निजामशहाने मालोजीराजाना पुणेप्रांताची जहागिरी दिली होती. जहागीरदार म्हणजे तेथील राजा. मालोजीराजांच्या दरबारात एक सुंदर राजनर्तकी म्हणजे नाचगाणारी कलावंतीण होती. नांव तिचं *मताबाई.* पायात घुंगरू घालून तिचं आगमन होई तेव्हा साक्षात रंभा, मेनकेने प्रवेश केल्याचे सरदारांना वाटत असे. नजर लागावी असं तिचं सौदर्य. खानदानी... मुसलमान. पुढे काही वर्षांनी मालोजीराजे निर्वतल्यानंतर शहाजीराजे यांच्याकडे जहागीरीची सूत्रे आली. त्यांच्याही दरबारात मताबाई होत्या. शहाजीराज्यांना आपले स्वत:चे राज्य हवे होते. त्यांनी मोगल साम्राज्याविरुध्द बंड पुकारले पण समस्त मोगलांनी एकत्र येऊन शहाजीराजांचा अपेक्षा धुळीस मिळविल्या. आदिलशहाने रायाराव नावाच्या मराठा सरदाराला पुण्यावर चाल करून पाठविले. गाढवाचा नांगर फिरविला.त्याने पुणे उध्वस्त केले. मसणवाटा झाल्या. बहरलेले पुणे प्रांतात एक माणूस शिल्लक राहिला नव्हता. मताबाईची दोन पराक्रमी तरणीबांड मुले या हल्ल्यात लढता लढता कामी आली. जिकडे वाट मिळेल तिकडे माणसं गेली. एक मंदिर नाही की, त्या गाभाऱ्यातला देव राहिला नव्हता. काही काळ लोटला. शहाजीराजांना आपला सह्याद्री हवा होता. तेव्हा दादोजी कोंडदेव, माणकोजी दहातोंडे, श्यामराव पेशवा आदि दहा कारभाऱ्याना राजमुद्रा देऊन पुणे परगण्याकडे गुप्त सूचना देऊन पाठविले. जिजामातेने पुण्यात प्रवेश केला अन ते उध्वस्त पुणे पाहून त्यांना डोळ्यातल्या गंगेला आवर घालता आला नाही. इतके बेचिराख झाले होते. मधल्या कालावधीत तेथे हिस्त्र प्राण्यांनी तळ ठोकला होता. त्यामुळे कोणी फिरकेनासे झाले होते. जिजाऊ मातेने निर्धार केला. पहिले पुणे वसावयाचे. शिवाजीराजे तेव्हा सहा वर्षाचे होते. कारभारी मंडळीना सूचना केल्या. काहीही करा अन तयारीला लागा. पहिल्यांदा एखादे मंदिर मूर्ती शोधा, तेथून आपण शुभस्य शीघ्रम करू....! सैनिक बाहेर पडले. कुठेही मंदिर नाही की मूर्ती मिळेना. शोध सुरु होता. एका खबदाडात एक ब्राम्हण लपून छापून यायचा त्या खबदातील स्वयंभू गणपतीची पूजा करून पळून जात असे. हे सैनिकांना दिसले. जिजाऊ तेथे आल्या अन त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तो कसबा गणपती आजही आहे आणि त्याच पुजाऱ्याचे वंशज आजही पुजारी आहेत. मंदिर पूर्णत्वास येई पर्यंत पळून गेलेले पुणेकरांचा शोध घेत घेत एकेकाला परत पुण्यात वसविण्याचे कार्य सुरु झाले. पण हिस्त्रश्वापदे त्रास देऊ लागली. गायी म्हशी टिकेना. आलेली माणसं नाराज होऊ लागली. आपल्या मनातल्या भावनांना जिजामातेसमोर वाट मोकळी केली तेव्हा तुमच्याकडे भाले फरश्या आहेत त्याचा उपयोग करा. शेपटी दाखवा अन इनाम घेऊन जा. काही महिन्यातच त्या श्वापदांचा नायनाट झाला. तेव्हा मातेच्या कानात कुणी तरी मताबाईविषयी सांगितले. तत्काळ सैनिकांना सूचना दिल्या. पालखी घेऊन जा आणि मताबाईना सन्मानाने घेऊन या. मताबाई राहत असलेल्या त्या खबदाडात सैनिक पोहचले. मताबाई घाबरली.. ते राट केस, काळाठिक्कर पडलेला चेहरा, मळके कपडे... एकेकाळची राजनर्तकी,तिच्या रूपावर भाळले जात त्या मुळच्या सौंदर्याला नजर लागली होती. राणीसाहेबांनी बोलविले हे सांगताच लटपटू लागली. छातीत धडधड वाढली होती. पण पालखी पाहून मात्र ताळ्यावर आली. जिजाऊमातेसमोर आणण्यात आले, तेव्हा शिवबा ओसरीवरच बसले होते. मताबाईनी मुजरा केला. मातेनी प्रेमाने विचारपूस केली. दोन मुलांच्या बलिदानाचा संदर्भ देत मताबाईचे बालराज्यांना स्वराज्यासाठी किती योगदान आहे.याचा पाढा सांगितला गेला. राजे, अशा अनेक मताबाई सारख्या मातांनी आपली मुले स्वराज्यासाठी अर्पण केली आहेत. ते तुझ्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. या मोगली जुलमातून त्यांना मुक्तता हवी आहे. पुढे मताबाईची पालनपोषणाची जबाबदारी घेतली गेली. केवळ शिवबांना त्यांच्या प्रेरणेने संस्कार घडतील. ते संस्कार स्वराज्य वसविताना क्षणोक्षणी प्रत्यक्षात दिसून आले. सुरतेवर स्वारी केली तेव्हा एक डच महिला आपल्या चार मुलांना उराशी कवटाळून बसली होती. बाहेर टापांचे आवाज येत होते. जाळपोळ सुरु होती. तिने मनात म्हटले उद्याचा सूर्योदय पाहणे नाही म्हणून आपल्या मुलांवर आपली अखेरची माया बरसवीत होती. रात्र गेली पण तिच्या घरावर कोणी धावा केला नाही की साधी टकटक केली नाही. बाहेर तर रणधुमाळी माजलेली असताना आपल्यावर कोणी हल्ला करीत नसल्याचे पाहून ती साशंक झाली. पोटात अन्नाचा कण नव्हता की पाणी देखील प्यायची वासना नव्हती. दारात काळ उभा असताना कुणाला भूक लागेल...! तिने धीर करून खिडकीतून खाली पाहिले. सैनिक घराला कडे घालून उभे होते. ती माडीवरून खाली आली अन एका सैनिकाला हळूच विचारणा केली. तेव्हा राजांचा हुकुम आहे, या घराला चुकुनही धक्का पोहचवायचा नाही. कारण या घराचा मालक काही महिन्यापूर्वीच वारला आहे. तो इमानी, प्रामाणिक आणि दानशूर होता. हे राजांनी सांगितले आहे, तेव्हा माते. आपण निर्धास्त रहा. आम्ही आहोत आपल्या रक्षणाला. त्या डच महिलेच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. जो महिलांची अब्रू राखतो तोच खरा राजा.
शिवाजीमहाराजांनी इतिहासतील लुट या शब्दाला वेगळा अर्थ दिला. लुट म्हटली की अंगावर काटे उभे राहतात. कापून काढायचे, कुणाचीही गय नाही. कोणतेही ठिकाण सोडल जात नाही. परधर्माची मंदिरेच काय साध्या मुक्या जनावराला देखील सोडले जात नाही. पण राजावर संस्कार जिजामातेने संस्कार घडविले होते. जिजामातेला वाटत होतं की आपला पुत्र रामासारखा, हनुमंतासारखा नि कृष्णासारखा व्हावा. राज्यातल्या स्त्रियांना त्याचा भावासारखा, मुलासारखा आधार वाटावा. शिवबांनी आपल्या रयतेसाठी,आपल्या फौजेसाठी, सख्यासोबत्यांसाठी आणि शत्रुसाठी देखील मातेच्या ममतेने, आईच्या कराराने जोपासले.
पण....हल्लीच्या किती आयांना आपल्या मुलामध्ये असे गुण यावेत असं वाटतं ....? हल्लीच्या मातांना आपलं पोर शाहरुखखान, सलमानखान अशा खानावळीत दाखल व्हावंस वाटत असेल तर ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
*अशोक भेके*
No comments:
Post a Comment