Sunday, September 16, 2018

श्रमिकांचा मितवा : शांताराम ढगे




                      समुद्राच्या पोटात खोल कुठेतरी भूकंप व्हावा आणि त्सुनामीच्या लाटेत दूरचं एखादं बेट  उध्वस्त व्हावं तशी अचानक *शांताराम ढगे*नी या जगातून एक्झिट घेतल्याची बातमी कानावर आदळली. वाईट वाटलं मनाला. नव्वदीच्या उंबरठ्यावर या चांगल्या माणसाला देवाज्ञा आली. आयुष्य पूर्ण जगले. अनेकांना दु:ख झाले. त्यात आमच्या समूहाने अधिक तीव्रता दर्शविली. शिंपल्यात शिरलेल्या वाळूच्या कणाभोवती त्या शिंपल्यातील जीव मोती घडवितो. त्याप्रमाणे *शांताराम ढगे* यांच्या छत्रछायेत ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला. त्याला मोती बनविण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. श्रमिकांचा वाटाड्या म्हणून त्यांनी काम केले. सुयोग्य वळणावर कामगार कसा चालेल हे सर्वार्थाने पाहिले. रोजगार मिळवून दिला. पोटापाण्याला लावले. कितीतरी जणांच्या चुली सुव्यवस्थित पणे सुरु ठेवण्यात मोलाचे कार्य केले आहे.
          *शांताराम ढगे...*  एक नावाजलेले नांव. लाघवी स्वभाव. आकर्षक आणि बुद्धिमत्तेची छाप पाडणारे दिलखुलास व्यक्तिमत्व.त्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या गिरणी कामगारांचा घोडपदेव परिसराचा महानायक. कॉंग्रेसचा कार्यकर्ता.खादी सदरा लेंगा आणि वर खादीचं जँकेट घालून लवचिकपणे काही आघात झेलत घोडपदेव परगण्यात श्रमिकांच्या गोतावळ्यात वावरणारा या माणसाने रस्त्याने समोरून जाताना आपल्याकडे प्रेमादर नजरेने पाहिले तरी घास पोटात गेल्यावर तृप्ती लाभते त्याप्रमाणे काही तरी व्हायचं. शोलेतील गब्बरच्या डायलॉगप्रमाणे घराघरात आईवडील आपल्या मुलांना धमकावून सांगत शाळा शिक..... नाहीतर ढगेना सांगून गिरणीत कामाला लावील.....!  म्हणजे घराघरात ढगे यांचे कार्य पोहचलेले होते. केवळ गिरणी कामगारांचे  नव्हे तर लोकांचा नेता म्हणून ते परिचित होते. अंतरंगी आनंदी असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास स्मित नेहमीच म्हणजे कामगारांविषयी सतत कळवळा असे. ढगे आणि गिरणी कामगारांचे एक परिपक्व  नातं होतं. कामगारतिढा सोडविण्यात खुला संवाद आणि मळभ दूर करण्यात माहीर असलेल्या ढगे यांचं गिरणी कामगारांसाठी असलेले योगदान उल्लेखनीय आहे. दडपशाहीला कधी जुमानले नाही. प्रगल्भतेच्या वाटेवर पाय घट्ट रोवून कामगारांसाठी उभे ठाकले. मफतलालचे कामगारच नव्हे तर मालकवर्ग  आजही त्यांचं नांव अदबीने घेतात. राष्ट्रीय मिल मजदूर संघात काम करताना अनेक कामगारविषयी धोरणांचा पाठपुरावा करून श्रमिकांचे भले चिंतणाऱ्या या  नेत्यास श्री.शरद पवारांनी एके दिवशी उपाध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसविले. त्या संघाच्या इमारतीत त्यांना भली मोठी केबिन होती. सतत व्यापात, पण थकवा कधी चेहऱ्यावर दिसला नाही. इतके ते  श्रमिक जीवनाशी समरस झाले  होते.
                   मला चांगले आठवतेय, कामगार चळवळीतील अग्निबिंदू समजला जाणारा मुंबईतील ऐतिहासिक ८२ च्या संपाच्या ज्वाला सर्वत्र भडकत असताना शांताराम ढगे यांनी मफतलाल गिरणी सुरु ठेवली होती. कामगारांना आंतमध्ये ठेऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था चौकसपणे राबविली गेली.  ७२ च्या दुष्काळात होरपळलेल्या कामगारांना *सुकडी* वाटप करण्याचे कार्य यांच्याच प्रेरणेने घडले होते. एकीकडे सहकार चळवळ फोफावत गेली पण कामगार चळवळीचा विस्तार धूसर होत गेला. सिंहासन चित्रपटात डिकास्टां नावाचा कामगार नेता एका प्रसंगात म्हणतो. ‘........ *तर मी मुख्यमंत्र्यांना जोड्याने मारील !’*  खरंचं तो काळ म्हणजे कामगार नेत्याचा दरारा होता.शांताराम ढगे यांच्या शब्दात ताकद होती. एखादे काम त्यांच्या मुखातून वदले गेले अन ते झाले नाही, असं कधी घडले नाही. मी नेता जेव्हा असेल जेव्हा माझा कामगार सुखी असेल. ही भावना जोपासणारी  ती प्रसन्न मूर्ती आज आपल्यात सोडून गेली असली तरी  त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्या हृदयात तेवत राहतील.


अशोक भेके

                

No comments:

Post a Comment