उपरोक्त संस्थेचा द्वितीय वर्धापनदिन आज अगदी थाटामाटात होत आहे. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन एक चांगल्या उपक्रमाचे रोप लावले , आता वाढीस लागले आहे. लवकरच त्याचा वृक्ष होईल, यात तिळमात्र शंका नाही. *घोडपदेव समूह* अशा ज्येष्ठ मंडळीचा नित्य आदर करीत आली आहे आणि यापुढे देखील करीत राहील. या वरिष्ठांकडे अनुभवाची इतकी दौलत आहे की, काय घेऊ आणि काय नको, असेच वाटते. यांच्या झोळीतून घेतल्याने त्यांचे कमी होत नाही पण त्यातले शाब्दिक सौदर्य आणि विचार श्रीमंतीमुळे आपण देखील वर्तमानातले सुभेदार नक्कीच होत आलो आहोत. आचार विचार हे त्यांच्याकडून घेतल्याने आजची पिढी सुसंस्कारी झालेली दिसेल. आता सर्वांच्या बाबतीत म्हणता येत नाही. पण जे ज्येष्ठांना देवत्व बहाल करतात. त्यांना नक्कीच अनुभव आले असतील. अनुभव स्वीकृती हा एक छंद आहे. तो कसा जोपासायचा... हे ज्याचे त्याच्यावर निर्भर असते. ज्येष्ठांशी स्नेहाची हितगुज म्हणजे ईश्वराला वंदन केल्यामुळे ऐश्वर्य लाभते, असे म्हणतात. परंतु ते सत्य आहे हे मानायला आजची पिढी तितकीशी उत्सुक नसेल.
ज्येष्ठांचे प्रश्न व चिंता या विशिष्ट धोरणात्मक बाबींसाठी निर्माण झालेल्या संघटनेला अद्याप समाजाचे म्हणावे तसे बळ मिळत नाही, हे खेदाने म्हणावे लागेल. महाराष्ट्रात एकूण ४५०० ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत. त्यांच्या डोक्यावर स्थानिक नेत्यांनी दानी पुरुषांनी छप्पर दिले आहे. सांज सकाळ मजेत बसतात. गप्पा मारीत असतात. येथे मात्र तसे घडलेले दिसत नाही. दुर्लक्षित परिस्थितीत सुखाचे व आनंदाचे जीवन देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काही करायला हवेच. आश्वासनाची खैरात ऐकायला मिळेल.पण त्यांच्यासारखे आपण एकदिवस होऊ आणि त्यांच्यात बसायला जाऊ तेव्हा मनाला वेदना होतील. अरेरे यांच्यासाठी आपण केले असते तर......! आंध्र प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली मध्ये या राज्यामध्ये ज्येष्ठांना आदराचे स्थान आहे. तेथे १८०० ते २००० इतकी पेन्शन दिली जाते. पण आपल्या राज्यात केवळ ६०० ते १००० इतकी पेन्शन देऊन तोंडाला पाने पुसली जातात. ज्येष्ठ मंडळीमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असते. त्यांना आसऱ्याची गरज असते. मंदिराला आधार समजतात. महाराष्ट्रात एकूण परिस्थिती पाहता ५०% पेक्षा अधिक महिला आहेत. वार्धक्यामुळे पती साथ सोडून गेल्यानंतर त्या विधवेचे जीवन जगत असतात. पाठीशी संपत्ती नसते. त्यांना प्रेम हवे असते. माया अपेक्षित असते.
एक गृहस्थ आपल्यात वावरताहेत. त्यांना गुडघेदु:खी मुळे चालता येत नाही. घरातून नाक्यापर्यंत कसेबसे काठी टेकवीत येतात. इलाज करायला पैसे नाहीत. मिळालेले धन त्यांनी आपल्या कुटुंबियासाठी खर्च केले. त्यांना आता ८०० रुपये पेन्शनवर कसंबसं जगायचे आहे. अजून जगायची इच्छा आहे, पण परिस्थतीमुळे रुग्णालयात फेरे मारणे देखील परवडत नाही. संघटना यासाठी जन्माला येते त्यांना अशा घटनाना सामोरे जाता यावे म्हणून... त्यांच्या समस्यावर मात करण्यासाठी, सोयी सुविधा देण्यासाठी घोडपदेव मध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना कार्य करायला अवतरली आहे.
एका ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेत काही दिवसापूर्वी सहज गेलो होतो. बरीच मंडळी बाकावर बसली होती. एक आजीबाई डोळे पुसित काहीतरी शेजारी बसलेल्या बाईंना काहीतरी सांगत होत्या. काय सांगत असतील... रडत का असाव्यात. मी नवखा होतो. पण त्यांची समस्या जाणून घ्यायची तीव्र इच्छा मनाला लागून राहिली होती. एका ज्येष्ठाला विचारले तेव्हा कळले, मुलगा घरदार विकून परदेशात गेला. जाताना त्याने आपल्या जन्मदात्रीला रेल्वेस्टेशनवर सोडून गेला. त्या संस्थेने आजीबाईला आसरा दिला होता. वाईट वाटले. पण त्या आधार देणाऱ्या संस्थेविषयी मनात प्रेम भरून आले. संस्थेत काम करणारी मंडळीमध्ये प्रत्येक क्षेत्रातील घटक होता. आपल्यापरीने ज्येष्ठांच्या समस्या निवारण करीत होते.
*ज्या सभेत वृध्द नसतील ती सभा होऊ शकत नाही. जे धर्म सांगत नाहीत ते वृध्दच नाहीत....* असा वृद्धांचा गौरव महाभारतात वाचायला मिळतो. *घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती...* हा सुविचार भिंतीवर शोभून दिसतो. मुळात चार दिशेला तोंड असलेल्या श्रमजीवी मध्यवर्गीय समाजातील अनुभवाच्या महासागराना एकत्रित आणण्याचे सुयोग्य कार्य घोडपदेव ज्येष्ठ नागरिक संघ यांनी केले आहे. करीत आहेत. सध्या सभासदांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे क्षण साजरे करीत आहे. त्यांना द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आणि पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी हा प्रपंच....!
No comments:
Post a Comment