Thursday, August 15, 2019

आठवणीतील माणसं : साहेब....!


सहकारतज्ञ कै. सुभाष सखाराम शिंदे 

           


                  खरंच कोणी नसते संगतीला तेव्हा आठवणी हळव्या मनाला स्पर्शून डोळ्यातून ओघळतात. वर्तमानाच्या या वळणावर भूतकाळ कळत नकळत समीप येऊन उभा राहतो आणि आठवणीस हमखास खेटतो. मग आमच्या भावना शब्दातून बोलू लागतात आणि कागदावर खोलू लागतात. निमित्त आहे चौक अनावरण. साहेबांच्या नावाने ज्या कर्मभूमीत ज्यांनी सहकाराचा वटवृक्ष लावला. त्या रस्त्यावर बागडणारे, झोपणारे श्रमजीवी लोकांच्या आणि वर्षानुवर्षे सावकारशाहीच्या मगरमिठीत गुदमरलेल्या गरजू पिडीताना एक विशाल आशेचा किरण देणाऱ्या सहकारतज्ञ कै. सुभाष सखाराम शिंदे यांच्या चौकाचे अनावरण होत असल्याने साहेबांच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना त्यांची ती सोज्वळ, मितभाषी चष्म्याच्या आडून डोळ्यात आणि गालात हसणारी त्यांची मूर्ती समोर आली.
                                   श्री सुभाष सखाराम शिंदे...११ नोव्हेंबर १९४० रोजी वडगाव सहानी, जुन्नर, पुणे  येथे शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म झाला. जनमानसात त्यांना साहेब याच विशेषणाने ओळखले जात असे.कारण घोडपदेव मध्ये त्याकाळात पदवीधर होऊन विभागाचे नांव प्रकाशझोतात आणणारे.. पदवीधर होऊन तेथेच न थांबता वकिलीचे शिक्षण घेत  कायदा शास्त्राचे ज्ञान आकलन करीत  घोडपदेव सारख्या गिरणी आणि माथाडी कामगार वस्तीत शंभर चौ. फुटाच्या सुभाषलेनच्या  घरात आपल्या चार लेकरासह जीवन जगणाऱ्या साहेबांनी आपल्या आयुष्याला लोकांसाठी  अर्पित करीत खरं आणि प्रामाणिकपणे जगले. सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे पण सज्जन होऊनच या जगाचा निरोप घेताना ती आयुष्याची कमाई शिल्लक राखली ते म्हणजे साहेबांचे नांव. म्हणून तर येत्या काही दिवसातच मोठ्या दिमाखात त्यांचे नाव चौकाला दिले जात आहे. साहेबांनी आयुष्यात काय केले....! हे मी लोकांना सांगणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल. विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचा वटवृक्ष साहेबांनी कै. दिनकर पारखे,  कै. हरिभाऊ काचळे  यांच्या मदतीने लावला. उत्तम पायाभरणी केल्यामुळे आज संस्थेचा पसारा वाढत चालला आहे. प्रारंभी फंड या सामुहिक चळवळीतून त्यांनी जिवनावश्यक वस्तू ना नफा ना तोटा तत्वावर वितरीत करताना आपल्या माणसाला नेमका लाभ कसा होईल, याकडे शांत आणि सखोल विचारी मनाने लक्ष दिले. सोबत दावल दफ्तरे, खिल्लारी नावाच्या सद्गृहस्थाने साथ दिली. अर्धागिनी सौ. सुनीताताई शिंदे यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. विशेष म्हणजे ते केंद्र शासनाच्या आयकर विभागात सेवेला असताना त्यांना आयकर निरीक्षक म्हणून बढती मिळालेली असताना आपल्या सामाजिक सेवेत खंड पडेल याकारणास्तव त्यांनी बढती नाकारली. त्यांनी स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता अनेकांना एकत्रित करून सहकाराची गुढी उभारली त्यामुळे गोरगरीबांच्या गरजा पूर्ण होत गेल्या. आपल्या माणसाच्या अडचणी पाहून डोळ्यात अश्रू उभे राहत असत. पण तेच अश्रू न वाळविता मित्र बनून सहाय्यास धावून गेले. अडचणी आल्या मात करीत गेले. यश आले वाटून घेतले. मीपणा न करता साहेबांनी खरोखर आयुष्यात कमावले ते नांव.
                                   साहेबांच्या बाबतीत एक उदाहरण त्यांच्या मुखातुनच ऐकला. ते एस टी ने जुन्नर जात असताना त्यांचे पैश्याचे पाकीट चोराने मारले. तेपण गाडीत बसल्यावर कंडक्टर तिकीट तिकीट करीत आला तेव्हा त्यांच्या लक्षात आले. आता काय करायचे....! कपाळावर घाम जमू लागला. गावी जाणे तर महत्वाचे होते. रात्री अकरा नंतर दुसऱ्यादिवशी सकाळी ९ वाजता गाडी. कंडक्टर साहेबांकडे पाहत उभा होता. त्याच्याही काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. साहेब पाकीट गेले वाटते.....?
साहेबांच्या मनातल्या नेमक्या आणि आवश्यक गोष्टीवर कंडक्टरने नेमके हेरले. तेव्हा कंडक्टर म्हणाला चिंता करू नका. मी तुम्हांला ओळखतो...! मी तिकीट देतो. समाजाच्या भल्यासाठी घोडदौड करणारांना असे लाभ घडतात. कुठेतरी पुण्याई कामाला येते.
                                        साहेबांचा अमृतमहोत्सवी सांगता समीप येत असताना साहेबांना आजाराने ग्रासले. ते बिछान्यावर खिळले. शांत दिसणाऱ्या सागराचे अंत:करण ढवळून निघाले. अखेरीस बदलला खेळ, बदलून गेले सवंगडी. सुन्न आणि खिन्न साहेबांचे मन सागराच्या लाटेत घुटमळत राहिले. नियतीच्या निष्ठुर खेळाला कोणी कधी जाणले नसेल पण साहेबांकडे पाहिले असता कठोर पाषाणाच्या डोळ्यात नियतीने पाणी आणले होते. जोवर जिंव आहे तोपर्यंत समाजासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी लढेन असे सांगत ज्या समाजाच्या मनावर, त्यांच्या हळव्या वेदनेवर औषध कसे लावायचे आणि मात्रा कितीशी वापरायची त्या समाजसेवकाला असे निपचित पडलेले पाहून आभाळ भरून आले होते कडा पाणावल्या होत्या. आणि एक लाट आली आणि.....! कुणाला मरण चुकले नाही. परंतु जाणारांनी चटका देत जाणे, हे सहन होत नाही.  तो दिवस होता ४ ऑगस्ट २०१५. आज चार वर्षे झाली. साहेब गेले असले तरी त्यांचे प्रेरणादायी विचार आजही मागे आहेत. ते सदैव प्रेरणादायी असतील.


अशोक भेके
*घोडपदेव समूह*


No comments:

Post a Comment