Saturday, September 8, 2018

चर्चेतील माणसं : पूर्णिमा शिंदे



आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत असतो....! घोडपदेव विभागात आणि घोडपदेव विभागावर प्रेम करणारी अनेक माणसं आहेत. ती संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या विभागाचे नांव रोषण करतात. पण आपणास ठाऊक नसते. अनेक आहेत त्यापैकी एक *पूर्णिमा शिंदे* ..... सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेले नांव. आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्र आणि विविध चँनेलवर मंद आणि तीव्र विचारसंपत्ती, वाद कौशल्याची जोड असलेले हरतऱ्हेचे विषय समयसूचकता दर्शवित जनतेच्या भावनांना कोमलतेने स्पर्श करीत किंवा गुदगुदल्या करीत आपल्या समाजाची बाजू मांडण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समिती सदस्य या नात्याने आक्रमक रणरागिणी आपण पाहिली असेलच. कालच अमरदीप फौंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांच्या योगदानाबद्दल विशेष पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ICON या कंपनीने पूर्णिमा शिंदे यांच्या आवाजातील *चला शिकू सारे* यातील सहा गाण्यांची WORLD WILD या कंपनीला  MOBILE रिंग टोन, कॉलर टोन यासाठी देऊ केली आहेत. किती कौतुकास्पद बाब आहे. *आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत असतो....!*
*पूर्णिमा शिंदे* याचा जन्म ४ फेब्रुवारी १९७३ साली श्री सुभाष शिंदे आणि सौ. सुनीताताई शिंदे राजकीय आणि सहकार क्षेत्रात वावरणाऱ्या आसामींच्या घरात झाला. एम ए बी एड शिक्षण पर्यंत शिक्षण घेतले.काव्यलेखन, समाजसेवा, अध्यापन, वक्तृत्व,लेखन, नाट्यलेखन, नाट्य दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन  या मध्ये छंद असल्यामुळे त्यात विशेष लक्ष घातले. अनेक विविध संस्थावर त्या पदाधिकारी आहेत. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, कौतुकास्पद आहे. समाजात असलेले ज्वलंत सामाजिक प्रश्नांना समजावून सांगण्याची कला सर्वांकडे असते, असे नाही. पण पूर्णिमा शिंदे यानां दैवी देणगी लाभली आहे. अभिरुची अत्यंत उच्च यात यत्किंचितही संशय नाही. काही प्रसंगी अपयश आले पण जिद्दीने उभ्या राहत आपल्या भावनांना वाट मोकळी करू देत राहिल्या.
१)   *चैत्रपालवी*, *स्वप्नझुला*  *समर्पण* आणि हिंदी उर्दू संमिश्र असा *आशियाना प्यार का* दर्जेदार काव्यसंग्रह प्रकाशित केले.
२)   बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षा अभियानात कार्यरत मुलींचे शिक्षण लिंग समभाव या उपक्रमासाठी १४० घोषवाक्य निर्मिती केली. विशेष म्हणजे त्यांनी सर्व शिक्षा अभियान या पुस्तकाच्या पृष्ठावर त्यांनी निर्माण केलेले पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांचे छायाचित्र आणि संदेश असलेली संकल्पनेचे तात्कालीन महापौर श्री दत्ता दळवी यांनी विशेष कौतुक केले होते.
३)   अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमासाठी ४० घोषवाक्य निर्मिती
४)   मुलामुलींचे समाज प्रबोधन आणि स्त्री उध्दार अशा विषयावर स्वरचित सुप्रसिध्द श्री प्रदीप भिडे सूत्रसंचालन असलेली उत्तरा केळकर त्यागराज खाडिलकर यांच्या सुमधुर आवाज व विविध पारंपारिक चालीत *चला शिकू या सारे* हि ध्वनिफित सर्वत्र गाजली.
५)   व्यसनमुक्ती हुंडा बंदी, स्त्री अत्याचार आदि विषयावर वृत्तपत्रातून लेखन करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
६)   निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी विविध प्रकारे पर्यावरण विषयक पथनाट्य निर्मिती केली.
७)   १५ समाजसुधारकांवर आधारीत नाट्यलेखन, सूत्रसंचालन करीत त्यांच्या योगादान घराघरापर्यंत पोहचविले.
८)   महिलांचे आरोग्य आणि महत्व, महिला सक्षमीकरण, स्त्री विषयक जाणीव आणि जागृती, सावित्री एक तेजस्विनी असे अनेक विषय हाताळीत योगदान दिले आहेत.
या सामाजिक कार्याची नोंद अनेक संस्थानी घेत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यापैकी महाराष्ट्र साहित्य कला गौरव पुरस्कार, राजश्री शाहू महाराज पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार,आचार्य अत्रे पुरस्कार, कालनिर्णय पुरस्कार, रयत महासंघ पुरस्कार असे अनेक आहेत. यादी लांबलचक असली तरी त्यांचा सन्मान हा आपलाच सन्मान. जनमनासाठी असलेली तळमळ त्यातून स्व:तला मिळालेला आनंद, त्यातून चेहऱ्यावर उमटणारे स्मितहास्य हे सर्वाधिक मिळालेल्या पुरस्कारापेक्षाही अधिक मौल्यवान आहेत. त्यांना घोडपदेव समुहाकडून खूप खूप शुभेच्छा....!


अशोक भेके

No comments:

Post a Comment