Sunday, September 16, 2018

आठवणीतील माणसं : शाहीर शंकरराव धामणीकर


       

             घोडपदेव विभागात एक अस्सल  माणिक रत्न म्हणून जुन्या पिढीला  ठाऊक असलेले  शंकरराव धामणीकर. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणी गांवात धोंडीबा जाधव यांच्या यांच्या घरात २०.१०.१९१४ साली एक माणिक रत्न जन्माला आले. घरची परिस्थिती फारच गरीबीची. गरीब परिस्थितीशी झुंजत असताना त्यांनी सन १९३२ ला मुंबई गाठली.  चास्कर चाळीतल्या बैठ्या चाळीत त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली.  सटवी  जन्माला घालताना ललाटी भाग्य घेऊन पाठविते. जे ठरविलेले असते ते होत नाही, नियती वेगळेच काही तरी घडविते अन त्याचे नशीब उजळवीते. शंकररावांच्या बाबतीत असचं घडले. आवाज चांगला होते. चुलते रामजी बाबा खंडोबा भक्त होत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जागरण गोंधळ व्यवसाय करू लागले. जागरणातून खंडोबाची पदे, कथाकथन आणि गायन क्षेत्रात त्यांनी जम बसविला. हे पाहून दगडूबाबा साळी यांनी त्यांना  त्यांच्या तमाशासंचात सामील करून घेतले. तेथे  त्यांनी निवेदन, गायन आणि अभिनयाचे धडे आत्मसात केले तीन एक वर्षे त्यांनी त्यांच्या सोबत पायपीट केली अन सन १९३७ साली आपला पारंपारिक जागरण व्यवसाय पुन्हा सुरु केला.
                               पूर्वी जागरणात तीनच माणसं असत एक गाणारा दोन साथीदार ...   पण शंकरराव यांनी आमुलाग्र बदल घडवून आणत किमान ८ माणसांचा संच जमा केला. त्यामध्ये गण, गवळण, पोवाडे, खंडोबाची पदे संभाषणासहित करीत आणि वाघ्याचा पेहराव धारण करीत  श्री खंडोबा देवाचे जागरण गोंधळ देवाच्या स्तुतीपर वाघ्या मुरळी प्रस्तुत पारंपारिक पदे तन्मयतेने  ठिकठीकाणी गात  कार्यक्रम करू लागले. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी जागरणातून पारंपारिक कथांचा आधार घेत खंडोबाचे लगीन, म्हाळसाचे लग्न, गोरक्ष जन्म, हरीश्चंद्र तारामती,सत्यवान सावित्री अशा अनेक नाटिकानी लोकरंजन केले. खेड आंबेगाव जुन्नर आणि मुंबईत सर्वत्र त्यांना निमंत्रणे येऊ लागली. हे करीत असताना शाहीर विष्णुपंत कर्डक यांच्याशी भेट झाली अन शंकररावांना पोवाड्याची गोडी लागली.या नंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, साने गुरुजी, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची मेजवानी अधून मधून त्यांना मिळत असे. ते  विचार ऐकून भारावून जात असत. सदर विचारांची गाणी पोवाडे तयार करून कलेच्या माध्यमातून लोकरंजनाबरोबर लोक शिक्षणाचे काम केले.काळाबाजार, गुंडगिरी, शेतकऱ्यांची दु:ख, अस्पुश्यता, मंदिर प्रवेश, अधिक धन्य पिकवा, शिक्षणाचे महत्व,दारूबंदी, अंधश्रद्धा आदी विषयांवर पोवाडे, गीत लिहून जनजागृती केली. हे सारे काही करीत असताना लोकांकडून  उत्स्फूर्तपणे दोन सोन्याची आणि किती तरी चांदीची पदके त्यांना भर  कार्यक्रमात बहाल करण्यात आली. केवळ जागरण, गोंधळ आणि लोकनाट्य करीत राहिले नाहीत. सदर कालावधीत फावल्या वेळात त्यांनी गांधींजींचे स्वप्न, जनजागृती, आणि जय मल्हार ‘ ही तीन पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली.
`धामणीकरांच्या ‘बाणु – मल्हारीचं लगीन’ या कथानकावरून इंडिअन नँशनल थिएटर यांनी ‘खंडोबाचे लगीन;  सादर केले. त्या मध्ये सूत्रधार म्हणून भूमिका साकारली. शंकरराव धामणीकर हे नांव सर्वत्र गाजत असताना दिल्लीतील विश्व युवक केंद्र लोकसंगीत अकादमीने खंडोबागीत सादर करण्यासाठी निमंत्रित केले. दिल्लीची वारी झाल्यानंतर आकाशवाणीनी वेळोवेळी कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलाविले. मुंबई दूरदर्शन सुरु झाल्यानंतर धामणीकरांचे खंडोबाचे लगीन आणि हुतात्मा बाबु गेनूचा पोवाडा सादर करून आपल्या कलेला महाराष्ट्राच्या घरादारात पोहचविले. हा माणूस फार मोठा होता. पण समाज ‘जागरण, गोंधळ आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताकडे वेगळ्या नजरेने पाहत असतो. तेच धामणीकरांच्या बाबतीत झाले. इतका मोठा लवाजमा सांभाळताना अनेकांची घरे चालविताना धामणीकर आहे तेथेच राहिले. त्यांचं कितीतरी अप्रकाशित साहित्य, काव्य पडून आहे. त्यापैकी अलीकडेच ‘चौर्य’ या चित्रपटासाठी त्यांचे एक गीत घेतले आहे. येत्या १० ऑगस्ट २०१६ रोजी हा चित्रपट थिएटर झळकेल तेव्हा आपल्याला आपल्या शंकरराव धामणीकरांचे नांव पाहायला मिळेलच.
शंकरराव धामणीकर  हा माणूस म्हणजे घोडपदेवच्या दृष्टीने खरोखर माणिक होते. रत्न अनेक पण रत्नांचा राजा म्हणून माणिक ओळखले जाते. असं हे माणिक रत्न एका छोट्याश्या घरात आपले जीवन व्यतीत करणाऱ्या या माणसाचा गौरव होणे उचित आहे.आपल्या ८२ वर्षाच्या जीवन प्रवासात बरेच कमावीत या  मातब्बर गड्याने  २९ ऑगस्ट ९६ ला आपला अखेरचा निरोप घेतला आजही ‘वाघ्या-मुरळी नाचती परोपरी ।  आवडी ऐशी पाहीन जेजुरी’  आणि ‘‘आई अंबाबाईच्या नावानं... उदो उदो मायेचा निजरूप आईचा गोंधुळ मांडला,  उदे उदे ग अंबाबाई गोंधळा ये.... या त्यांनी गायलेल्या गीतांची आठवणीने मन भरून आले आहे. शाहीर शंकरराव धामणीकर आम्हाकडून आपणास भावपूर्ण अभिवादन .........!

अशोक भेके

आठवणीतील माणसं : विजय लोके

 

जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकले नाही. पण ४८ वर्षाच्या अल्पावधीतच मनाला चटके देत जाणे, किती तरी दुःखदायी आहे. मृत्यूवार्ता समजली आणि घोडपदेव परिसरात वायुवेगाने पसरलेल्या वृतान्तावर कुणाचाही विश्वास बसेना. चाहत्यांची अवस्था सैरभैर झाली. धावपळ झाली. शिवसेनेचा उपनेता, शिवसेनाप्रमुखांनी सणसवाडीच्या सभेत यांनाच मानसपुत्राचा दर्जा देऊ केला अन कौतुकभरल्या डोळ्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. आठवतो तो क्षण,.... आपला माणूस विजय लोकेसाहेब चिरनिद्रा घेत असल्याचे पाहून मात्र कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. माणसाच्या नशिबी जिने इतके कमी कधीच नसावे. त्यांच्या मृत्यूने विभागपातळीवर नुकसान तर झाले पण त्यांच्या कुटुंबीयांचे अतोनात नुकसान झाले. खूप हिम्मतीचा माणूस, वाटले होते आजारपणातून बाहेर येईल पण काळाने घात केला. अशा समाजाभिमुख,राजकारणधुरंधर आणि विचारवंत नेत्याच्या आठवणीने गहिवरून येते, मन व्याकुळ बनते, कृतज्ञतेने भरून येते.
                                             विजय लोकेसाहेब म्हणजे उमदे आणि देखणं व्यक्तिमत्व.जहालमतवादी आणि मवाळमतवादी.राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त. बोलायची लकब आणि वागण्याची पद्धत आणि रुबाबदार युवावस्थेला साजेल असा पेहराव.यामुळे तरुणांचे मन आकर्षित होणे साहजिकच आले. युवाशक्तीला क्रिडाक्षेत्राद्वारे एकत्रित आणून राष्ट्रवादी विचारांचे बीज रोवणारा... हा घोडपदेवचा नायक.आयुष्याच्या उत्तरार्धात निर्माण झालेल्या कोंडीमुळे ते अवघडले, अडखळले, थोडे बाजूला पडले. जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचं दु:खी जीवन त्यांच्या तब्येतीवर परिणाम करून गेले.
कीर्ती करून नाही गेले
ते उगाच जन्मले......
समर्थानी म्हटले. पण कीर्तिरूपे उरले ते आपले विजय लोकेसाहेब .. त्यांनी राजकारणातून समाजकारण केले. किती तरी संकल्प केले आणि पूर्णत्वास नेले. नगरसेवक पद भूषविताना त्यांनी
अनेक सामाजिक प्रश्नावर चर्चा घडवून आणली. सत्ताधारी असो वा विरोधकांवर अत्यंत तिखट आणि नेमक्या शब्दात टीका न करता सामाजिक कार्यावर भर देत राहिले.
किती तरी प्रसंग त्यांच्या सहवासात अनुभवले.ते सारेच कथन करणे अशक्य असले तरी घोडपदेवच्या नागरिकांची एक तक्रार कायम असे. डास उपद्रव... त्यामुळे मलेरिया सारखे आजार उद्भवून विभागातील दोन तीन बळी गेल्याने चिंतीत झालेल्या आदरणीय लोकेसाहेबांनी यावर दिवसा धूर फवारणी करून महापालिका आपलेच नुकसान करीत आहे ते त्यावेळी त्यांनी संबधित अधिकार्यांना पटवून दिले होते. तेव्हा संबधितांनी राणीबाग आणि परिसरात रात्रीची धूर फवारणी सुरु केली होती. त्यामुळे अंधारात बाहेर पडणारे उपद्रवी डांस काही दिवसातच कमी होत गेले. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न... आज माझ्या मनावर कोरलेला आहे.
त्यांचे विभागावर सामाजिक ऋण आहेत. या ऋणातून थोडे तरी उतराई होण्यासाठी शनिवार दिनांक २५ जून २०१६ रोजी त्यांच्या नावे होत असलेल्या
कै. विजय लोके चौक या नामकरण प्रसंगी आपण उपस्थित राहून सर्व मिळून मानवंदना देऊ या .......!
२५ जुन हा स्व लोकेसाहेबांचा जयंती दिन आहे

अशोक भेके 

या चिमण्यांनो परत फिरा रे .......!



     एक सिंह आला अन दाणे टाकीत टाकीत गेला. दाणे इतके गोड आमच्यासारखे आम्हीही ते दाणे टिपत टिपत त्याच्या मागावर गेलो.जो पर्यंत दाणे गोड लागत होते तो पर्यंत ठीक होते पण नंतर बदल होत गेला. अखेर त्याने दाणे टाकायचे बंद केल.  हे सांगायचे तात्पर्यम्हणजे ठिकठीकाणी विकासक नावाचा सिंह येतो अन भाडेकरूसारख्या सामान्यांना दाणे टाकून सावज टिपत असतो.  हा प्रकार सर्वत्रचालला आहे . सन २००७ साली पुनर्विकासासाठी बाहेर पडलेल्या जाफरभाई कानजी चाळीतील भाडेकरूविषयी असंच घडले .  एकूण ८०पैकी ८  ते १०  रहिवाशी संत जनाबाई मंडईत स्थलांतरीत झाले तर  १० ते १२ रहिवासी मुंबई सेन्ट्रल येथे स्थलांतरीत झाले . उर्वरीतइकडे तिकडे घर भाड्याने घेऊन राहत आहेत. स्थलांतरीत समस्यामुळे बदललेला समाज, बदललेले नाते या सर्व बाबींशी मिळतंजुळतंघेताना किती त्रागा करावा लागतो. आज ९ वर्षे उलटून गेली. विकासक त्यांना झुलवितो आहे. सुट्टीच्या दिवशी इमारतीचं काम  ही मंडळीकुठवर आले आहे,  हे पाहण्यासाठी धपापत्या उराने  येतात अन निराश चेहरा करून परत जातात. घर भाडेकरूंच्या स्वप्नातले.....! स्वप्नातइतके रुतून बसले आहे की त्यांना प्रत्येक धक्का , प्रत्येक ठेच मनावर घाव करीत आहे. त्यांच्या जखमांच्या गर्भात प्रतिशोध दडलेला नसो.जखम ठणकते आहे . यांच्या जखमेवर फुंकर घालणारी मायेची माणसं हवी आहेत. माणूस बऱ्याचदा  निराश होतो. अपयशी झाला स्वत:च्या परिस्थितीला दोष देत असतो शिवाय   आपल्या मनातील स्वप्नांना..!          
                        बघता बघता आमची पिढी निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. लहानपणापासून पाहत आलेलो घोडपदेवच्या जुनाट चाळी,चिंचोळ्या गल्ल्या, पडक्या झडक्या इमारती.  घोडपदेव विभाग अस्ताव्यस्त असलेला . सुधारणा होत गेल्या. बैल तबेले होते तेथेमंडई आली.   काही ठिकाणी इमारती झाल्या. मांसमासोळी साठी आपल्या जवळ ठिकाण लाभल्यामुळे घोडपदेवकर विशेषत: महिला वर्गबेहद्द खुश झाला होत. त्याही पेक्षा ज्यांनी पूर्वनियोजित कट आखून चलाखीने   गाळे घेतले होते ते तर शंभरपटीने मनातल्या मनात मांडेखात होते. पण ते क्षणिक होते. या मंडईला लागून जाफरभाई कानजी चाळ नावाची मराठी वस्ती. एकूण ८० भाडेकरू असलेली, रस्त्यालालागून दुमजली माडी आणि दोन उभ्या रांगेतल्या चाळी. रस्त्याला लागून वळणदार  दुकाने...  सुंदर चाळ होती. माणसं चांगली होती. पणचाळ म्हातारी झाली होती. तिला नटवायचं... सजवायचं होते. त्यातून पुनर्विकास संकल्पनेचा जन्म झाला. अडसर आला तो दुरही झाला. तरीही मोठा अवधी गेला. म्हणता म्हणता ९ वर्षे झाली तरीही तपश्चर्या फळाला येत नाही. नियतीला दोष द्या नाहीतर अजून कश्याला. काही गोष्टी कुणाला जमत नसतील तर  त्यांनी इतरांकडे वर्ग करावयास हव्यात. यामागील कारण ज्यांचे  जोडे झीजताहेत त्यांना ठाऊकआहे.  संक्रमण शिबिर असो वा ती भाड्याची घरे. घुसमटलेले कोंडवाडे. यांना आवश्यक सोयीसुविधा नसतानाही सामंजस्याने घेताहेत म्हटल्यावर विकासकांनी समजून घ्यायला हवे होते. या भाडेकरुना घर बांधून देतो म्हणजे तो उपकारच करीत असल्याची भावनेची हवा त्याच्या डोक्यात घुसलेली आहे. भाडेकरूंच्या इमारतीबाजुला टोलेजंग टॉवर उभा आहे ना तो तेथील भाडेकरूंच्या जिवावर.... हे विकासकांनी लक्षात ठेवायला हवे.  संक्रमण शिबिरात राहणारे एक ठिकाणी वसलेले असले तरी भाडेतत्वावर राहणारे किमान ६० भाडेकरू दर अकरा महिन्यांनी खोल्या बदलताहेत. आजच्या काळात १२ ते १५ हजार घरभाडे सुरु असताना या विकासकाकडून तुटपुंज्या भाड्यावर समाधान  का मानायचे...? आता तर त्याने कहरच केला. घरभाडे देणेच बंद केले. व्यवस्था कमालीची खिळखिळी झाली असल्याने भाडेकरूंचे अस्तित्व क्षुल्लक झाले आहे. न्याय आहे त्या साठी कायदेशीर वाटा आहेत पण काही बाबतीत नाक दाबून... कपाली बुक्का लावण्याचा वापर करावा, ही राजकीय नीती आहे . भलेभले नेते याच मार्गाने मोठे झालेत. विकासक आणि तत्सम घरभाडेकरू यामध्ये सकारात्मक दृष्टीकोनाने निर्णय होत नाही तो  पर्यंत तरी आतुरतेने वाट पाहणारा भाडेकरू प्रतीक्षा करीत राहील.
                             जाफरभाई कानजी चाळीतील रहिवाश्यांसारखी अनेक ठिकाणी असं  घडतंय न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटलेल्या भाडेकरूना.  १० ते १५  वर्षे उलटूनही आपल्या हक्काचं घर त्यांना मिळत नाही ही शोकांतिका कुणाला सांगायची......? भिकीबिडी चाळगेली आज तेच भाडेकरू  जेथे म्हाडाने वसविले तेथेच स्थायिक  झाले आहेत. त्यांना परत यायचे नाही, असं समजू या. पण जाफरभाईकानजी चाळीतील  ९ वर्ष जगण्याच्या संघर्षात गुंतलेल्या सामान्यांना आपले हक्काचं घर कधी मिळणार...?  चिमण्या आपल्या गावची वेसओलांडून गेल्या असल्या तरी ‘ या चिमण्यानो, परत फिरा रे......!’ अशी भावनिक साद कोणी घालील का ...?  त्यांच्याविषयी मायेचा ओलमनातून आपल्या खरोखर ओसरलेला आहे का....?  योगेश्वरचे रहिवाशी आले... श्रीकापरेश्वर कृपाचे रहिवासी आले. आपल्या हक्काच्याघरात राहत आहेत.आनंदी आहेत. चाळ संस्कृती लोप पावली असली तरी हक्काच्या घरातील मजा आनदाने घेत आहेत. जाफरभाई कानजीचाळीतील अनेक पार्थ असतील पण सारथ्य करणारांनी आपल्या रथात या चिमण्यांना लवकरात लवकर  आसरा द्यावा, हे मनोमन वाटतआहे.
                                                                                                                                                                                       अशोक भेके