ते लहानपण म्हणजे सोनेरी दिवस. अर्थात हल्लीची मुलेही अपवाद नसावीत. काल काही दहा ते बारा वर्षे वयोगटातील लहान मुले राणीबागेच्या मैदानात पडलेली लाल माती आपल्या अंगावर खांद्यावर आणून आमच्या मैदानात टाकीत तेथे छानसं कबड्डी मैदान तयार केले. आमच्या आणि आजच्या पिढीची तुलना केली तर आजच्या पिढीकडे जे ज्ञान आहे, माहितीचा साठा आहे तो आमच्या पिढीकडे नव्हतं,हे खेदाने म्हणावे लागेल. अनेक पावसाळे पाहिले किंवा उन्हाने केस पांढरे नाही झाले,हे अनुभवाचे बोल सांगण्यासही जीभ धजावत नाही. या आठवणींची धग नेहमीच सुरु असते. आज मला मोकळ्या मैदानाची व्यथा सांगायची आहे.
मोकळी जागा म्हणजे आपण मैदाने समजू. प्रत्येक विभागात काही मोकळ्या जागा असतात. आजकाल मुलांना खेळायला मैदाने शिल्लक नाहीत. मिळेल त्या जागेत ते खेळ मांडतात, अन लोकांची नाराजी ओढवून घेतात. बिच्चारी ती मुले...! उद्याची भविष्य....! एक तर आज त्यांना अभ्यासामुळे खेळायला सवड नसते. तेथे सुट्टीच्या दिवशी कच्ची बच्ची खेळ खेळत असतात. ‘येथे खेळायचे नाही’ म्हणून कोणी तरी ओरडत त्यांना हाकलून लावतात. खिडक्यांच्या काचा फुटत असतात. तर कुणाला मुले आरडा ओरडा करतात म्हणू त्रास होत असतो. पण याच मोकळ्या जागेचा गैरवापर करतात तेव्हा कोणी कधीच बोलत नाही. तेथे रात्रीच्या चंद्रप्रकाशात मद्यपी धुमाकूळ घालीत असतात. बाटल्यांचा खच पडलेला असतो. गर्दुल्ले यांचा तेथे वावर असतो. जुगारी यांचा अड्डा दिसून येतो. वाहने उभी असतात.कोणी येतो कचरा टाकून जातो. डेबरीज टाकतो. पण या विषयी चकार शब्द कोणी बोलणार नाही. काळोख याचा अर्थ भय, आंधळेपण...! या अंधारात जे चालते त्याच्या विरुध्द होम पेटविण्याची गरज आहे. होम केला तर असुरी शक्तींचा नायनाट होतो, असं म्हणतात.
प्रत्येक विभागातील मोकळ्या जागा कुणी तरी काबीज केल्या आहेत तर उरल्या सुरल्या जागेचा गैरवापर केला जात आहे. काही मैदानानी कात टाकली आहे. जागोजागी पडलेले खड्डे, माती कमी दगडधोंडे जास्त, कचऱ्याचे साम्राज्य, अत्यंत दुरावस्था दिसून येईल. कधी काळी याच मैदानात बसून मिटिंग झाल्या असतील . संस्थाही स्थापन झाल्या असतील. अनेक नेतेमंडळींचे पाय या ठिकाणी लागले असतील. त्याच ठिकाणी झोपड्या बांधल्या गेल्या आहेत. ठीक आहे घर नव्हते म्हणून घर बांधले गेले. पण बांधलेल्या घरात भाडेकरू ठेऊन कमाई सुरु झाली.
अनेक मैदानाची एक व्यथा आहे. काय सांगू आणि कशी सांगू .....! दुरावस्थेमुळे मैदाने महाभारतातल्या अनेक बाणांनी घायाळ झालेल्या भिष्मासारखी झाली आहेत. मरण येत नाही आणि जगताही येत नाही, अशी केविलवाणी अवस्था झाली आहे. मैदाने वाचवा....घोषणा हवेत विरतात. अशा मैदानावरील दगडधोंडे काढून हिरवीगार शाल अंथरली तर आकार येईल. नवसंजीवनी मिळेल.मैदानालाही नवतारुण्य मिळेल.
अशोक भेके
No comments:
Post a Comment