मुंबई शहरात १९६०-७० या कालावधीत शासन मुंबई शहरातील पांच व्यक्तींना justice of piece म्हणजे जे. पी. या पदाने गौरवित असत. या पदाला इतका मान होता की, ही पदविभूषित व्यक्ती कारागृहाच्या बाजूने जात असेल तर गुन्हेगाराची फाशी थांबविण्यात येत असे. इतक्या मानाचे पद तेही घोडपदेवच्या वाट्याला खेचून आणणारे सातवी पास असलेले, दूरच्या आणि जवळच्या स्नेहीजनाना त्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने भुरळ पडावी असे , त्यांना पाहिले की, आपसूकच कुणाच्याही मनातून ‘आपणही यांच्यासारखे व्हावे, यांच्यासारखे दिसावे’ ही आदराची भावना ओसंडून वाहत असे. विविधांगी प्रतिभेने केवळ घोडपदेवलाच नव्हे तर समोरच्याला हेवा वाटावे असे... पेहराव खादीचा सदरा, धोतर आणि कडक टोपी, नेत्याला शोभेल असा मध्यम बांधा .... प्रतिभासंपन्न व्यक्ती म्हणजे नि. रा. पवार
( जे पी ) पूर्ण नांव निवृत्ती राजाराम पवार ...
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे भागातील बांबवडे गावात जन्माला आलेले हे रत्न घोडपदेव मध्ये सन १९४७ मध्ये आले अन घोडपदेवच्या श्रमजीवी घटकांचे आधार बनले. कापड गिरणीत काम करीत कालांतराने राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे प्रतिनिधी नेमणूक झाली. १९६७ -१९६८ चा काळ असेल गिरण्यांवर संकट आले होते. एका मागून एकेक गिरण्या बंद पडायच्या मार्गावर होत्या. तेव्हा याच नि रा पवार यांनी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या माध्यमातून पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची भेट घेऊन कापड गिरण्या सरकारने ताब्यात घ्याव्यात असा प्रस्ताव ठेवला. इंदिराजींनी विचार करून या गिरणी ताब्यात घेण्याचे आदेश काढले. या विजयात नि रा पवारांचा सिंहाचा वाटा मानला गेला. म्हणून राष्ट्रीय मिल मजदूर संघाने त्यांना दहा वर्षासाठी व्यवस्थापकीय सचिव पद देऊन गौरविले. घोडपदेवच्या भूमीत अनेक नेते आले गेले पण आणणारे होते नि रा पवारच... यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार सोहळा बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करणारे नि रा पवार....
पूर्वी घोडपदेव इलाखा हा शिवडी तालुका अंतर्गत येत असे. या शिवडी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष अनेक वर्षे सांभाळले. शिवाय सतत या विधानसभा मतदारसंघातून निवडून जाणारे भाई भोसले असो वा वसंतराव हौशिंग असो ...यांच्या विजयात मेहनत नि रा पवारांची असायची. अनेक कार्यक्रम श्रीकापरेश्वर मंदिरावर बघायला मिळाले. सभा बघितल्या व्यासपीठावर मात्र घोडपदेवचे त्रिमुर्ती नि रा पवार, ल गो वाणी मास्तर आणि विश्वनाथराव वाबळे यांना पाहताना अभिमान वाटे. कापरेश्वर मंदिरावर कार्यक्रमापूर्वी यांची लगबग बघायला मिळत असे. यांनी कुणाच्या खांद्यावर कळत नकळत हात ठेवला तरी तो माणसाला आपण स्वप्नात तर नाहीत ना....! हळूच चिमटा काढून पाहायची गरज भासे. यांचा वरदहस्त म्हणजे श्रीमंतीत लोळण्यासारखा शुभार्शिवाद. विशेष म्हणजे यशवंतराव असो वा शरद पवार या सदगृहस्थाला नावानिशी ओळखत असत.
घोडपदेवच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात नि रा पवार यांच नामदार बाळासाहेब देसाई यांच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान समर्पित आहे. त्याचं मूल्यमापन करता येणे अशक्य आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आणि कृतीद्वारे घोडपदेव विभागात विकासाची गंगा आणण्यात नि रा पवार यांचा मोलाचा वाटा आहे .
घोडपदेव सार्वजनिक मंडळ पूर्वी एका खाजगी जागेत गणेशोत्सव साजरा करीत असे. तो खाजगी जागेत असावा असे सार्वमत होते पण कुणाची हिम्मत होत नव्हती. खाजगी जागेतून सार्वजनिक जागेत प्रस्थान करायचे होते १९६५ पासून अध्यक्षपदाची धुरा नि रा पवार सांभाळीत होते. त्या वेळी पुढाकार घेऊन आज गणेशोत्सव साजरा होत आहे तेथे हलविण्यात आला. त्यावेळची साधी सोपी गोष्ट नव्हती पण प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे उत्तम उदाहरण त्यावेळेस पहावयास मिळाले. १९८३ ला नि रा पवारांवर आकाश कोसळले. त्यांचे राजकीय गुरु नामदार बाळासाहेब देसाई त्यांना मागे ठेऊन स्वर्गवासी झाले अन नि रा पवार येथेच खचले. या नंतर ते आपल्या गांवी गेले. गावच्या राजकारणातही त्यांची इच्छा मेली होती त्यामुळे आपल्या परिवारासोबत एकटेच राहिले एकविसाव्या शतकाच्या प्रारंभाला त्यांनी देखील या जगाचा निरोप घेतला.
आमच्याकडे अनेक त्यांच्या आठवणी आहेत पण एक आपल्या पुढे कथन करण्यासारखी एक आहे . मंदिरावर नामदार बाळासाहेब देसाईंची सभा होती. सभेची आवड म्हणून आम्हीही त्या गर्दीत दाटीवाटीत बसलो होतो. तोबा गर्दी होती. बाळासाहेब उशिरा आले. तब्येत बरी नव्हती. अंगावर घोंगडी पांघरलेली... केवळ नि रा पवार यांच्या प्रेमाखातर ते आले होते भाषणास उभे राहिले थोडच बोलले...घोडपदेवच्या नागरिक बंधू भगिनी मातानो, तुमचे काही काम अडत असेल... नडत असेल... घाबरू नका मी आपल्या सेवेला ( नि रा पवार यांच्याकडे पाहत ) पाटणचा वाघ दिला आहे .त्यांना तुम्ही आपली सेवा सांगा... किती गौरवास्पद उदगार ...
हारुसिंग सोभराज चाळीत कधी येणे जाणे झाले तर त्या माडीवरच्या खोलीत आजही त्या रंगयाती बिछायतीवर बसलेले नि रा पवार ... समोर रसनेला चेतावणी देणाऱ्या पदार्थांची रेलचेल.. घरात... व्हरांड्यात गर्दी चित्र डोळ्यासमोर दिसून येते. मला अभिमान वाटतो या महान पुरुषाच्या सहवासात आपले काही क्षण कामी आलेत.
आताच्या पिढीला या माणसाबद्दल माहिती नसेल .. फार मोठी आसामी होती.
अशोक भेके
No comments:
Post a Comment