घोडपदेव मधील अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळी. पूर्वेला घोडपदेव मंदिर तर पश्चिमेला मारुती, दक्षिणेला बजरंगबली तर उत्तरेला शिवशंभो संरक्षक म्हणून स्थानापन्न आहेत आणि यामध्ये आपले जागृत देवस्थान श्रीकापरीबाबाचे मंदिर होय. सभोवताली काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात. सर्वजाती जमाती आहेच शिवाय पुणेरी, सातारी, कोल्हापुरी, कोकणी आदि सर्वच जिल्ह्यातील ही म्हटली तर देवमाणसे आहेत, नाहीतर सिधी-साधी महापुरुष वजा अगडपगड माणसे. विश्वात्म्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार, त्यामुळे त्यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसात लसणाची किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, पोळा उसळ, सपक सांबार किंवा झणझणीत कालवण, कडू बाजरीच्या किंवा गोड ज्वारीच्या भाकरी, नाक्यावरची तिखट शेवपुरी असो वा वडापाव... लज्जतदार मिठाई किंवा तो मालपोवा या प्रमाणे सर्वच गुण आमच्या माणसात दिसून येतात. अरे कारे एकेरीपणाचे बोल अन डोळे वटारून उग्रट वाटणारे आणि थोरामोठ्यांची इज्जत करणारे हळव्या मनाचे आपुलकी प्रकट करणारे गुणदेखील ठासून भरलेले आहेत. माणूस जन्मत:च असाच असतो असे नव्हे तर त्याला इथल्या मातीत जीव वेडावणारे आणि जीव लावणारे कडूगोड संस्कार एकत्रितरीत्या मिळालेले आहेत का ...!
पण एक काळ असा होता की, महादुशेठच्या हॉटेलातून मालपोवा किंवा पोळा उसळ खाल्याशिवाय दिवस सुरु होत नव्हता. दुध फाफडा आणि जिलेबी ही गिरणी कामगाराचे आवडते खाद्य. गरीबी होती आणि तेव्हा स्वस्ताई देखील पाहिली. शेणाँय नावाचा यांची लज्जतदार आणि गरमागरम साबुदाणा वडा, बटाटा वडा आणि झकास चटणी खाण्याकरिता जीव गुंतायचा. फायद्यासाठी धंदा केला नाही. आपल्या माणसांना जपणारी पिढी पाहिली. घोडपदेवचं नांव भल्याभल्यांनी घेतलेले आहे. शाहीर दादा कोंडके आपल्या लावणीतून वर्णन करतात तर आचार्य अत्रे आम्हांला अग्रलेखातून घोडपदेवचा पोळ म्हणून हिणवतात. चंद्रवदन, काळापहाड रहस्यकथेत आमचं नांव घेतल्याशिवाय काही सुचत नव्हते.
घोडपदेवच्या आज अस्तित्वात नसलेल्या चाळीवर प्रकाशझोत टाकला तर एक मनात भरलेली चाळ म्हणजे घोडपदेव नाक्यावरची राजू कामाठी चाळ. घोडपदेवची पहारेकरी. चाळीतल्या मजल्यावर उभं राहावं आणि संपूर्ण परिसर न्याहाळत राहावा. कुठे काय घडलं हे मजल्याला पहिले कळायचे. बुवा चाळ म्हणजे त्याकाळाचा नयनमनोहर नमुना. या चाळीत प्रांतानुसार विभागणी आढळत असे. अलीकडे घाटावरचे तर मागे कोकणातले. त्यात येथे सातारचे बैठकीचे गाळे अधिक प्रमाणात होते. आज मोकळ्या असलेल्या भूखंडावर बाबू गेनू नगरच्या चाळी होत्या. त्यांचे स्थलांतर इमारतीत झाले. भव्य चाळी अन ती भव्य घरे.... होती १०* १२ ची, पण अनेक कुटुंब सामावली जात होती. पेटीवाला चाळ उभी पुणेरी ढंगाची चाळ. या चाळीला पेटीवाला का नांव पडले असावे, ठाऊक नाही. खोजा चाळ ही बुवा चाळी प्रमाणेच. येथे सामुदायिक मशेरी लावण्याचे ठिकाण बघायला मिळायचे. भिकीबिडी चाळ म्हणजे पक्का कोकण प्रांत. हिरजी भोजराज चाळ, जाफरभाई कानजी चाळ, चुनीलाल कंपाऊड, गांधीनगर इतिहास जमा झाल्या. पण या चाळी आजच्या बहुमजली इमारतींना भारी होत्या. येथे माणुसकी नांदत होती. माणूस येथे उपाशी झोपत नव्हता. एकदिलाने माणसं एकमेकांना सांभाळून घेत होती.
इथली सर्व माणसेच बहुगुणी आणि बहुमोली ! कलावंतही आहेत अन कलेची कदर करणारे आहेत. राजकारणी देखील आहेत अन राजकीय विश्लेषक देखील आहेत.कृष्णही आहेत आणि सुदामा देखील आहेत. डोक्यावर पिकलेले असो वा कंबरेत वाकलेला गडी असो पण अखेरपर्यंत तो ताठ कण्याने जगत असतो. ती लहाणपणी जशी असतात तशीच मोठेपणीही दिसतात, किंबहुना तशीच राहतात. फक्त त्यांच्या गुणात वाढ होते. अनुभवाचे ओझे घेऊन वावरत असतात. पाहुण्यारावळ्याचा आब राखतात म्हणून राबता देखील असतो. घोडपदेवचा माणूस वसई विरार रेल्वे प्रवास करणाऱ्यासारखा बेरकी तर नाही, कल्याणवासियाप्रमाणे घड्याळाच्या काट्यावर चालणारा नाही, ठाणेकरांसारखा रांगडाही नाही. पार्लेकरांसारखा गोष्टीवेल्हाळ नाही, डोंबिवलीकरांसारखा तोऱ्यात चालणारा देखील नाही, नव्यामुंबईकराप्रमाणे शीघ्रसंतुष्टीदेखील नाही. तो नेमका कसा आहे, हे सांगणे म्हणजे झाडावरची पानसंख्या मोजण्यासारखे क्लिष्ट काम आहे.लेखक नेहमी उडत्या पाखराच्या पिसांचे उदाहरण देतात. परंतु झाडावरची पाने हा घोडपदेवकरांचा मनपसंत विषय. घराच्या बाहेर तुळस वृंदावन येथे नसते. असते ती कुंडी. त्यात पाणी घालून घालून प्रेम करणारी आमची माणसं. वरवर भोळसट असेल पण व्यवहारचातुर्यात बाप आहे.
इथला माणूस फणसाच्या गऱ्यासारखा...! तो बाह्यांगी ओबडधोबड.. काहीसा काटेरी वाटतो. पण आतून मात्र मधाळ, अवीट गोडीचा, तोंडात घातले की, विरघळणारा, स्वत:ची वेगळीच चव जिभेवर रेंगाळत ठेवणारा, हवाबंद बरणीत ठेवला तर कित्येक दिवस टिकणारा, पोटभर खाणारा आणि पुरवून पुरवून खाणारा.... हा रसाळ फणस आयुष्यभर उन्हातानात उभे राहून आपल्या देहाचा गुलमोहर फुलवून त्याची शांत शीतल छाया दुसऱ्याला देणारा… माझा माणूस म्हणजे घोडपदेवची माणसे. गप्पिष्ट माणसं अमृततुल्य चहावर अंमळ जास्त ठेऊन जगतात तर मितभाषी काखेत पुस्तक घालून जेथे वेळ मिळेल तेथे वाचनालय सुरु करतात. अनेकांची बारसे जेवलेली ही मनमिळाऊ माणसे सर्वच विषयावर अधिकारवाणीने बोलत असतात. या माणसाना कधीही ‘कसे आहात तुम्ही...!’ एक उत्तर ठरलेले आहेच. ‘काही नाही, मस्त निवांत आहे ...!’ हे ठोकळेबाज उत्तर इथल्या संवादाचा मूळ गाभा आहे.दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीच्या वेळी घोडपदेवच्या नाक्यावर सोडियम व्हेपरच्या फिकट पिवळसर उजेडाखाली हाताची घडी घालून, अधून मधून पोट किंवा डोके खाजवत ओशाळलेल्या चेहऱ्यातील ज्येष्ठांना असा प्रश्न विचारला तर ते अगदी आरामात पोटावरून वा खरमूडया गालावरून वा दाढीच्या वाढलेल्या खुंटावरून हात फिरवीत ‘निवांत’ उत्तर देणार !!
इथली तरुण मंडळी तर रस्त्याचा वापर विमानतळाच्या धावपट्टीप्रमाणे करताना दिसतील आणि चुकून कुणाला धक्का लागलाच तर सौजन्याची मूर्ती दिसून येतात. हल्ली एक बरे दिसत आहे.महिलावर्ग दुचाकीचा वापर करू लागले आहेत. भाजी खरेदीसाठी असो वा मुलांना शाळेत ने आण करताना दिसतात किंबहुना बऱ्याच कामाचा पुरुषी भार उचलला आहे, पण त्यांच्यामुळे चप्पलांच्या दुकानांना तेजी आलेली आहे. विशेषत: आपले तरुण आईबापावर जेवढे प्रेम करतात तेवढेच प्रेम आपल्या बायकोवर करतात. त्यात कमी अधिक प्रमाण आढळत नाही.मुलाबाळांचे हवे तेवढे कोडकौतुक करणारे आहेत.तर बायकोने हॉटेलात जाऊन काही तरी खाऊ असा विषय काढताच राणीबागच्या पाणीपुरीवाल्याच्या ठेल्यावर कशी मस्त, चविष्ट पाणीपुरी मिळते हे पटवून पटवून सांगणारे आपल्या खिश्याला काटकसर कशी करायची हे सुचवितात. कुठे बाहेरगावी गेले तरी जीव घरी ठेऊन जाणारी माणसं येथेच आढळतात. कापरेश्वर महाराजांच्या मंदिरात भक्तिभावाने डोळे मिटणारे, नवरात्रीत अनवाणी पायाने उपवास करीत भल्यापहाटे महालक्ष्मीच्या दर्शनाला चालत जाणारे, स्वत:पेक्षा जगाची काळजी करणारे, शेजारी-पाजारी मयत झाले तर आपल्याच घरातले कोणीतरी गेले या भावनेतून ओले डोळे पुसणारे, ओलेत्या डोळ्यांनी अन गदगदनाऱ्या मनानी दु:खिताच्या खांद्यावर आधाराचा हात टाकणारी मायेची माणसं माझ्या घोडपदेव मध्ये आढळतात.
मी अशी माणसं पाहिली की, मनमोकळ्या स्वभावाची, हळव्या मनाची आहेत. शांत स्वभावाची असतात. प्रसंगी वज्राहून कठीण होणारे तर कधी मेणाहून मऊ दिसणारे, परंतु त्यांना कधी भडकलेले पाहिले की ज्वालामुखीतला धगधगता लाव्हा बाहेर पडत आहे, असे क्षणभर वाटते. पण आपल्या माणसांचे वय कितीही असो पण सदानकदा ते हिरवट दिसतात. नाही ते हिरवट बनून राहतात. वरातीत वा मिरवणुकीत देहभान हरपून नाचणाऱ्या लेकाचं कौतुक गर्दीत उभा असणारा बाप ‘ तो माझा मुलगा आहे.’ किती कौतुकाने सांगत असतो. इथल्या हिरवट म्हाताऱ्याच्या मनगटात रग आणि ओठात जरब असते. वेळप्रसंगी सगळी आयुधे गुंडाळून पांढरे निशाण फडकवीत समजावणीचा सूर आळवितो.जगतात मात्र बुध्दिबळातल्या वजीरासारखी... बादशहाला किंवा राजाला भीती वजिराची असते म्हणून भलेभले पंगा घेत नाहीत.
घोडपदेवच्या मातीवर प्रेम करणारा अन मातीत पाय रोवून आकाशाला गवसणी घालण्याचे लक्ष्य ठेवणारा घोडपदेवचा माणूस सर्वासाठी *आयडॉल* राहिला आहे. माझा माणूस कुठेही गेला... दौऱ्यावर असलातरी त्याची एकच इच्छा असते की, *‘इथल्या मातीतच शेवटचा दिस गोड व्हावा......!’*
*अशोक भेके*
*घोडपदेव विषयावर लेख काही त्रुटी राहिल्या असतील आणि आपल्या
मनात असतील तर माझ्याशी अवश्य शेअर करा*
No comments:
Post a Comment