Saturday, October 6, 2018

चर्चेतील माणसं : श्री दिलीप वागस्कर




Image may contain: 1 person, closeup

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. पण त्याला हटकण्याची हिमंत कुणामध्ये नव्हती.एक जन हिमंत करून म्हणाला,                     
    'अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाणी गढूळ होईल ना ?'                                                                                                       
         तेव्हा कोळी म्हणाला, 'तुला रे काय करायचे, हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मी करणारच.' तात्पर्य म्हणजे काही लोक इतके स्वार्थी असतात की, स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्‍याचे नुकसान झाले तरी ते पर्वा करीत नाहीत. अनेकजण स्वार्थापोटी नागरिकांचे हाल करीत असतात. तेव्हा त्यांच्या कृत्यांना लगाम घालणारा माणूस लोकांना अपेक्षित असतो. पण तो हिम्मतबाज माणूस कोण असेल तर *श्री दिलीप वागस्कर*  यांचे नावं सहजगत्या समोर येईल. या वर्षी येत्या ७ ऑक्टोबरला   त्यांचा *सुवर्णमहोत्सवी वाढदिवस* असल्यामुळे थोडीफार चर्चा होणारच. चर्चा कोणत्याही गोष्टीवर होते, फक्त निमित्त हवे असते. आतापर्यंत आपण पूर्वजांची थोरवी सांगताना वर्तमानकाळात डोकावण्यासाठी मेंदू तडफडत होता. चर्चेतील माणसं लिहिताना हे भरून निघाले.
*सौ. वत्सलाबाई आणि श्री. रघुनाथ वागस्कर* या कष्टकरी कुटुंबियांत, मुंबई राणीबाग येथील वाणी चाळ  येथे जन्माला आलेले *श्री. दिलीप वागस्कर* यांच्याविषयी थोडेसे रेखाटन करताना एका मध्यमवर्गीय माणसाची अकारण स्तुती करीत नाही पण जे चांगले आहे त्याचे कौतुक करायलाच हवे. भायखळा बाजारात व्यवसाय करीत कृतार्थ आणि कष्टमय जीवन जगत सारे काही आलबेल असताना नियतीने पदरात टाकलेले दु:ख म्हणजे पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे सदैव नम्र असलेल्या पत्नी *नम्रताचे* अचानक सोडून जाणे, कल्पना करता येणार नाही. एक करुण, हळवी किनार, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्कीच ओले करते. आतवर कुठेतरी हेलावून टाकते. पण आपल्या चिल्यापिल्या कडे पाहत नव्या उमेदीने समाजात उभे राहिले. सौम्य प्रकृतीचा सडपातळ माणूस. गळ्यात विविध प्रकारच्या सोनसाखळया ही त्यांची ओळख पुरेशी आहे.
एक काठी असेल आणि कोणत्याही आधाराविना ती उभी करायची असेल तर ती उभी राहणार नाही. दोन काठ्या उभ्या राहणार नाहीत. पण तीन तिकाटने उभे केले तर त्या काठ्यांना एकत्रितपणाचे बळ प्राप्त होईल, हे श्री वागस्कर यांनी हेरले आणि सर्वाना बरोबर घेऊन हुतात्मा बाबु गेनू नगरात अस्ताव्यस्त पडलेल्या अडचणीची एकत्रित मोळी बांधून सोडविण्याचे काम करीत आहेत. अंधार होता तेथे प्रकाशमान दिवे आले. शौचालय पडझड झाली होती तेथे दुरुस्ती झाली. शौचालयाला जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी CCTV बसविण्यात आले. २१ कुटुंबियांना दरमहा पुरेल इतके अन्नधान्य वाटप. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्याच्या घरात पितळी समई वाटप. विद्यार्थी गुणगौरव, गेली आठ दहा महिने झाले. विविध लोकोपयोगी उपक्रम पाहतो आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक दिवशीय सहल. शैक्षणिक, क्रिडा क्षेत्राशी निगडीत अनेक स्तुतीजन्य कार्यक्रम.. हा माणूस नुसता झपाटलेला आहे. सतत काम करीत असल्यामुळे सध्या चर्चेत आहे. सध्या चर्चेत असलेले व्यक्तिमत्व. अनेक कारणांनी हे नावं सध्या चर्चेत आहे. पुनर्विकास रखडलेल्या हुतात्मा बाबू गेनू नगर परिसरातील  रहिवाशी बांधवांनी चांगली गोष्ट साध्य करण्यासाठी तप केले असावे म्हणून त्यातून जे फळ मिळाले ते *श्री. दिलीप वागस्कर* यांच्या रूपातून दिसत आहे. ते करीत असलेल्या कार्याने आजतरी अनेक कुटुंब त्यांना दुआ देत आहेत. *घोडपदेव समुह* अशा मनी दानत असलेल्या माणसाची कृतज्ञता व्यक्त करीत आहे.


*अशोक भेके*


*आठवणीतील माणसं : नारायण आलेपाकवाला*



Image may contain: text


परवा एका मुलाने वीस रुपये कमविले त्याने इतक्या ऐटीत सांगितले की, त्याने वीस लाखाची कमाई केली. आश्चर्य वाटले. आम्ही लहान असताना ५ पैश्यासाठी किती किती कामे केली हे मनात आले तरी डोळ्याच्या किनारी ओलसर होते. लहानपण गेले पण त्या लहानपणातल्या आठवणींची शिदोरी अनपेक्षितपणे कधी उघडली जाईल, सांगता येत नाही. १९७० ते ८० दशकात चाळीचाळीतून एक माणूस आलेपाक विकायला यायचा. सुमधुर आवाजात सातमजली साद घालायचा, तसे घराघरातून मुले बाहेर यायची अन म्हणायची नारायण आलेपाकवाला आला. खूप बोलका माणूस. मला ही खूप बोलणारी माणसं फार आवडतात. निर्मळ मनाची असतात. कुणाचं वाईट करायचं त्यांच्या मनाला शिवत नाही. हा माणूस त्यातला एक. शर्ट लेंगा घालून त्या साखरेच्या आणि गुळाच्या आलेपाक वड्या विकून पोटं भरायचा.  आलेपाक म्हणजे गुळ कमी अन किसलेले आले अधिक... कडक, तिखट, झणझणीत.साखरेचे होते ते गोड लागायचे. वास्तविक डोक्यात थैमान घातलेला माणूस. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणून धंदा करीत होता. कशासाठी, पोटासाठी....!
कोण होता नारायण... कोठून येत होता, कोठे राहत होता, हे ठाऊक नाही. पण धंद्याच्या लायक माणूस. वाचाळ माणूस आमच्या चाळ नावाच्या वाचाळ वस्तीत यायचा. तो काळ तसा चांगला नव्हता. पण नारायण पोटासाठी हातावर तो डबा खांद्यापर्यंत नेत असे. त्याकाळात त्याचे अप्रूप वाटले नाही. पण आम्ही मोठे झालो तेव्हा त्या कष्टकरी माणसाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत असे. मुलायम आवाजाचा साधा माणूस गाणं गात गात धंदा करायचा. त्याचा आलेपाक खाल्ला तर सर्दी खोकला झटपट मोकळा होत असे. त्याचा आलेपाक खाल्याने अमिताभ बच्चन सुपरस्टार झाल्याचे तो सांगत असे तर सुनील गावस्करचे शतक झळकले की, त्याने ऐटीत सांगितलेच पाहिजे. शून्यावर आउट झालेला खेळाडूला त्याने किती वेळा सांगितले आलेपाक खा.. आलेपाक खा पण त्याने खाल्ले नाही म्हणून तो शून्यावर आऊट झाला. किती अभिमानाने सांगायचा. एखाद्या डॉक्टरांच्या हाताला गुण नसेल पण नारायणाच्या आलेपाक खाल्याने सर्दीखोकला मुक्त होतो, हा भारी समज नारायणच्या मधाळ बोलण्यामुळे झाला होता. त्याचं बोलणं जणू तुपात तळलेलं असायचे.
नारायण म्हणजे आम्हांला विदुषक वाटायचा. आनंद देणाऱ्या खूप गोष्टी आहेत या जगात.एखाद्याचे अश्रू पुसताना देखील आनंद मिळतो. चिमुकल्या बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून देखील मन आनंदी होते. नारायण म्हणजे आनंदून टाकणारा, चैतन्याची कारंजी फुलविणारा सदाबहार माणूस. गंभीरपणे जीवनाकडे पाहताना मुलांना पोटं धरीसपर्यंत हसवायचा. त्यांच्याशी खेळायचा. गप्पा मारायचा. भुरळ पाडायचा.अगदी आपला.. आपल्या घरातला.. आपल्या रक्तमांसाचा माणुस. आम्ही स्विकारलेले नाते होते. ज्या संगतीत वाढतो, मोठे होतो.त्यांचे संस्कार आपल्या बालमनावर होत असतात. चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार घ्यावा अशी जाणकार मंडळी सांगतात. पण नारायणाबरोबर घालविलेला तो वेळ देखील आमच्या आरोग्याला लाभदायक असायचा, हि प्रांजळपणे कबुली द्यावीशी वाटते.
आज नारायण काय करतो ठाऊक नाही. पण लहानपणी एकदा  शिरोडकर हायस्कूल मध्ये आपल्या आवडत्या माणसाविषयी निबंध लिहायला सांगितला होता. एका चिमुरड्या  मुलीने त्याच्यावर छानसा निबंध लिहिला होता. तो निबंध सर्व शाळेतील मुलांना वाचायला मिळाला. उदंड लोकप्रियता कमावलेला एक फेरीवाला आबालवृद्धांच्या मनात घर करून राहिलेला नारायण आलेपाकवाला. सहज सुचलं अन मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली आठवणीतील शिदोरी  पावसाची रीपरीप व्हावी तसे लेखणीतून  झरझर उतरली.
*घोडपदेव समूह अशा कष्टकरी माणसांची देखील कदर करीत आहे.*


*अशोक भेके*

Saturday, September 22, 2018

आठवणीतील माणसं : मधु शेट्ये . . . . . .

YOUTUBE





जूनी माणसं किती गोड, अन चिवट असत. यावरून मला आज प्रकर्षाने मधु शेट्ये यांची खूप खूप आठवण येऊ लागली. हा माणूसच तसा होता. आम्हाला सोडुन गेले असले तरी प्रत्यक्षात मात्र आजही आमच्या सोबत आहेत असेच वाटते.कुठून तरी आपली कापडी पिशवी हलवित हलवित येईल असं राहून राहून वाटतं. 
पण मधु शेट्ये म्हटले तरी डोळ्यात टचकन अश्रू दाटून येतात. साचणार्या आसवांना वाट मोकळी करावी यासाठी आठवणीतील माणसं कै. मधु शेट्ये यांच्यासाठी दोन शब्द........

मधु शेट्ये म्हणजे वरिष्ठ असले तरी मात्र मी मोठा आणि तु छोटा हा भेदभाव कधीही जोपासला नाही. त्यांच्या हसण्यात आत्मियता, विश्वास आणि दिलासा दिसे त्यामुळे समोरचा माणूस त्यांच्या साध्या हसण्याने तृप्त होत असे. आपण लहाण होऊन समोरच्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारा त्यांचा स्वभाव. लहान मुलांबरोबर कॅरम खेळताना कोणी चिटींग केली तर लहान मुलांप्रमाणे भांडण करणारी बाल्यावस्था जोपासली होती. आम्ही भुवईची भाषा यांजकडून शिकलो. गोपनिय मसले ते नेहमी भुवईनी बोलायचे आम्ही तर डोळ्यांनी प्रतिसाद देत होतो. 
वाटले नव्हते इतक्या लवकर ते मार्गस्थ होतील.मृत्युशय्येवर चिवट झुंज देत देत साखरेपेक्षा गोड असणार्या या सुस्वभावी माणसाने एक दिवस कोरड्या ठाक वाटणार्या बटबटीत डोळ्यात उतरून आलेला ओलावा निरोप घेत घेत एका वळणावरती थांबला. अखेरचा तो दिवस ....... मुंबई पोर्ट ट्रस्ट रूग्णालयात मी त्यांच्याजवळ उभा होतो. शेवटचे ते काही क्षण ....... त्यांच्या पायातील भळभळणार्या जखमांना औषधाने धुत्कारले होते. कुटुंब औदासिन सावटाखाली खिन्न होऊन मृत्युंजय मंत्र जपत बाहेर बसले होते. 

इकडे शरीर हळूहळू शिथिल होत चालले होते. अगदी चेतनाहीन..... डोळ्यांत हालचाल मंदावलेली असली तरी माझ्याकडे एकटक पाहत होते . डोळे बोलत नसले तरी भुवया काही तरी सांगत होत्या माझं मलाच गहिवरून आले. कितीतरी सखे सोबती सोडून गेले पण अश्रूनी कधी डोळे पाणावलेले नव्हते पण या निपचित पडलेल्या मधु शेट्येंनी माझ्यातल्या गंगा यमुनांना पूर आणला होता. त्याक्षणी त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याऐवजी मलाच सावरण्याचा प्रयत्न झाला. असे आपले मधु शेट्ये............



अशोक भेके 

राणीबाग प्रश्नावर आंदोलन करण्याची गरज....!



बरेच दिवस मी स्थानिक लोकसमस्येवर लिहायचे टाळत होतो. मतभेद होत होते ते म्हणजे आधणातले रडायचे अन सुपातले हसायचे....! शेवटी मीच माझ्या मनाला आवर घातला. पण आज राणीबाग या प्रश्नावर अनेक मंडळीनी माझे डोके भंडावून सोडल्यामुळे आज या  विषयावर लिहायला घेतले.
१.   महापालिका प्रशासनाने पर्यटकांवर प्रवेशमूल्य वाढविले आणि कमी केले.
२.   प्रभातफेरी साठी प्रवेश मूल्य पाचपटीने म्हणजे मासिक १५० रुपये वाढविले. ( पर्यटकांचे कमी केले पण प्रभातफेरी नागरिकांना दिलासा का नाही...! )
३.   प्रभातफेरीसाठी आठवड्यातून बुधवार या दिवशी राणीबाग बंद ठेवण्यात आला.( बुधवारी बाग परिसरात वाहनाची येजा चालते का..! )
४.   शालेय विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा मार्ग रोखला गेला. ( भायखळा येथे जाणारे येणारे शालेय विद्यार्थी यांचा मार्ग रोखून प्रशासनाने काय मिळविले)

असे अनेक विषय घडत गेले पण आम्ही मुग गिळून गप्प बसलो. मुळात घोडपदेव समूहाने राणीबाग या विषयावर अनेकदा लिहिल्यानंतर त्यामध्ये सुधारणांचे पाऊल उमटले गेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह बंदिस्त अवस्थेत उभारण्याचे काम सुरु आहे. आज महापलिका प्रशासनाने उत्तरेकडील छोटासा दरवाजा आजपासून बंद करण्यात केला.
कुणी सांगितले....?
वरून ऑर्डर आहे ...! हे उत्तर मिळाले
असा कोण वर आहे...! तो आमच्या घोडपदेव नारळवाडी फेरबंदर भागातील नागरिकांच्या मुळावर उठला आहे. प्रभातफेरी साठी अनेक मान्यवर या बागेत उपस्थित असतात. अनेक वृध्द माय बाप मंडळी  कसरत करीत असतात. विविध वनस्पती आहेत त्या मोकळ्या वातावरणात  शुध्द हवेचा लाभ घेतात. कसं ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे या बागेत अर्धांगवायू आणि मधुमेहाचे आणि vertigo याचे रुग्ण येतात. डॉक्टरांचा सल्ला त्यांनी मोकळ्या वातावरणात चालावे. जितके चालाल तितके बरे वाटेल म्हणून वेड्यासारखी आशा सुटेना, अन देव भेटेना म्हणून आपले आयुष्य वाढविण्यासाठी चालतात. चालताना धडपडतात,पडतात. आज त्यांना हा बंद दरवाजा सांगतोय ‘तुमचे अच्छे दिन सुरु झाले आहेत...!’ पश्चिमेच्या मुख्य प्रवेशद्वारातून फक्त प्रवेश मिळेल. कोण घडवून आणत आहे हे सारे....! आमच्या नागरिकांना त्रास देऊन काय मिळत आहे, समजत नाही. कोण अधिकारी आहे....त्याने खुंट्याची सोडून झाडाला बांधली आहे. वरून सोज्वळ असतील पण आतल्या सावळ्या गोंधळाची कल्पना आम्हाला देखील आहे.
   हा बंद दरवाजा आमच्या विभागीय नागरिकांना कायम सुरु राहिलाच पाहिजे.... तसेच  बंद बुधवार हा पर्यटकांसाठी ठीक आहे पण प्रभातफेरी नागरिकांसाठी नको. हे लक्षात घ्यायला हवे अन्यथा......स्थानिक नागरिकांना आंदोलन करण्यास भाग पाडू नका.


अशोक भेके
घोडपदेव समूह


आठवणीतील माणसं : अशोक बाजीराव चोरगे






२२ नोव्हेंबर १९८०.... संध्याकाळचे सहा वाजले होते... तितक्यात हृदय पिळवटून काढणारी घटना कानावर येऊन आदळली अन ज्वालामुखीचा स्फोट होत आहे, असेच जाणवू लागले. ओठ थरथरत होते. मेंदू सुन्न झाला होता. काही कळत नव्हते. दादर स्थानकात *अशोक चोरगे* उतरत असताना त्या गर्दीत श्वास कोंडल्याने त्याचा अंत झाला. हि घटना ऐकली अन पायाखालची जमीन हादरली. धरणीकंप झाल्यासारखे वाटले. 
आमच्यातला एक मनमिळाऊ स्वभावाचा....
देवाच्या बागेतील कळ्या म्हणजे लहान मुलांवर प्रेम करणारा, त्यांना फुलविणारा....
मुलांच्या ओसाड मनोभूमीवर सहृदय मेघांचा वर्षाव करणारा...
*आमचा मित्र अशोक चोरगे*
त्याची मैत्री म्हणजे सृजनशील विचारांची, सधन संस्काराची साक्ष देणारी होती. समाजसेवक नव्हता कि राजकारणी नव्हता. अशोक चोरगे म्हणजे खरा हिरा होता. नियतीने त्याच्यावर घाला घातला होता. अवघे वयाची पंचविशी पूर्ण करण्याआधीच जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला.... यापुढे काय म्हणावे. हि घटना घडल्यानंतर चोरगे कुटुंबीय अनेक वर्षे सावरू शकले नाही.
मुंबई घोडपदेव मधल्या कांचवाला चाळीतील ते छोटेसे घर, मोजून फक्त ८० चौ. फुट. त्या घरात संसार थाटलेल्या *सौ आणि श्री बाजीराव चोरगे* यांना दिनांक १५ नोव्हेंबर १९५६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. आनंदीआनंद झाला. जे कर्म चांगले करतात त्यांना फळ मिळते ते या बाळाच्या रूपातून चोरगे कुटुंबियांना मिळाले होते. प्राथमिक, माध्यमिक आणि कॉलेज शिक्षण येथेच पूर्ण झाले. शालांत परीक्षेत त्यावेळी ६४% गुण मिळवून विभागात प्रथम आला होता कॉटनग्रीन त्या दिव्याखाली अभ्यास करून Bsc Chemistry मध्ये first class ने उत्तीर्ण झाले, त्यावेळेस विभागात काही ठराविकच पदवीधर झालेले होते. पदवीधर झाल्यानंतर अनेक कंपन्यांची चालून नोकरीसाठी निमंत्रणे आली. मुंबई महानगरपालिकेत जलशुद्धीकरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले होते. चोरगे कुटुंबियांच्या नशिबात असं काय मांडून ठेवले होते कि सुख पाहता लोचनी....पण नियतीला हे मान्य नव्हते..!
एक किस्सा सांगायचा म्हणजे तेव्हा अकरावी म्हणजे SSC होती. एक समाजसेवक सतत या परीक्षेला बसत पण नापास होत असत. त्यांच्या पास होण्याने त्यांना अत्यंत लाभ होणार होता. तेव्हा त्यांनी माझ्या मित्राला गळ घातली. पण ती मागणी झिडकारली. समाजसेवक देखील येता-जाता मारक्या म्हशीसारखा त्याच्याकडे बघत असे. पण प्रामाणिक माणसाला कुणाच्याही भानगडीत नाक न खुपसणाऱ्या आमच्या मित्राला भीती नव्हती.
अंगकांती निमगोरी, अतिउंचही नाही आणि अल्पउंची नाही अत्यंत प्रमाणबध्द शरीर. केस काळे आणि मागे फिरविलेले, सरळ नाक तेही बाकदार, ओठ लाल आणि पातळ, पेहराव म्हणजे साधी विजार आणि शर्ट... सतत हसतमुख चेहरा खळाळून हसताना उमटणारी भावमुद्रा म्हणजेच विनम्र भावमुद्रा.. जणू देवाने कलेचा नमुना निर्माण केला असल्याचे वाटत असे. संवादाला कधीच नकार न देणार्यात आणि संवादातून कायमच समाजहितकारक बुद्धिवादी भूमिका पटवून देण्याची असामान्य क्षमता बाळगणार्या‍ मित्राचे अकस्मात जाणे. खरोखर दुर्दैवी होते. आजही आठवणीचे मनोरे उभे केले तर सर्वप्रथम या मित्राला स्थान मिळते. हिऱ्याला घणाच्या घावाने इजा होत नाही. आज अशोक आपल्यात नसला तरी त्याचे मोल आजही आमच्या मनामनात घर करून आहे. 


अशोक भेके

Sunday, September 16, 2018

कार्यकर्ता येणार का आपल्या घरी.....?


मी नेहमी अनेक विषयावर लिहितो, तेव्हा कायम टीकात्मक लिहितो असा काहींचा आक्षेप आहे. कोणी म्हणतं मला नकारात्मक दिसतं. पण माझे प्रांजळ मत सांगतो,लिहिताना मी कुणा एकाला लक्ष्य करत नाही. सुचलं की लिहितो. सोशल मिडियावर म्हणजे फेसबुक अथवा व्हाटसअप वर काही दिवसापूर्वी घरघंटी आणि शिलाई मशीन स्वयंरोजगारासाठी महिलांसाठी शासकीय अथवा पालिकेच्या विविध योजनांच्या जाहिराती पोस्ट केल्या, अन आपल्या जबाबदारीचा गाशा गुंडाळला. आपल्या विभागात किती लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतात याचा कोणी ठाव घेत नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी केवळ एक गरजू महिलेला या योजनांचे लाभार्थी बनविले तर किती संसार फुलतील. किती आशिर्वाद, शुभार्शिवाद तुमच्या पाठीशी मिळतील याची मोजदाद करता येणार नाही. त्यांनी अर्ज आणायचे त्यांनीच भरायचे त्यांनीच सारे काही करायचे. दिखावा आपण का करायचा ...! न्यायालयाने फटकारले अन फ्लेक्स जवळ जवळ बंद झाले आणि ते खर्चिक ही होते. त्यामुळे कार्यकर्ता सोशल मिडिया सारख्या प्रभावशाली प्रसारमाध्यमांचा आसरा घेऊ लागला. मला याबाबत इतकेच म्हणायचे आहे की, आपल्या पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहचायला हव्यात. ज्यांना खरोखर गरज आहे त्या गरजवंत मोबाईल वापरत असतील का....! जर वापरत असतील तर सोशल मिडिया सारखं साधन त्यांच्याकडे उपलब्ध असेल का ....! यासाठी कार्यकर्ता हा गोरगरीबांच्या घरी गेला पाहिजे किंवा वस्ती, विभागामध्ये एखादे टेबल टाकून ध्वनिक्षेपकावरून आवाहन केले तर या योजना घरादारापर्यंत पोहचतील.त्यामुळे कार्यकर्ता घरोघरी जाईल लोकांशी सुसंवाद वाढेल.
विभागपातळीवर किती निराधार मंडळी आहेत. त्यातले संजय गांधी निराधार योजना मध्ये किती लाभार्थी आहेत. कुणाला दोष देणे गैर आहे, पण माणसं आपल्याकडे येत नाहीत तर आपण माणसाकडे जावे अन त्यांना प्रोत्साहित करावे.समाजाची सेवा करताना अहंमपणा सोडायला हवा. हल्ली किती तरी आपल्या माय भगिनी पोळी भाजीचा व्यवसायात मन रमवू लागल्यात.कोणी कारखान्यातून घरी कामे आणतात आणि उदरनिर्वाह करतात. भाजीचा धंदा करतात. काल एका घरात जाने झाले. त्या छोट्याश्या घरात बरीचशी मंडळी राहत होती पुरुष एकच पण महिला अधिक, त्या घरात एक वृध्दा अंथरुणाला खिळून आहे.आजाराने कृश झालेली पाहिली जेमतेम तिचे वजन केले तर दहा किलोही भरणार नाही.किलकिल्या डोळ्यांनी पांघरूनातून पाहत होती. मनाला वेदना झाल्या. त्यांना गरज आहे आपल्या मदतीची.
मध्यंतरीच्या काळात कोणत्या तरी निवडणुकीच्या वेळी मतदार नोंदणीसाठी काही कार्यकर्ते घरोघर फिरत असताना दिसले. बरं वाटले मनाला. कार्यकर्ते पक्षासाठी काम करणारे पाहतो पण तेच जर गरजवंताना हवा असलेला कार्यकर्ता अपेक्षित आहे. ‘ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के’ असं म्हणताना समाजाची दशा आणि दिशा ठरविताना सर्व सामान्यांना अपेक्षित असलेला कार्यकर्ता हवा आहे. आपण एखादी योजना सांगायची अन ती लोकांपर्यंत पोहचत नसेल तर त्याला काय अर्थ आहे का...! घरादारात ज्याला कार्यकर्ता म्हटले जाईल तो कार्यकर्ता. हल्ली व्यावसायिक आणि दिखावा करणारा कार्यकर्ता अधिक प्रमाणात दिसून येतो. सतरंज्या अंथरल्यानंतर आणि व्यासपीठावर माईक खुर्च्या ठेवल्यानंतर ऐटीत स्थानापन्न होणारे, फर्डा भाषण देणारे, भाषण करताना फोटोग्राफर कडे हळूच तिरकस नजरेने पाहणारे अन काय भारी पोझ देत टाळ्या मागणारे कार्यकर्ते दिसतात. अशा या कार्यकर्त्यांच्या वृती अन गुणांना सलामच नव्हे तर साष्टांग दंड्वंत घालायला हवा. कार्यकर्त्याचे कार्य अंधारात प्रकाश तेवत ठेवणाऱ्या पणती प्रमाणे हवे. निराश मनोवृत्तीचा कार्यकर्ता नको. जनमानसाने कार्यकर्ता कसा असावा कोणी विचारले तर अमुक अमुक माणसासारखा असावा किंवा या पक्षातील कार्यकर्त्यासारखा असावा. असं म्हटले गेले तर आपण अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाहीत. 


अशोक भेके

लोकप्रतिनिधी असे ही ..........!



             


     मागच्या आठवड्यात  ‘दैनिक  शिवनेर’  मध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते . मुंबईतील वरळी भागातील सेनेचे आमदार  सुनील शिंदे यांनी मुंबई सारख्या शहरी भागात आपल्या स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा करीत कॉलेज समंत करून घेतेले. यानंतर छानश्या प्रतिक्रिया उमटल्या.  विशेष अभ्यासक्रम यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना विभागाबाहेर आधार घ्यावा लागत असे. प्रवेशप्रक्रियेसाठी  आमदारांना धावणे आलेच. पण धडपड करून त्यांनी त्यांच्या विभागासाठी आणलेली कौतुकाची वेल समृध्द केल्याशिवाय राहणार नाही. लोकप्रतिनिधी असा असावा, हे मी तरी कौतुकाने म्हणेन. ग्रामीण आणि शहरातील शिक्षण सम्राटानी मांडलेल्या शैक्षणिक बाजाराला किंचितसा लगाम….!                     
सध्या सर्वच स्तरातून सोशल मिडीयावर गणपत ( आबा) देशमुखांच्या बाबत फार कौतुकास्पद लिहिले जात आहे. अलौकीक व्यक्तीमत्व .... लोकप्रतिनिधी  कसा असावा यांचे उदाहरण. पैसा खर्च न  करता निवडणुकीत दणदणीत मताधिक्याने भला माणूस १२ वेळा विधिमंडळात निवडून आला. सलग ९ वेळा म्हणजे एकूण ४५ वर्षे नगरसेवक पद भूषविलेल्या वरळीच्या मणिशंकर कवठे विषयी आजही समस्तांच्या मनात अभिमान जागृत होतो. डोंगराएवढं काम करून या माणसांनी मी केलं. कधी म्हटले  नाही.  पूर्वी लोकप्रतिनिधी ज्येष्ठ, अनुभवी, आणि साधारणत: नागरिकांच्या सुखदु:खाशी एकरूप आणि समरस होत असत. त्यांचेही समाजकारण आणि संस्थात्मक राजकारणात लक्ष असे. मंडळाचा अध्यक्ष सचिवही  कोण असावा याचा बारीकसारीक विचार करीत असत. कारण संस्था कारभारात स्वच्छ व  पारदर्शकता हवी आणि त्यासाठी त्या संस्थेवर आस्था असणारी माणसे असायला हवी. हे धोरण मनात असे. आपली नेमकी कर्त्यव्ये काय आणि नागरिकांना आपल्याकडून काय अपेक्षी आहे, याची जाण होती. गावपातळीवर अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत की, प्रचार न  करता निवडून येतात. मतदार प्रचार करून तन मन धन अर्पून निवडून आणतात. त्यांच्या योगदानाची, त्यांच्या कार्याची  पोचपावती मतदार स्वखुषीने बहाल करतात.  बॅ. नाथ पै, मधु दंडवते, रामभाऊ म्हाळगी, बापूसाहेब काळदाते, मृणालताई, सुधीरभाऊ जोशी, हेमचंद्र, गुप्ते, प्रमोद नवलकर, बी. डी. झुटे,केशवराव धोंडगे, अहिल्याताई, यांच्यासारखे सज्जन, चारित्र्यवान, प्रामाणिक लोकप्रतिनिधी  अव्वल दर्जाचे संसदपटू वर्तमानकाळात दिसत नाहीत.
               आजचे लोकप्रतिनिधी असं का करीत नाहीत. ठळक दिसणारे काम त्यांच्याकडून का होत नाहीत. केवळ घरगल्ल्या दुरुस्ती, रस्ते डांबरीकरण, कुठेतरी रस्तोरस्ती शेड बांधायच्या अन वाचनालयाचे स्वरूप द्यायचे. ही कामे म्हणजे भविष्यात कोणी नांव काढणार नाही. आपल्या एका कामाने हीच पिढी काय भविष्यातील पिढीने देखील नांव काढले पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना काय हवं काय नको...! असे विषय विचारात घेणे अगत्याचे आहे. एक लोकप्रतिनिधी त्याच्या मतदारसंघात काय  करू शकतो. त्याच्या मनाला हवं तसं चित्र बदलू शकतो. आपल्या विभागात शुभ मंगल कार्यालय याची गरज आहे का ...? मेरी मर्जीनुसार हवं तसं लुटणाऱ्या मंगलकार्यालयाविषयी काय प्रतिपादन करायचे. भटजीपासून आचारी आणि तत्सम विविध गरजा लक्षात ठेऊन चालविलेल्या एकाधिकारशाहीविषयी.... हॉल पाहिजे असतो सोबत ते सांगतील त्या दरानुसार आपण आपली गरज म्हणून बोकांडी बसून घेतो. माझ्या विभागात तीन जमाती नवीन आल्या. मंदिर, समाजमंदिर, हॉल  निर्माण झाले. आम्ही मात्र कोरड्या पाषाणाप्रमाणे  पाहत राहिलो. आज मुंबईत प्रत्येक विभागात कॉलेज दिले तरी कमीच आहे. आज मुंबईतील मुले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिक्षण घेत आहेत.माजोर शिक्षण सम्राट मंडळीना दणका देण्यासाठी स्थानिक विभागवार कॉलेज निर्मिती केली तर किती खर्च वाचेल याचा अंदाज कोणी घेतला आहे का....? महापालिका शाळा ओस पडत चालल्या आहेत. शालेय वास्तूत हॉल निर्मिती करता येऊ शकते. पालिकेचा महसूल वाढू शकतो. विचार करायला काय हरकत आहे.
                        निवडणुकीच्या काळात आपल्या पाठीराख्यांसमवेत सातत्याने दिसणारे आणि निवडून आल्यानंतर वर्तमानपत्रातील बातम्या,कार्य अहवाल, दिनदर्शिका प्रकाशन, दिवाळीत उटणे वाटप, या सारख्या तत्सम कार्यक्रमापुरते राबणारे, धडपडणारे लोकप्रतिनिधी अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. एका विभागात एका लोकप्रतिनिधीने हेर मंडळ नेमले आहे. कोणी बांधकाम सुरु केले की, साहेबांच्या कानावर बित्त बातमी पोहचवायची. साहेब संबधितांना सांगून नोटीस काढीत. शेवटी नागरिक साहेबांकडे विभागीय कार्यकर्त्याला हाताशी धरून जात असे. मधल्यामध्येच खिचडी तयार होई अन बांधकाम तोंडी परवाना बहाल केला जात असे राजकीय उत्कर्ष आणि दबदबा निर्माण करण्यासाठी विभागवार असं  केले  जाणारच. यामागची कारणे म्हणजे आजची पिढी. त्यांना विभागाचा विकास नको असतो. त्यांना केवळ साहेबांकडून ‘डोनेशन’ हवं असतं. गोविंदा असो वा गणपती, नवरात्र असो वा दिवाळी साहेबांनी या वेळेस काही तरी चांगलं दिले पाहिजे. साहेबाना देखील हेच हवं असतं. लोकप्रतिनिधींचा तरुण वर्गाला
आकर्षित करण्याचा एकमेव धंदा,
कामं करण्याऐवजी वाटा चंदा...!
हे पण तात्पुरत्या काळापुरते मर्यादित असते. निवडणुकीत अधिक  माया देणाऱ्या उमेदवाराची तळी उचलतात. तो निवडून येवो अगर न  येवो. मतदारसंघाचा विकास येथेच खुंटतो. निवडणुकीत वारेमाप पैश्यांची झालेली उधळण भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आपली काही वर्षे खर्च घालतो अन तो पर्यंत मुदत संपलेली असते.
                        पण आताचे लोकप्रतिनिधी वेगळेच. काही  लोकप्रतिनिधींचा  बडेजाव, त्यांचं वैभव आठवलं. हा नेता  म्हणजे हाताच्या किमान आठ बोटात अंगठ्या, मनगटावर जाडसर ब्रेसलेट,आणि गळ्यात दोरखंडासारखी चैन, डोळ्याला ली भारी दिसणारा गॉगल, दिमतीला सफारी किंवा स्कार्पियो हा त्याचा  ट्रेडमार्कच . सोबत भाई आणि भाऊ म्हणजे सुरक्षिततेचे कवच घेऊण जनमनावर प्रभावी दर्शन घडविणाऱ्या लोकप्रतिनिधी यांचे आजचे रूप किंव करण्याजोगे आहे.
                        आजच्या लोकप्रतिनिधी कडून फार काही नाही पण त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख भविष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला जावो. हे अगदी मनापासून वाटते , हे मलाच वाटत नाही तर समस्त लोकशाहीनुसार विश्वासाने आपला मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारराजाला वाटत आहे.

अशोक भेके