Tuesday, September 11, 2018

*मंद घोडे आणि अंध स्वार .....!*





  एका चाळीत दोन मित्र राहत होते. *सुभानराव आणि सुनाजीराव*. काचेच्या घरावर दगड फेकला तर त्याची कांच फुटेल पण या दोघांची मैत्री न तुटणारी. नजर लागावी अशी मैत्री. मैत्री म्हणजे आधारवड... मैत्री म्हणजे खाण सुवर्णाची... मैत्री म्हणजे सोबत चालणे.... सोबतच जगणे...कधी न संपणारी वाट... कधीही न संपणाऱ्या गप्पा... कुणाला काही मदत लागत असेल तर ते धावायचे. या जोडीकडे आपुलकीने लोक पाहत. त्यांची चाळही पुनर्विकासाच्या वाटेवरची. कोणी विकासक आला अन मैत्रीच्या भूमीत वैरत्वाच बीज पेरून मोकळा झाला. या जोडीला असं वेगळे केले की, इतिहासातील संताजी धनाजीचा प्रसंग आठवतो. विकासकाच्या पैश्याला *सुनाजीराव* भुलला. त्याला स्वप्न पडू लागली, श्रीमंतीची.. सुबत्तेची... मुलांच्या प्रगतीची.... घराच्या आकाराची... चारचाकी गाड्यांची... दागिन्याची...! *सुभानराव* मात्र आपल्या चाळकरी बांधवाच्या सोबत राहिला पण त्याच्या सोबत नाममात्रच राहिले. पुनर्विकासात सखा भाऊ सोबत राहत नाही, हे तर चाळकरी. काही लाखासाठी लाखमोलाची माणसं गमावणारी पुनर्विकास पद्धत म्हणजे *विकासक हस्तकांचे* चरण्याचे कुरण. त्यांच्या हव्यासापोटी चाळकरी बांधवाना आंधळे करून विकासकाच्या मंद घोड्यावर स्वार केले आहे. घोड्यासहीत चाळकरी बांधवाना विकासकाच्या दावणीला बांधून आपल्या स्वप्नांचे इमले उभे करण्याचा मानस जे करतात त्यांचा कधी विकास होत नाही आणि होणार नाही. यामुळे तरुण पिढी आयत्या पैश्यामुळे एकच प्याल्याच्या अधीन होत चालली आहे. कोणी पत्याच्या डावावर रम आणि रमीमध्ये रंगलेले आहेत. वरकरणी यांत काही चुकीचे आहे, हे छातीठोक पणे सांगणार नाही कारण यामध्ये तथ्य आहे. चाळीचाळीत सुभानराव आणि सुनाजीराव दिसून येतील. 
                                  www.punynagariwww.prahar.inआजही अनेक चाळी आहेत. पुनर्विकासाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या पुनर्विकास होणे फार गरजेचे आहे. तो व्हावा ही श्रीची इच्छा. आता प्रश्न असा आहे की, काही *अलबत्ते गलबत्ते* लोकांना हा विकास हवा आहे की, नको आहे. हेच मुळात कळत नाही. विकासक आणणारे तेच आणि बदलाचे वारे आणणारे तेच. एखादा विकासक थोडंफार अधिक देत असेल तर त्याची तळी उचलून मोकळे होतात. काही ठिकाणी या पुनर्विकास कमिटीमध्ये स्थान मिळावे म्हणून आटापिटा असतो. स्थान नाही मिळाले तर पुनर्विकासाला विरोध करणे हा एकमेव अजंठा असतो. काडीचं ज्ञान नाही पण ३३(७ ) आणि ३३ (९) म्हणजे यांनीच बनविलेले कायदे की काय असा प्रश्न मनात निर्माण होतो. यांच्या सभेमध्ये यांच्या भाषणाचा इतिवृत्तांत यावर विनोदी नाटक सिनेमे निघू शकतील. हे पुनर्विकासाचे भूत आल्या पासून जो पुढे धावतो त्याकडे संशयाने पाहतात. कारणही तसे आहे तो विकासक त्याच्या जाणाऱ्याला तुमचं पँकेज हा प्रश्न विचारतो अन त्याच्या आशा पल्लवित करतो. मग त्या पुढे धावणाऱ्याने पैसे न घेतले तरी तो संशयाचा मारेकरी ठरतो. आपल्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक जीवनात सामान्य कुवतीच्या लोकांची चलती आहे. सर्वत्र नुसते काजवे चमचमतांना दिसत आहेत. आपण कोणतीही निवड डोकी मोजून करीत आहोत. त्या डोक्याच्या आंतमध्ये काय चाललंय, काय करण्याची क्षमता आहे. त्यांचा कस, विद्वत्ता आणि सामाजिक व्यासंगाची पुंजी त्यांच्याकडे आहे का ....? हे मुळी आपण पाहत नाही. त्यांच्या भेदक नजरा म्हणजे त्यांना कोणी आशाळभूत नजरेने प्रश्न विचारता कामा नये.
काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वत:च्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऐकायची किंवा स्विकारायची नसते. मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे लोक शोधून त्यांच्याशी मैत्री करतात. आणि त्यांना वाटते की हे सगळे जग फक्त आपल्याच विचारधारेनुसार चालते. हे पाहिले किंवा ऐकले तरी त्यांच्या करंटेपणाची कींव करावीशी वाटते.
विभागवार अनेक चाळी होत्या आणि आजही आहेत. प्रत्येक चाळीवर लिहिण्यासारखे आहे. कशा होत्या चाळी आणि चाळीतील माणसं. ती चाळ संस्कृती लयास चालली आहे. खरं आहे त्या छोट्याश्या कोंडवाड्यात राहण्यातली मजा गेली. त्या चाळीतच मी पण मोठा झालो. ते माझं बालपण आजही आठवतंय. चाळीतल्या संस्काराची शिदोरी घेऊनच मोठा झालो.त्याच शिदोरीच्या जोरावर आयुष्याला आकार देत देत पुढे चाललो आहे. पण मी त्या गतकाळातल्या वैभवाला विसरलो नाही.आणि विसरणार नाही. निखळ प्रेम देणाऱ्या चाळी. त्या प्रेमाने आम्ही एकमेकांशी बांधले गेलो होतो.चाळ म्हणजे श्रीमंतीचं दर्शन नव्हतं पण चाळीत राहणारी माणसं स्वभावाने श्रीमंत होती. वेळी अवेळी एकमेकांच्या मदतीला धावून जात असत. एक घास पोटाला कमी खायची पण आपल्या ताटातला अर्धा घास तरी त्या गरजूला समर्पित करीत. कपबश्यापासून कपड्यांपर्यंत, मिरची मिठ मसाल्या पासून कडधान्याची उसनवारीचे व्यवहार होत असे. कोणत्याही वेळी, कोणाकडेही जा, कोणाचीही हरकत नसायची आणि कोणाची प्रायव्हसी बाधित होत नसे. मल्हारी मार्तंडाची तळी उचलण्यापासून घराघरातल्या आरत्यामध्ये सहभागी होणारे चाळकरी... कोण कुठल्या गावाचे... कोण कुठल्या जातीचे वा समाजाचे...! कोणी कधी पाहिले नाही. सारे काही सार्वजनिकच. एका वाड्यात राहणारे असंख्य नातलगच. भांड्याला भांड लागले आवाज होतो. तेच आमच्या सार्वजनिक नळावर व्हायचं. पण तात्पुरते असायचं. सार्वजनिक संडासावर सकाळी सकाळी रांग असायची. कोण किती वेळ घेतो....! मग त्याच्या मागे आपला नंबर नको. म्हणून दुसऱ्या ठिकाणी वळणारे....! आपले समजदार चाळकरी. विशेष म्हणजे चाळीमध्ये सामुदायिक दंतमंजन म्हणजे मशेरी लावीत गप्पा झोडण्याचा कार्यक्रम पाहायला मिळत असे. गल्लीपासून दिल्ली पर्यंतच्या त्या गप्पा ऐकून आमचे सामान्य ज्ञान वाढीस लागले. मला सुसज्ज इमारतीत कडीबंद घरात राहणाऱ्याविषयी मनात आकस नाही. बुद्धीजीवी आणि श्रमजीवी हे दोन गट आहेत त्यापैकी बहुतांशी आजही आपले जीवन चाळीत व्यतित करीत आहे. 
               मुंबई शहरात काही विभागात त्यांच्या चाळी पुनर्विकासाला गेल्या. आज पंधरा सोळा वर्षे झाले तरी पुनर्विकास होत नाही. विकासक घरभाडेकरून हक्क घेऊन बसला आहे. विकासक आता तोच तुमचा त्राता. घरभाडेकरू आजही वाऱ्यावर आहेत. त्यातील किती तरी माणसं आपल्या नव्या घराची स्वप्न पाहत स्वर्गवासी झाले.तर काही आभाळाला हात लावून परतत आहेत. त्यांना त्यांचं नवं घर पाहून जीवनसांगता करायची आहे. सर्व ठिकाणी तेच सुरु आहे. याला कारणीभूत कोण........? विकासकाच्या मंद घोड्यावर अंध स्वार झाले असले तरी जेव्हा त्यांचे आंधळ्यापणाचा पडदा पूर्णत: दूर होईल तो मंगलदिन पाहण्याचे भाग्य सर्वाना लाभेल.

*अशोक भेके*

No comments:

Post a Comment